पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या २०११ च्या संतकृपा दिवाळी अंकामध्ये भा.द. खेर यांच्या साईबाबा व त्यांचे गुरू गोपाळराव देशमुख यांच्या बद्दल प्रथमतः वाचायला मिळाले.त्या लेखात हे दोघे गुरू शिष्य उमरखेड येथील गढीत योगाभ्यासत समाधीत असताना दुष्ट आप्त स्वकीयांनी साईंना विट फेकून मारली ही घटना, नंतर गोपाळरावांनी समाधी घेणे व गुराज्ञेनुसार साईंचे शिर्डी कडे प्रयाण तपशील समजला.
गुरु शिष्याची जवळीक सहन न झाल्याने घरादारातून दोघांनाही पराकोटीचा द्वेष व त्रास होत असल्याने गुरुंनी शिष्याला घेऊन सेलू सोडले. गोपाळरावांकडे या सर्व त्रासाला तोंड देत बसण्यास वेळ नव्हता. स्वतःचा अवतार काळ संपण्यापूर्वी शिष्य कबीराला जगत् कल्याणासाठी तयार करायचे होते.
सेलू हे गोपाळरावांचे स्थान. तर उमरखेड हे यवतमाळ जिल्ह्यातील ठिकाण. अंतर जवळपास २०० किलोमीटर. खेरांच्या लेखात उमरखेड येथील गढी (लहान किल्ला) मध्ये गुरू शिष्य योगाभ्यास करत असतानाचा उल्लेख आहे. पण उमरखेडला तर गढी नाही. मग काही तरी मिसींग लिंक आहे हे समजत होते.
तीन आठवड्यांपूर्वी गुरू गोपाळराव केशवराव देशमुख उर्फकेशवराज बाबासाहेब महाराज वेंकुशाह यांचे सातव्या पिढीतील वंशज्यांच्या संभाषणातून सेलू सोडल्यानंतर मंठा या गावात देवीच्या मंदिरात गुरू शिष्य काही दिवस होते याचा उल्लेख आला. मंठा हे गाव सेलू पासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. तरीही त्यापुढे मार्ग दिसत नव्हता. कारण तेथून पुढे एवढ्या लांबवर यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडलाच गुरू शिष्य का गेले हे समजत नव्हते.
काल गुरूवारी, माघ शुक्ल द्वितीया, श्रीपाद सहोदरी वासवी कन्यकांबा, आर्या महादेवी आत्मार्पण दिनी, दिनांक ३ फेब्रुवारी २०२२ ला रात्री इंटरनेट बंद करून झोपल्यावर हेच विचारचक्र सुरू झाले की उमरखेड का? काही वेळाने परत इंटरनेट सुरू केलं व गुगल वर पुन्हा उमरखेड व गढी शोधायला सुरुवात केली आणि अचानक "उंबरखेड गढी" समोर आली. आणि हे पाचपन्नास घरांचं उंबरखेड अगदी मंठ्याजवळच जंगलात आहे हे समजले. ही किल्ल्यासारखी दगडी बांधकामातील गढी असून हिला चार मोठे बुरुज आहेत. आतमध्ये सुस्थितीत ओवऱ्या आहेत जेथे गुरू गोपाळराव व शिष्य साईनाथ रहात होते. याच ओवरीमध्ये साईनाथांना मारण्याच्या उद्देशाने दगड हल्ला झाला. पण सर्वज्ञ गुरुंना याची पूर्व कल्पना आल्याने ते साईंचे कपडे घालून बसले व साईंना स्वतःचे कपडे घालून योगाभ्यास समाधीत बसवले. व साईंना मारलेला दगड गुरुंच्या मर्म स्थानावर (डाव्या कानशिलात) बसला. गढीच्या जवळ असलेल्या लमाण तांड्यातील वांझ कपिला गायीचे तीन शेर दुध साईंनी गुरू आज्ञेनुसार दोहले व गुराज्ञेनुसार गुरुंसमोर प्राशन केले. या प्रक्रियेत गुरुंनी शिष्याला स्वतःकडील सर्व ज्ञान प्रदान केले. तसेच स्वतःच्या मस्तकावर बांधलेल्या वस्रातून साईंना परिपूर्ण करुन, स्वतःचं धोतर साईंना कफनी म्हणून देऊन, आता माझं अवतार कार्य संपले आहे, मी आता सेलूमध्ये समाधी घेतोय. या द्वेषमूलक वातावरणात तू येथे न राहता गोदावरीच्या पश्चिमेला माझ्या समोर लगेच निघून जा असे सांगितले. तो दिवस होता मार्गशीर्ष शुद्ध एकादशी, मोक्षदा एकादशी, गीता जयंती इस १८५० च्या दरम्यान.
ही गढी व तो लमाण तांडा आजही आहे तसाच आहे!

