एकेकाळी क्रिकेट हा सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून गणला जायचा. परंतु जस जसा या खेळात पैसा व लोकप्रियता आली तस तशी अंतर्गत प्रतिस्पर्धा व राजकारण वाढत गेले. एकमेकांना शह देण्याच्या प्रयत्नात प्रत्येक जण या पवित्र खेळातील सभ्यताच विसरून गेले. त्यामध्ये निव्वळ खेळाडूच नाही तर क्रिकेटचे संचलन करणाऱ्या सर्वोच्च संस्थांचे पदाधिकारीही गुंतले आहेत. वास्तविक बघता वरिष्ठ स्तरावर क्रिकेट खेळले जाते तेव्हा त्या संबंधातील बरेचसे निर्णय गोपनिय ठेवण्याची प्रथा असते. परंतु स्वतःचं श्रेष्ठत्व सिध्द करण्याच्या नादात खेळाडू व अधिकारी यांच्यात झालेली जुगलबंदी जगासमोर येते तेंव्हा पवित्र खेळाची अवहेलना होते व ते विदारक दृश्य क्रिकेटचे निस्सीम चाहते असणाऱ्या क्रिकेटच्या भक्तांच्या काळजाला नक्कीच इजा पोहोचविणारे असते.
सध्या असेच विदारक दृश्य भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआय व भारतीय क्रिकेटमधील काही प्रथितयश व काही तथाकथीत वरिष्ठ खेळाडू यांच्या दरम्यान सुरू असल्याचे दिसत आहे. यामध्ये जास्त करून खेळाडू व अधिकारी आपण एकमेंकापेक्षा कसे व किती सरस आहोत हे सिद्ध करण्याच्या नादात क्रिकेटलाच बदनाम करत आहे.
सन २०२१ च्या टि ट्वेंटी विश्वचषकानंतर तत्कालीन कर्णधार विराट कोहलीला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून काढणे, त्यानंतर त्याने कसोटीचे कर्णधार पद सोडणे या गोष्टी वादग्रस्त ठरल्या होत्या. त्यामुळे बीसीसीआय व अध्यक्ष सौरव गांगुलीची जगभर नालस्ती झाली होती.
सन २०२१ च्या टि ट्वेंटी विश्वचषकानंतरच भारताचा तथाकथीत अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने बंगलोर स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकाडमी ( एनसीए )त जाण्यास नकार दिला. शिवाय बीसीसीआयचा रणजी स्पर्धा खेळण्याचा आदेशही त्याने झुगारून लावून स्वतः बीसीसीआय पेक्षा श्रेष्ठ असल्याचे भासविले. तसेच २०२१ च्या टिट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत तो निव्वळ फलंदाज म्हणून निवडला गेला होता, अष्टपैलू खेळाडू म्हणून नव्हे, असे सांगून थेट निवड समितीलाच तोंडघशी पाडले होते.
भारतीय क्रिकेट आजमितील जडणघडणीच्या संक्रमणातून जात असल्याने संघात अनेक बदल केले जात आहेत, जेणे करून आगामी काही दिवसात होऊ घातलेल्या मोठया क्रिकेट स्पर्धा व द्विपक्षीय मालिकांचा विचार करून जुन्या खेळाडूंना आराम देऊन नव्या दमाच्या होतकरू खेळाडूंना संधी देऊन भविष्यातले दर्जेदार खेळाडू बनविण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याच योजनेअंतर्गत काही वरिष्ठ व सध्या विशेष फॉर्मात नसलेल्या तसेच वयही अनुकूल नसलेल्या खेळाडूंना संघातून बाजूला करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे करताना सुरूवातीला बीसीसीआय व निवड समिती यांच्याकडून संबंधीत खेळाडूला विश्वासात न घेता निर्णय घेतले जात होते. परंतु त्यातून नको ते वाद वाढायला लागल्याने बीसीसीआयने आपल्या धोरणात बदल करून सदर खेळाडूंना निवड समिती व संघाचे मुख्य प्रशिक्षक यांच्या माध्यमातून कळविले जाऊ लागले.
