shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दोन ऐतिहासिक विजयांना लतादिदीच्या जाण्याने दुःखाची किनार !



         मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटला वादविवाद आणि पराभवांनी ग्रासले होते. त्यामुळे तमाम क्रिकेट प्रेमी दुःखी झाले होते. याच पार्श्वभूमिवर वेस्ट इंडिज हा देश भारताच्या दुखऱ्या जखमेवर मलम लावण्यास पुढे सरसावला. प्रथम वेस्ट इंडिजमध्ये शनिवारी रात्री संपन्न झालेल्या १९ वर्षांच्या मुलांच्या वनडे विश्वचषक स्पर्धेत भारताने आपले विक्रमी पाचवे विजेतेपद मिळविले तर रविवारी  भारताच्या पुरुष संघाने आपल्या एक हजाराव्या एकदिवसीय ऐतिहासिक सामन्यात वेस्ट इंडिज संघाला पराभूत करून भारतीय क्रिकेट रसिकांना आनंदाचा क्षण दिला. मात्र या दोन विजयांदरम्यान भारतीय सिनेसृष्टीची महान गायिका गानसम्राझी भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले. लतादिदींच्या निधनाच्या वार्तेने संपूर्ण देशच शोकसागरात बुडाला. त्यामुळे भारताच्या संघाने मिळविलेल्या वरील दोन्ही एंतिहासिक विजयांना दुःखाचे गालबोट लागले.

          शनिवारी रात्री भारताच्या १९ वर्षाखालील मुलांनी इतिहास घडविताना आपले पाचवे विजेतेपद मिळवून भारतीय क्रिकेटच्या उज्ज्वल भवितव्याची जाणीव समस्त क्रिकेट जगताला करून दिली. सन २००० पासून सन २०२२ पर्यंत तब्बल आठ वेळा भारताने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असून त्यात पाच वेळा विजेते ठरण्याचा महापराक्रम साधला आहे. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडला फारसे वळवळू दिले नाही. भारताचे जलदगती गोलंदाज राज बाबा व रवि कुमारने मिळून नऊ इंग्लिश फलंदाज बाद केले. इंग्लंडचे ७ गडी ६१ धावात बाद झाल्यानंतर भारतीय गोलंदाज आपल्या वरिष्ठ खेळाडू प्रमाणे काहीसे सुस्तावले व त्याचा लाभ जेम्स रुने घेत स्वतः ९५ धावांची खेळी सजवत इंग्लंडला १८९ अशी समाधान कारक धावसंख्या गाठून दिली.
            प्रत्युत्तरात उपकर्णधार शेख रशिदच्या पन्नास, निशांत सिंधूच्या नाबाद पन्नास व पाच बळींसह संकटसमयी पस्तीस धावांची महत्वपूर्ण खेळी करून अष्टपैलूत्व सिध्द करणाऱ्या सामनावीर राज बावाच्या शानदार कामगिरीने भारत आपल्या लक्षाला पार करू शकले. या विजयाने भारताच्या क्रिकेटमध्ये चैतन्य पसरले असून भारतीय क्रिकेटचे भवितव्य चांगले असणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
              रविवारी सकाळी लतादिदीच्या निधनाने शोकमय झालेल्या भारताच्या पुरुष संघाने आपल्या ४८ वर्षांच्या वनडे क्रिकेटच्या कारकिर्दीतल्या एक हजाराव्या सामन्यात विजय मिळवून मालिकेला झोकात सुरुवात केली. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर नवा कर्णधार रोहीत शर्माच्या प्रत्येक चाली यशस्वी ठरल्या. प्रथम नाणेफेकीचा कौल त्याच्या बाजूने लागला. नंतर त्याच्या गोलंदाजांनी आपले कर्तव्य ईमानेइतबारे पार पाडले. क्षेत्ररक्षकानींही चांगली कामगिरी केली. कर्णधार रोहीतने डिआरएस घेताना दाखविलेली चालाखी संघाच्या कामी आली. वॉशिंग्टन सुंदर, यजुवेंद्र चहलची फिरकी यशस्वी ठरली. दक्षिण आफ्रिकेत भारताचे फिरकी गोलंदाज अपयशी ठरले होते, त्यामुळे तेथे भारताला तीन -शुन्य अशी मालिका गमवावी लागली होती. मात्र येथे भारतीय फिरकीपटू घर के शेर ठरण्यात यशस्वी झाले.
               एक गोष्ट मात्र अजूनही भारतीय संघाला त्रासदायक ठरत आहे ती म्हणजे विरोधी संघाचे सुरुवातीचे फलंदाज बाद करून शेपूट कापण्यास भारतीय गोलंदाजांना त्रास होत आहे. हा सर्व प्रकारच्या भारतीय संघाना भेडसावणारा मोठा प्रश्न असून यावर लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.
                 रोहीत शर्माने स्वतः साठ धावांची शानदार खेळी करत इशान किशनसह आश्वासक सलामी दिली. त्याच्या बाद होण्यानंतर विराट कोहली, रिषभ पंत व ईशान किशनचे पाठोपाठ होण्याने भारताचा संघ अडचणीत आला होता. मात्र यावेळी पदार्पणवीर दिपक हुडा व सुर्यकुमार यादवने जबाबदारीने खेळत अठ्ठाविसाव्या षटकातच सामना संपवून ऐतिहासिक विजयात महत्वाची भूमिका बजावली.
                  प्रशिक्षक राहुल द्रविड चौथ्या क्रमांकासारख्या महत्वाच्या जागेवर रिषभ पंतला वारंवार संधी देत आहे व तो सातत्याने अपयशी ठरत आहे. हे थाबंवलं पाहीजे कारण रिषभ पंतमध्ये चौथ्या क्रमाकांवर खेळण्याचे कोणतेही कौशल्य व गांभीर्य दिसत नाही. उलट तो जी हाराकिरी करतो ती संघासाठी फायद्यापेक्षा नुकसानदायकच ठरत आहे. त्यासाठी सुर्यकुमार यादव सक्षम पर्याय सोबत असताना त्याला डावलणे चुकीचे आहे. शिवाय संघात सहावा गोलंदाज दिपक हुडाच्या रूपात असताना त्याला न अजमावणे म्हणजे प्रयोगाची संधी गमावण्या सारखेच आहे. दक्षिण आफ्रिकेतही व्यंकटेश अय्यरला गोलंदाजी न देण्याचे कारण उलगडू शकले नव्हते. या छोटया मोठया चुका सुधारणे गरजेचे आहे.
                  एकंदर रोहीत शर्माची सुरूवात चांगली झाली असून आगामी विश्वचषक स्पर्धांच्या दृष्टीने संघ बांधणीसाठी काही कठोर निर्णय घेऊन संघातील वातावरण खेळीमेळीचे ठेऊन अंतर्गत वादांना दूर ठेवले तर रोहीत व भारत विश्वविजयी झाल्याशिवाय राहाणार नाही.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close