शहाजीनगर येथे ऊसतोडणी मजुरांची आरोग्य तपासणी
इंदापूर: प्रतिनिधी
शहाजीनगर येथे नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्यावरती ऊस तोडणी मजुरांच्या कोपी तळावर कर्मयोगी शंकररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर यांच्या वतीने ऊस तोडणी मजुरांची आरोग्य तपासणी गुरुवारी ( दि.१०) करण्यात आली. यावेळी ऊस तोडणी मजुरांना मोफत औषधे देण्यात आली.
कर्मयोगी शंकररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्टने राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील व शंकररावजी पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा पद्माताई भोसले यांच्या संकल्पनेतून गेल्या गळीत हंगामापासून सुरू केलेला हा मोफत आरोग्य तपासणीचा व औषधोपचाराचा उपक्रम कौतुकास्पद आहे. या उपक्रमाचा लाभ इंदापूर तालुक्यातील हजारो ऊस तोडणी मजुरांनी घेतला असून राज्यामध्ये राबविला जात असणारा हा पहिलाच उपक्रम असल्याचे यावेळी कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांनी सांगितले.
याप्रसंगी ट्रस्टच्या आरोग्य केंद्राचे प्रमुख महादेव चव्हाण यांनी उपक्रमाची माहिती दिली. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे, विलासराव वाघमोडे, दत्तात्रय शिर्के, सतीश अनपट, रामचंद्र पाटील, कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील, शेतकी अधिकारी डी. एम. लिंबोरे, संग्रामसिंह मोहिते, ऊस तोडणी मजूर उपस्थित होते. या शिबीरात आरोग्य तपासणीसाठी डॉ. श्वेता शिंदे, नर्स पूजा धांदे, तनुजा गायकवाड, नितेश बारसकर यांनी परिश्रम घेतले. आभार कार्यालयीन अधीक्षक सुभाष घोगरे यांनी मानले.

