शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २० फेब्रुवारी २०२२
आता शिर्डी नगरपरिषद?..ग्रामस्थांचा जल्लोष, फटाक्यांची आतषबाजी..!!
शिर्डी : शिर्डी नगरपंचायतीचे रूपांतर शिर्डी नगरपरिषदेत झाल्याचे समजताच शिर्डी शहरातील सर्वपक्षीय संघटना नेते व ग्रामस्थांनी नगरपंचायत कार्यालयासमोर एकत्रित येऊन साईनामाचा जयघोष केला असून फटाक्यांची जोरदार आतषबाजी करून गावातून मिरवणूक काढत जल्लोष साजरा केला. दरम्यान, शिर्डी नगरपंचायतचे रूपांतर नगरपरिषदेत झाल्याचा आनंद शिर्डी करांनी जल्लोषात व्यक्त केला असला तरी शासन स्तरावर याबाबत वृत्त लिहीपर्यंत कुठलाही अध्यादेश प्राप्त झाला नव्हता. नगरपरिषद झाल्याची माहिती ऐकीव व वास्तव असली तरी याबाबतचा अध्यादेश केव्हा निघतो व शिर्डीकरांना केव्हा प्राप्त होतो याबाबत मोठी उत्सुकता असून याकडे समस्त शिर्डी ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे
शिर्डी नगरपंचायत ऐवजी नगरपरिषद व्हावी या मागणीसाठी अपवाद वगळता शिर्डी शहरातील सर्वपक्षीय नेते व नागरिकांनी शिर्डी नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. शिर्डी ग्रामस्थांच्या एकजुटीला व सामूहिक प्रयत्नाला अखेर यश आले. शिर्डी नगरपंचायतचे रूपांतर शिर्डी नगरपरिषदेत झाल्याची वार्ता आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर व शहरातील नागरिकांना काल.दि.18 शुक्रवार रोजी सकाळी समजताच शिर्डी ग्रामस्थांनी साईनामाचा जयघोषात आनंद व्यक्त करत फटाक्यांची जोरदार आतषबाजी केली. यावेळी शहरात सर्वत्र जल्लोष साजरा केला.
याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, कैलासबापू कोते, नितीन उत्तम कोते, विश्वस्त महेंद्र शेळके, कमलाकर कोते, रमेश गोंदकर, ज्ञानेश्वर गोंदकर, सुधाकर शिंदे, निलेश कोते, सुजित गोंदकर,दादासाहेब गोंदकर, राजेंद्र कोते, सचिन शिंदे, अशोक कोते, अरविंद कोते, आप्पासाहेब कोते, प्रमोद गोंदकर, हरिश्चंद्र कोते, दत्तात्रय कोते, सुनील गोंदकर, गोपीनाथ गोंदकर, राकेश कोते, शब्बीरभाई सैय्यद, समीर शेख, सलीम शेख, साईराम गोंदकर, सोमनाथ कावळे, नरेश सुराणा, राम आहेर, अँड अविनाश शेजवळ,उमेश शेजवळ, अँड विक्रांत वाकचौरे, अमोल बानाईत, हरीराम राहाणे, शफीक शेख, नानासाहेब काटकर, स्वराज त्रिभूवन, अनिल पवार, गोटू गायकवाड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शिर्डी नगरपंचायत प्रवेशद्वारासमोर एकत्रित जमलेल्या सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते व ग्रामस्थांनी ग्रामदैवत मारुती मंदिरापर्यंत मिरवणुक काढून आपला आनंद अधिक द्विगुणित केला. शिर्डी नगरपरिषद झाल्याचा अध्यादेश दुपारनंतर येणार होता मात्र यावर पूर्णतः शिक्कामोर्तब झाल्याचे समजल्याने अध्यादेशाची वाट न पाहता शिर्डीकरांनी आपला आनंद साजरा केला आहे. यावेळी ग्रामस्थांनी समाज माध्यमावर अर्थात सोशल मीडियावर संदेश व्हायरल करून नगरपंचायतचे रूपांतर नगरपरिषदेत होण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व मंत्री नेते व संघटनांचे पदाधिकारी यांचे आभार व्यक्त केले आहेत. शिर्डीकरांच्या सामूहिक प्रयत्नांना यश आले असून शिर्डी नगरपंचायतचे रुपांतर नगरपरिषदेत झाले आहे. सर्वपक्षीय नेत्यांचा पाठपुरावा तसेच नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे व महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हा ऐतिहासिक निर्णय झाला आहे. यासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील, साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था मंडळाचे अध्यक्ष आ. आशुतोष काळे, खा. सदाशिव लोखंडे यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल सर्व ग्रामस्थांनी या सर्व मान्यवरांचे आभार मानले आहे.
नगरपरीषद झाल्याबाबतची वार्ता समजल्यानंतर शिर्डी नगरपंचायतच्या प्रवेशद्वाराजवळील पायर्यांवर उपस्थित शिर्डी सर्वपक्षीय ग्रामस्थांच्या वतीने नगरपंचायतचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांच्या हस्ते गोमुत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आले.
"शिर्डी नगरपंचायतची नगरपरिषद होणेकामी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे, महसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात, साईसंस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांचे विशेष सहकार्य तसेच शिर्डी विधानसभा मतदार संघातील माजीमंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, खा. सदाशिव लोखंडे, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहभागामुळे शिर्डी नगरपंचायतची नगरपरिषद झाली."
- रमेश गोंदकर, राष्ट्रवादी नेते.
"शिर्डी नगरपरिषद करण्यासाठी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, यांची सकारात्मक भुमिका होती. दोघेही साईभक्त असल्याने शिर्डी शहराचा विकास व्हावा यासाठी नगरपरिषदेची गरज होती. वेळोवेळी शिर्डी ग्रामस्थांनी केलेल्या मागणी तसेच आग्रहाचा मान ठेवून शिर्डी नगरपंचायतचे नगरपरिषदेत करण्यासाठी निर्णय घेतला याबद्दल धन्यवाद."
- कमलाकर कोते, शिवसेना नेते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

