shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महावितरण'ने वीज ग्राहकांची पिळवणूक थांबवावी,अन्यथा आंदोलन ; 'राजद'च्यावतीने महावितरणला विविध मागण्यांचे निवेदन..!


श्रीरामपूर (प्रतिनिधी):- महावितरणकडून सुरु असलेली सक्तीची वसुली, पैशांसाठी महावितरण कर्मचाऱ्यांकडून वीज जोडणी देण्यास होणारी दिरंगाई, भारनियमन,रोहित्र बदलण्यासाठी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक अशा विविध समस्यांसंदर्भात 'राष्ट्रीय जनता दला'च्या पदाधिकाऱ्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना जाब विचारून, विविध मागण्यांचे निवेदन बुधवारी (दि.१६) महावितरणच्या श्रीरामपूर विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंत्यांना दिले. 

अतिरिक्त कार्यकारी अभियंता सुरेश कुऱ्हाडकर यांनी निवेदन स्वीकारले. वीज ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही 'राजद'च्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे जिल्हाध्यक्ष इम्रानभाई शेख, जिल्हा कार्याध्यक्ष हरीश शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश बोरुडे, सुनील इंगळे, राहुल क्षीरसागर, उपाध्यक्ष योगेश गायकवाड, तालुकाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष विजय कावरे आदी उपस्थित होते.

'आरजेडी'च्या वतीने महावितरण अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे कि, श्रीरामपूर तालुक्यात महावितरण ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून, महावितरणचे अधिकारी, कर्मचारी वीज ग्राहकांच्या अडचणीत आणखीच भर टाकत आहेत. कोविडमुळे शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक नियोजन बिघडले असल्याने कोविड काळातील वीज बिल माफ करावे किंवा त्यात सवलत द्यावी. सक्तीची वसुली बंद करून शेतकरी व नागरिकांचे वीज जोडणी खंडित करू नये. ग्रामीण भागात थ्री फेज कनेक्शनचे भरनियमन बंद करावे व शेतकऱ्यांकडून ट्रान्सफारमर बदलण्यासाठी पैसे घेऊ नये. ऑनलाईन,ऑफलाईन कोणतीही तक्रार असो त्यांचे २४ तासात निवारण करावे. मीटर रिडींग घेण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना ओळखपत्र व युनिफॉर्म द्यावा. मिटर संबंधित तक्रारींचे त्वरित निरसन करावे, अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.


नवीन वीज जोडणी घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांना महावितरणचे अधिकारी, कर्मचारी जाणीवपूर्वक उशीर करतात व  खाजगी लोकांकडे पाठवतात. यातून नियमबाह्यरित्या पैसे उकळले जात असल्याचा आरोप इम्रानभाई शेख व राजेश बोरुडे यांनी यावेळी केला. निर्धारित शुल्कात व वेळेत वीज जोडणी द्यावी, असे शेख व बोरुडे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना सांगितले.

श्रीरामपूर : महावितरण अधिकऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देताना जिल्हाध्यक्ष इम्रानभाई शेख, जिल्हा कार्याध्यक्ष हरीश शिंदे, सुनील इंगळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेश बोरुडे आदी उपस्थित होते.
close