शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२२
प्रेरणा फाउंडेशन कडून ऊसतोडणी कामगारांच्या मुलांना 'मायेची ऊब'..!!
श्रीरामपूर : येथील प्रेरणा फाउंडेशन सातत्याने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत समाजाच्या विविध क्षेत्रात भरीव असे कार्य करीत आहे. नुकताच प्रेरणा फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा व श्रीरामपूर येथील प्रथितयश स्रीरोग तज्ञ डॉक्टर प्रेरणाताई शिंदे यांच्या सहृदयतेचा आणि सामाजिक बांधिलकीचा अनुभव श्रीरामपूर वासियांना आला. हाडे गोठवून टाकणाऱ्या थंडीची लाट सबंध महाराष्ट्र अनुभवत असताना ऊस तोडणी कामगारांची अवस्था आणखीच दयनीय झालेली आपण पाहत आहोत. गरम कपडे तर जाऊ द्या परंतु अंगभर कपडे ही ज्यांच्या वाट्याला येत नाहीत अशा परिस्थितीत हे ऊस तोडणी कामगार अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत काबाडकष्ट करत असल्याचे आपल्याला दिसते. त्यांच्या मुलाबाळांची अवस्था तर अधिकच बिकट झाल्याचे आढळून येते. अशा परिस्थितीत ह्या कष्टकरी कुटुंबांना काहीसा दिलासा देण्याचा, त्यांच्या चिमुकल्या ना अंगभर कपडे देण्याचा अतिशय स्तुत्य असा निर्णय डॉ प्रेरणाताई शिंदे यांनी घेतला.
"चिमुकल्या बालगोपाळांच्या चेहऱ्यावर, फुललेले निर्व्याज स्मित हास्य... त्यांच्या निरागस डोळ्यातील आनंदाची चमक ... त्यांची नवीन कपडे घालून पाहण्याची लगबग... आपल्या लेकरांना नवीन कपडे मिळाल्याने आई-वडिलांच्या डोळ्यातील वाहणारे आनंदाश्रू... बायाबापड्यानी तोड भरून दिलेले आशिर्वाद... आणि जणू वस्तीवर दसरा- दिवाळीच साजरी होत असल्यासारखे वातावरण... हा सर्व माहोल होता ऊस तोडणी कामगारांच्या अड्ड्यावर… आणि प्रयोजन होते प्रेरणा फाउंडेशन कडून ह्या कामगारांच्या मुलांना वाटण्यात आलेले नवीन कपडे..."
फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी वस्तीला भेट देऊन प्रत्येक कुटुंबातील मुलामुलींची माहिती घेवून त्यांची वयोगटानुसार वर्गवारी करून त्यानुसार सर्वांसाठी नवीन कपड्यांची खरेदी केली. फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ प्रेरणाताई शिंदे आणि सचिव कु रश्मीताई शिंदे ह्यांच्या हस्ते ह्या सर्व चिमुकल्यांना कपडे आणि खाऊचे वाटप करण्यात आले.
अत्यंत हालाखीचे जीवन जगत काबाडकष्ट करणऱ्या ह्या कष्टकऱ्यांचा आउष्यात आनंदाचे चार क्षण आपण देवू शकलो ह्याचे आपल्याला मनस्वी समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया डॉ. प्रेरणाताई शिंदे यांनी व्यक्त केली. तसेच यापुढेही हया वर्गासाठी काहीतरी भरीव काम करण्याची इच्छा ही त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. तसेच ह्या निरागस चिमुकल्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या आईवडिलांकडून मिळालेले आशीर्वाद हीच प्रेरणा फाउंडेशनच्या कार्याची खरी पावती असून तेच सर्वात मोठे पारितोषिक असल्याची भावना रश्मीताई शिंदे यांनी व्यक्त केली. ऊसतोडणी मजुरांच्या प्रती आस्था दाखवून सामाजिक कर्तव्याची जाणिव ठेवून त्यांच्या मुलांना देण्यात आलेले नवीन कपडे कष्टकरी वर्गाला सुखावणारे आहेत तसेच फाउंडेशन ने राबणाऱ्या हातांना दिलेली मायेची ऊब ही अतिशय दिलासादायक असून त्याबद्दल मी डॉ. प्रेरणाताई शिंदे यांचे मनापासून आभार मानतो अशी प्रतिक्रिया अशोक सहकारी साखर कारखान्याचे मुख्य शेतकी अधिकारी नारायणराव चौधरी यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. प्रेरणा फाउंडेशन सातत्याने समाजासाठी वर्षभर नवनवीन उपक्रम राबवत असते. यामध्ये वृद्धआश्रमातील वृद्धाना मागील हिवाळ्यात स्वेटर देण्याचा कार्यक्रम असो वा, लॉकडाऊन काळात गरजूंना मोफत अन्नधान्याचे तसेच जीवनाश्यक वस्तूंचे वाटप असो अशा सर्व प्रसंगात सामाजिक बांधिलकी जपत आपले कार्य प्रेरणा फाउंडेशने अविरत सुरु ठेवले आहे.
या कार्यक्रमासाठी प्रेरणा फाउंडेशनच्या स्वयंसेवक सौ. रंजना जरे, सौ. चित्रा सुराडकर, सौ. जया फरगडे, सौ.पूनम पटारे, राहुल शाह, विनोद रोहमारे, गागरे सर, पत्रकार नितीन चित्ते, रावसाहेब राशिनकर, तसेच सर्व पत्रकारबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनोदजी रोहमारे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश थोरात यांनी केले.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

