shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मराठी महाराष्ट्राची ऊर्जा... हवा अभिजात भाषेचा दर्जा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
रविवार दिनांक २७ फेब्रुवारी २०२२

मराठी महाराष्ट्राची ऊर्जा... हवा अभिजात भाषेचा दर्जा..!!
 
अहमदनगर : मराठी भाषेचं जतन, संवर्धन व प्रसार करण्यासाठी दरवर्षी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 27 फेब्रुवारी हा दिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. परंतु फक्त मराठी भाषा दिन जवळ आला की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी जोर धरू लागते ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्र सरकारने याबाबत एक समिती स्थापन करून सर्व निकष तपासून राज्य सरकारमार्फत एक सकारात्मक अहवाल केंद्र सरकारला सादर केलेला आहे. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी ज्या प्रकारचे निकष असतात ते सर्व निकष पूर्ण करून देखील मराठीला अभिजातचा दर्जा का मिळू नये हे आजपर्यंत न उलगडलेलं कोडं आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रामुख्याने भाषावार प्रांतरचना निर्माण करण्यात आली होती. त्यावेळीही देश विभागला जातो की काय अशी एक प्रकारची भीती वाटत होती. पण भाषेची देवाण घेवान सुखकर व्हावी हाच त्यामागील मुख्य उद्देश होता. प्रत्येक प्रांताची वेशभुषा, भाषा जरी वेगवेगळी असली तरी विविधतेतुन एकता नांदावी हाच त्यामागील प्रामाणिक हेतू होता. आत्तापर्यंत केंद्र सरकारने 6 प्रादेशिक भाषांना अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे. मग मराठी भाषेचा एवढा मोठा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या लेखणीतही मराठी भाषेचा उल्लेख (गौरव ) आढळून येतो. तरीसुद्धा अजूनही मराठीला अभिजातचा दर्जा का नाही? महाराष्ट्र सरकारने नुकताच काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व दुकानांवरील पाट्या या मराठीतच असाव्यात यासाठी विधीमंडळात कायदा तयार केला. पण महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना आपण दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर करावा एवढी साधी गोष्ट समजू नये हीच खरी शोकांतिका आहे. पण आता मात्र हा कायदा केल्यामुळे नक्कीच सर्वजण याच पालन करतील यात तिळमात्र शंका नाही.

 

आज मराठी शाळेतही मुलांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे याला जबादार कोण? मराठी शाळेतूनही इंग्रजी भाषा शिकता येते मग फक्त इंग्रजी शाळेचा आग्रह कशासाठी? इंग्रजी भाषेला आपण जितकं महत्व देतो तितकं महत्व आपण मराठी भाषेला का देऊ नये? आपली मराठी भाषा इतर राज्य वा देशांनीही शिकावी अशी आपली प्रामाणिक तळमळ का असु नये? इंग्रजी भाषेचाही आग्रह धरावा पण मराठीचा सन्मान राखून. आज एखाद्या बँकेत जर आपण गेलो तर पैसे काढण्यासाठी वा भरणा करण्यासाठी असलेली स्लिप ही इंग्रजी भाषेत असते मग एखादा निरक्षर व्यक्ती त्या ठिकाणी व्यवहार करण्यासाठी गेल्यानंतर त्याला असंख्य अडचणी येतात ही वस्तुस्थिती आहे.

 

मराठी भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत एकजूट होऊन आपला मराठी बाणा का दाखवू नये? प्रत्येक क्षेत्रात मराठीवर अतिक्रमण होत आहे ते आता कुठेतरी थांबायाला हवं. मराठी भाषेलाही खुप मोठा इतिहास आहे. तसेच ही भाषा जशी वळवावी तसे शब्दांचे अर्थही बदलत जातात. आज आपण स्मार्टफोनच्या माध्यमातूनही ऑनलाईन संदेश पाठविताना इंग्रजी भाषेलाच पसंती देतो त्यातही अनेक शॉर्टकट वापरलेले असतात ही वस्तूस्थिती आहे. त्यामुळे भविष्यात कदाचित मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा जरी मिळाला, केंद्र सरकारकडून मराठी भाषेच्या विकासासाठी, संवर्धनासाठी विशेष निधीही मिळाला तरी मराठी भाषेचे जतन व संवर्धन करणं ही आपल्या सर्वांचीच नैतिक जबाबदारी असणार आहे.मराठी ही आपली मातृभाषा असून अखंड महाराष्ट्राची ती ऊर्जा आहे. लवकरच तीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल अशीच मराठी भाषा दिनानिमित्त माफक अपेक्षा व्यक्त करूयात...!

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close