शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२
अनाधिकृत जमीन वापर प्रकरणी रिपाई आंबेडकर गटाचे शिंदे डेव्हलपर्स कंपनीसमोर गेटबंद आंदोलन..!!
राहुरी : तालुक्यातील गुहा येथील गट नंबर ३३०/१ मधील शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अनाधिकृत जमीन वापराची चौकशी करून आठ दिवसांच्या आत योग्य ती कारवाई न केल्यास रास्ता रोको आंदोलन करणार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून संबंधित कंपनीचे काम कायमस्वरूपी बंद पाडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला आहे.
राहुरी तालुक्यातील गुहा येथील गट नंबर ३३०/१ मधील शिंदे डेव्हलपर्स प्रा.लि.कंपनीने अनाधिकृत जमीन वापराची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी या मागणीसाठी आरपीआय आंबेडकर गटाच्या वतीने जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक ३१ जानेवारी रोजी गुहा येथे शिंदे डेव्हलपर्स कंपनीसमोर गेटबंद आंदोलन करण्यात आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे म्हणाले की, गुहा येथील गट नंबर ३३०/१ मध्ये शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने डांबर मिक्सिंगसाठी प्लॅन्ट उभारला असून नगर ते कोपरगाव रस्ता डांबरीकरण आणि खडीकरणासाठी आवश्यक प्रकिया उद्योग गट नंबर ३३०/१ मध्ये चालणार आहे. मात्र त्या गटाचे व्यावसायिक कारणासाठी वापर होत असेल तर त्या गटाचे अकृषिक क्षेत्रात रूपांतर करणे आवश्यक आहे. तसेच गुहा ग्रामपंचायतीचे ना हरकत प्रमाणपत्राची सुद्धा आवश्यकता आहे. सदर ठिकाणी डांबराच्या मिक्सिंग यंत्र संचामुळे प्रदूषण निर्माण होऊन आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होत आहे. गट नंबर ३३०/१ क्षेत्राच्या मालकी हक्कावरून न्यायालयात वाद सुरू असून सदर जमीनीचा व्यावसायिक कारणासाठी वापर केला जात आहे. याबाबत शासनाचा महसूल बुडत असल्याने तातडीने दंडात्मक कारवाई करावी याबत प्रशासनाला निवेदन दिले असतानाही अद्यापपर्यंत प्रशासनाने कुठलीही कारवाई केलेली नाही. येत्या आठ दिवसात शिंदे डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीवर कारवाई न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे यांनी दिला.
यावेळी उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राकेश कापसे, जिल्हा सचिव राजन ब्राह्मणे, तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे, उपतालुकाध्यक्ष रमेश पलघडमल, युवक तालुकाध्यक्ष प्रतीक खरात, शहराध्यक्ष प्रतिक रूपटक्के, सनी जगताप, रॉकी ब्राह्मणे, राजेंद्र ओहोळ, संपत वाबळे, अक्षय वाबळे, विशाल पटेकर आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांचेसह पोलीस नाईक भिताडे, खेमनर, निकम, पोलीस अंमलदार फाटक आदी कर्मचाऱ्यांनी आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवला होता.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

