पूर्णा । प्रतिनिधी (सय्यद कलीम ):- भारतीय पोलीस सेवा १९९५ च्या बॅचचे आय पी एस अधिकारी तथा सध्या झारखंड राज्यात कार्यरत असलेले अपर पोलिस महासंचालक, (कायदा व सुव्यवस्था) श्री.संजय लाठकर, यांना प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येस उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती पदक घोषित करण्यात आले आहे.
प्रतिष्ठित समजले जाणारे राष्ट्रपती पदक हे देशातील पोलीस दलातील निवडक अधिकाऱ्यांना व उल्लेखनीय कामगिरी बजावणा-यास दिले जाते.
आय पी एस संजय लाठकर यांनी भारतीय पोलीस सेवेत गेली २६ वर्ष देशातील बिहार, झारखण्ड, महाराष्ट्र राज्य व सीआरपीएफ मधे अतिशय उत्कृष्ट रीत्या सेवा बजावली आहे.
या दरम्यान विविध पदांवर केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना यापूर्वी ८ विभिन्न पदके देवून सन्मानित करण्यात आले असून त्यात मा. राष्ट्रपती यांचे पोलीस शौर्य पदक, २ वेळा आंतरिक सुरक्षा पदक, मुख्यमंत्री झारखण्ड यांचे शौर्य पदक, मा. राष्ट्रपती यांच्याद्वारे घोषित गुणवत्तापूर्ण सेवेसाठीचे पदक व केंद्रीय गृह मंत्रालयाचे उत्कृष्ट सेवा पदक इत्यादींचा समावेश आहे.
बिहार व झारखंड राज्य सरकार द्वारा त्यांना यापूर्वी अनेक प्रसंगी पुरस्कृत करण्यात आलेले असून सीआरपीएफ मधे गडचिरोली व नागपूर येथे डीआयजी तसेच रांची व मुंबई येथे आयजीपी म्हणून नक्षलविरोधी मोहिमेत बजाविलेल्या उत्कृष्ट कामगिरी व प्रशासनासाठी ११ डीजी, सीआरपीएफ प्रशंसा डिस्क देण्यात आलेली आहेत. तसेच संजय लाठकर यांना आतापर्यंत ६० पेक्षा अधिक प्रशस्तिपत्रेही मिळालेली आहेत.
महाराष्ट्र राज्यात श्री एस ए.लाठकर यांनी परभणी व लातूर या जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक, पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त व दहशतवाद विरोधी पथकाचे डीआयजी अशा महत्वपुर्ण पदांवर कार्य केलेले असून त्यांना महाराष्ट्र शासनाने २ वेळा सन्मान पत्र व राज्य अल्पसंख्याक आयोगाने महात्मा गांधी शांतता पुरस्कार देवून गौरविलेले आहे.आता त्यांना त्यांच्या पोलीस सेवेतील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आल्याने व प्रदान करण्यात आल्या बद्दल त्यांचे माजी सभापती प्रकाश ढोणे पाटील यांनी व इतर अनेक त्यांच्या हितचिंतकांनी अभिनंदन केले आहे.

