-------------------------------------------------------
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि :-
केज कळंब रोडवर माळेगाव येथे एका भरधाव कारने मोटार सायकलीला पाठीमागून दिलेल्या धडकेत मोटार सायकल वरील दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात हलविले आहे.
या बाबतची माहिती अशी की, दि. १८ फेब्रुवारी शुक्रवार रोजी रात्री ८:३० वा.
भाऊसाहेब दिलीप पाटील व प्रशांत जाधव दोघे रा. केज हे केज-कळंब रोडने केजकडे मोटार सायकल क्र. (एमएच-४४/एच- ७४२४) वरून जात असताना त्यांनां पाठी मागून येणाऱ्या भरधाव स्विफ्ट डिझायर क्र. (एमएच-४८/एस-९२६८) या कारने जोराची धडक दिली. त्या नंतर मोटार सायकल वरील भाऊसाहेब दिलीप पाटील व प्रशांत जाधव हे दोघे उडून बाजूला पडले तरी या कारने मोटार सायकल सुमारे एक फर्लांग अंतरा पर्यंत फरफट नेले.
अपघातातील जखमी भाऊसाहेब दिलीप पाटील व प्रशांत जाधव यांना माळेगाव येथील ग्रामस्थानी सरकारी रुग्णवाहीकेतून उपचारासाठी अंबाजोगाई येथील सरकारी दवाखान्यात हलविले आहे.
दरम्यान अपघात झाल्या नंतर रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने थांबून वाहतूक कोंडी झाली होती. केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी दोन पोलीस पथके घटनास्थळी पाठविले. पोलीस पथकात नागरगोजे, अमोल गायकवाड, अनिल मंदे, अशोक नामदास, अशोक गवळी आणि गृह रक्षक दलाचे जवान हे होते.

