shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पांगरा ढोणे येथे आजपासून तरंगल हनुमान यात्रेस प्रारंभ..!

पुर्णा । प्रतिनिधी  :
तालुक्यातील पांगरा ढोणे येथील तरंगल हनुमान यात्रेस बुधवार (दि.१६)पासुन सुरुवात होणार आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे  हा तंरगल यात्रा उत्सव  साजरा करण्यात आला नव्हता. यावर्षी शासनाने कोरोनाचे नियम पाळून  पांगरा ढोणे येथील यात्रोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. पहाटे ५ वाजता पांगरा ढोणे येथील दिपक गुरु जोशी यांच्या मंत्रघोषाने व गावचे मानाचे मुकदम तुकाराम सदाशिवराव ढोणे यांच्या हस्ते श्रींना दही, दूध, मध, गोमुंत्र टाकून जलअभिषेक केला जाईल. पुर्णाचे तहसीलदार पल्लवी टेमकर यांच्या हस्ते महापुजा व अभिषेक, आरती होईल. अनेक ठिकाणची नेतेमंडळी दरवर्षी श्रीच्या दर्शनासाठी उपस्थित राहतात. सायंकाळी ६वाजता  गावातील महिला मंडळी, लेकीबाळी, सुना, बच्चे कंपनी असे सर्वच लहान मुले- मुली ते ज्येष्ठांपर्यंत वाजत गाजत ढोलताशाच्या गजरात श्रींंना आरती व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात व आजुबाजूच्या गावा-गावातून परिसरातील भाविक पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन दाखल होत असतात. पांगरा ढोणे गावातील प्रत्येकाच्या घरी पुरणपोळीचा प्रसाद असतो. ही हनुमान यात्रा शेकडो वर्षांपासून भरवली जाते. यात्रेला जुनी परंंपरा आहे.
पांगरा ढोणे येथील ज्येष्ठ नागरिक बापुराव धोंडजी ढोणे- पाटील यांनी असे सांगितले की, माझं वय शंभर आहे.  माझे आजोबा सांगत असत की, ही तंरगल हनुमान यात्रा फार दिवसांपासून भरते. तंरगल हनुमानाची मुर्ती सात फूट उंच अशी आहे. हनुमानाची मुर्ती अंदाजे एक टन  शेंदूरात माखलेली आहे. या हनुमान यात्रेला महाराष्ट्र, तेलगंना, कर्नाटक आदी राज्यातून भाविक येतात. नवसाला पावणारा हनुमान अशी दूरवर ओळख आहे. शुक्रवारी (दि.१७) मराठवाड्यातील भाविक वाहनाने  व परिसरातील भाविक बैलगाडीत बसून येत असतात. आलेल्या भाविकांच्या वाहनांची पार्कींगची व्यवस्था करण्यात आली आहे. चुडावा पोलिस ठाणे कर्मचारीही चोख बंदोबस्त ठेवणार आहेत.   कालपासून आकाश पाळणे, मिठाईची दुकाने अशी विविध प्रकारची दुकाने येऊन थाटली आहेत. हा यात्रा उत्सव १६,१७,१८ रोजी भरणार आहे, अशी माहिती विठ्ठल कदम व माजी सरपंच उत्तमराव ढोणे यांनी दिली आहे.
close