राजेश बाष्टे । अलिबाग ः -
दैनिक ‘आपलं महानगर’ च्या रायगड आवृत्तीचे निवासी संपादक, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार प्रवीण पुरो यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई किशोर पुरो यांचे त्यांच्या राहत्या घरी तालुक्यातील नागाव येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९२ वर्षांच्या होत्या.
१९६५ मध्ये पतीचे छत्र हरवल्यानंतर लक्ष्मीबाईंनी अत्यंत कष्ट उपसून मुलांचा सांभाळ केला आणि त्यांना समाजात ख्यातीपर्यंत पोहचवले. प्रवीण पुरो, शिवसेनेचे विभाग प्रमुख एस. के. पुरो, रिक्षा संघटनेचे प्रमुख प्रफुल्ल पुरो, शेकाप कार्यकर्ते प्रकाश पुरो आणि प्रमिला पुरो तथा रीना वसंत घरत ही त्यांची मुले विविध संघटनांशी बांधली गेली आहेत. अत्यंत मीत स्वभावाच्या लक्ष्मीबाई यांना शनिवारी नागाव येथील स्मशानभूमीत प्रवीण पुरो यांनी मंत्राग्नी दिला तेव्हा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
कष्टप्रद जीवनाची अखेर
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि म्हातवली पंचायतीचे माजी प्रमुख अनंत घरत यांनी लक्ष्मीबाईंना आदरांजली वाहताना अत्यंत मनमिळावू आणि कष्टप्रद जीवनाची अखेर झाल्याची भावना व्यक्त केली. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत लहान मुलांचा सांभाळ करीत त्यांना सुस्थळी पोहोचविण्याची त्यांची कसब कमालीची वाखाणण्याजोगे होती, असे ते म्हणाले.
शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते काका पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत पतीच्या निधनाने सारे संपले की काय, अशा स्थितीत केवळ शेतीच्या आधारे मुलांचा सांभाळ करून जगायचे कसे याचे धडे देणारा दुवा हरपल्याचे म्हटले.
उरण तालुका समन्वय समितीचे माजी प्रमुख तथा नागावचे माजी सरपंच काशीनाथ स. गायकवाड यांनीही यावेळी श्रद्धांजली अर्पिली. ते म्हणाले धैर्य, चिकाटी आणि कष्ट करून जगण्याचा मंत्र या मातेने घालून दिला. अत्यंत मनमिळावू, कष्टाळू आणि तितक्याच धीराच्या जगण्याचा अर्थ लक्ष्मीबाईंनी समाजाला घालून दिल्याचे गायकवाड म्हणाले. लक्ष्मीबाईंचा दशक्रिया विधी सोमवारी, १४ फेब्रुवारी रोजी पार पडणार आहे.

