शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२
मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण व्हायरल झाल्याने श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यातील दोन पोलिसांना भोवले..!!
अहमदनगर : मोबाईलवरील आक्षेपार्ह संभाषण व्हायरल झाल्याने श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ व कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत यांना विभागीय चौकशी होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी रविवारी (ता. 30) निलंबनाचा आदेश दिला आहे. श्रीरामपूर तालुका पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांमधील मोबाईलवरील संभाषण व्हायरल झाले आहे.
पोलिस खात्याची बदनामी करणे हे संभाषण आहे. पोलिसांची समाजातील प्रतिमा मलिन झाली आहे. हे वर्तन बेशिस्त व निष्काळजीपणाचे असल्याचा अहवाल श्रीरामपूर विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी या संभाषणाच्या अनुषंगाने शनिवारी (ता. 29) जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना पाठविला होता.
या अहवालानुसार पोलिस नाईक लक्ष्मण दशरथ वैरागळ आणि पोलिस कॉन्स्टेबल योगेश शिवाजी राऊत यांना निलंबित करण्यात आले आहे. या दोघांची खातेनिहाय चौकशी करण्यात येणार आहे.
मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 25 आणि मुंबई पोलिस (शिक्षा व अपिल) 1956 चे कलम 3 नुसार प्राप्त अधिकारानुसार पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दोघांना निलंबित केले आहे.
या दोघांना पोलिस मुख्यालयात राखीव पोलिस निरीक्षक यांच्या अधिपत्याखाली रहावे लागणार आहे. या दोघांनाही निलंबित कालावधीत खासगी नोकरी किंवा कोणताही व्यवसाय करता येणार नाही. दर शुक्रवारी कवायत मैदानावर हजेरी द्यावी लागणार आहे.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