श्रीलंकेविरूध्द होऊ घातलेल्या दोन कसोट्यांसाठी बीसीसीआयने खराब फॉर्ममध्ये भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू अजिंक्य राहाणे, चेतेश्वर पुजारा, ईशांत शर्मा व वृध्दीमान साहा यांना संघातून वगळून रणजी करंडक स्पर्धेत खेळून फॉर्मात येण्यासाठी पाठविले. त्यातील राहाणे व पुजारा मुकाटपणे रणजी सामना खेळले. राहाणेने शतक करून राष्ट्रीय संघात आपली दावेदारी पुन्हा सादर केली. परंतु निवड समितीला तो प्रभावित करण्यात कमी पडला. राहाणेने शतक केलेल्या मुंबई -सौराष्ट्र सामन्यात चेतेश्वर पुजारा पहिल्या डावात शुन्यावर बाद झाला परंतु नेहमीप्रमाणे पहिल्या डावातील अपयशानंतर दुसऱ्या डावात चांगली खेळी करण्याची स्वतःची परंपरा कायम राखत त्याने ९१ धावांची खेळी केली. मात्र निवड समितीला त्याच्या या खेळीत स्वारस्य न दिसल्याने तोही टिम इंडियात स्थान मिळवू शकला नाही.
तीनशे अकरा कसोटी बळी व एकशे चार कसोटी खेळलेला व सध्या विशेष फॉर्मात नसलेला वेगवान गोलंदाज ईशांत शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फारसे भवितव्य उरले नसतानाही स्वत:हून निवृत्ती घेण्याच्या मन:स्थितीत नाही. शिवाय रणजी खेळण्याची त्याची मानसिकताही नाही. त्यामुळे तोही भारतीय संघात निवडला जाऊ शकला नाही.
मात्र खरा वाद सुरू झाला यष्टीरक्षक वृध्दीमान साहाच्या निवडीवरून ! साहाने प्रथम बंगाल कडून रणजी खेळण्यास नकार दिला. त्यामुळे निवड समितीच्या नियमानुसार राष्ट्रीय संघात निवडीस तो अपात्र ठरला. शिवाय त्याचे वय छत्तीस वर्ष आहे व विद्यमान संघात रिषभ पंतने आपले स्थान पक्के केल्याने वयस्कर साहासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर भवितव्य नसल्यासारखेच असल्याने तसेच अनेक नवोदित व होतकरू यष्टीरक्षक -फलंदाज उपलब्ध असल्याने बीसीसीआयचा त्याला संघात न घेण्याचा निर्णय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी साहाला कळविला. परंतु द्रविड यांनी त्याला सन्मानाने निवृत्तीचा दिलेला निर्णय साहाला पटला नाही व त्याने थेट प्रसिध्दी माध्यमांशीच संवाद साधला. न्युझिलंडविरूध्द कानपूर कसोटीत ६१ धावांची शानदार खेळी केल्यानंतर बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुलीने त्याला दिलासा देणारा मेसेज पाठविला होता. त्याचे त्याने भांडवल बनवून गांगुलीवरच कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बंगाल क्रिकेटचे सचिव व सौरव गांगुलीचे बंधु स्नेहाशिष गांगुलीने त्याला योग्य कारण सांगत बंगाल संघातही घेण्यास नकार दिला. त्यामुळे साहाच्या रागाचा पारा वाढला व थेट प्रसिध्दी माध्यमात मुलाखती दिल्या. त्याचा हा वादग्रस्त कार्यक्रम येथेच थांबला नाही. त्याला कोणा तथाकथीत पत्रकाराने धमकावल्याचे त्यानेच ट्वीटरवर प्रसिध्द केले व बीसीसीआयने सदर पत्रकाराचे नाव विचारल्यानंतर कोणाचे नुकसान करण्याचे संस्कार त्याच्यावर नसल्याचे कारण पुढे करून त्या पत्रकाराचे नाव सांगण्यास नकार दिला. त्यामुळे हे प्रकरण आता त्याच्यावरच बुमरँग होण्याचे लक्षणं आहेत.
अश्या छोट्या प्रकरणांमुळे सदर खेळाडू आपली प्रतिमा खराब करून घेण्याबरोबर स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेत आहेच. तसेच बीसीसीआय व संबंधीत पदाधिकारीही क्रिकेटचे फार भले करत आहेत असे दिसत नाही. तेंव्हा प्रत्येकाने आपला कक्षेत राहून क्रिकेटची स्वच्छ प्रतिमा कशी राहील याची काळजी घ्यावी.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

