आयपीएलमध्ये मुंबईला विक्रमी पाच वेळा विजेतेपद मिळवून देणारा कर्णधार रोहित शर्माकडे विराट कोहलीच्या कर्णधार पदावरून पायउतार झाल्यानंतर मोठया आशेने बघितले जाऊ लागले, आणि त्यानेही देशवासीयांना निराश न करता टिम इंडियाचे पूर्णकालीन नेतृत्व स्विकारल्या नंतर तीन वेगवेगळ्या देशांविरूद्ध झालेल्या चार मालिकात विरोधी संघांच्या सफसेल नांग्या ठेचून सलग बारा विजय मिळवून स्वतःची कर्णधार म्हणून यशाची टक्केवारी ८६ पर्यंत पोहचवून २५ पेक्षा जास्त सामन्यात नेतृत्व केलेल्या जगभरातील कर्णधारात अग्रक्रम मिळविला.
टि -ट्वेंटीचे कर्णधारपद स्विकारल्यानंतर मायदेशात बलाढय न्यूझिलंडला टि- ट्वेंटी मालिकेत तीन -शुन्य असे लोळविले. मात्र त्यानंतर झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाची पुरी धुळधाण उडाली. त्याच दौऱ्यावर रोहीत दुखापतीमुळे जाऊ शकला नव्हता. मात्र आफ्रिकेत झालेल्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारून तत्कालीन कसोटी कर्णधार विराट कोहलीने स्वतःकडे असलेले कसोटी कर्णधारपद सोडून दिले व त्यानंतर हि जबाबदारी रोहीत शर्माच्या मजबूत खांद्यावर आली.
नुकताच विंडीज संघ भारतात तीन वनडे व तीन टि- ट्वेंटी सामन्यात सामन्यात धूळ खाऊन परतला. त्यानंतर पाळी होती श्रीलंकेची ! त्यांनाही भारतात खेळलेल्या तीन टि-ट्वेंटी पैकी एकही सामना जिंकण्यात अपयश आले. त्यामुळे भारताने सलग बारा टि- ट्वेंटी सामने जिंकण्याच्या अफगाणिस्तान व रुमानिया यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली असून आता भारताकडे विश्वविक्रम आपल्या नावे करण्याची नामी संधी आहे.
या सर्व पराक्रमात कर्णधार म्हणून रोहीतच्या कार्तत्वाची मोठी भूमिका आहे. त्याच्या सफल नेतृत्वाचे वैशिष्टये म्हणजे. तो संघातील प्रत्येक खेळाडूंवर दाखवित असलेला विश्वास. प्रत्येकाला परिस्थितीनुसार देत असलेली संधी, अपयशानंतरही त्यांची पाठराखण करून त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्यात रोहीतची भूमिका महत्वाची ठरली. नवे- जुने, वरिष्ठ - कनिष्ठ यांची योग्य सांगड घालण्यात रोहीत यशस्वी ठरत असल्याने सर्व फासे त्याच्या अपेक्षेनुरूप पडत असून तो हात लावेल त्या गोष्टीचे सोने होत आहे. त्यामुळे मागील नऊ वर्षापासून आयसीसी स्पर्धांच्या विजेतेपदाचा दुष्काळ संपविण्यासाठी प्रत्येक जण रोहीतकडे मोठया आशेने बघत आहे.
यंदा ऑस्ट्रेलियात वर्षा अखेरीस टि ट्वेंटी विश्वचषक स्पर्धा होणार असल्याने रोहीतच्या नेतृत्वात संघ बांधणीची प्रक्रिया जोरात सुरू आहे. तसेच सन २०२३ मध्ये भारतात वनडेचा विश्वकरंडक होणार आहे, तर सध्या कसोटी विश्व अजिंक्यपदाचे सामनेही सुरु असून त्यामध्ये त्याला भारताला जगज्जेता बनविण्याची नामी संधी चालून आली आहे. या तीन स्पर्धा भारताने जिंकाव्यात अशी देशवासीयांची अपेक्षा आहे.
रोहीतने संघाचे नियमित कर्णधारपद स्विकारल्या पासून त्याने त्याच्या शांत व कॅप्टन कुल स्वभावालाही तिलांजली दिली असून प्रसंगी चुक करणाऱ्या खेळाडूला दटावण्यात तो जराही मागे पुढे पाहत नाही. क्षेत्ररक्षण लावताना त्याची तत्परता, कल्पकता व अभ्यास स्पृहनीय आहे. तसेच गोलंदाजीत अचूक बदल करणे ही त्याची खासीयत बनत चालली असून अपयशी ठरणाऱ्या गोलंदाजांच्या पाठीवर हात फिरवून त्यांना धीर देण्यातही तो मागे हटत नाही. शिवाय संघ हितासाठी स्वतःची नेहमीची सलामीची जागाही नवोदितांना देताना बघून संघ हितासाठी सर्वस्व झोकण्याची त्याची वृत्ती नक्कीच कौतुकास्पद आहे. तर डिआरएस बाबतही त्याचा अभ्यास चांगला दिसतो.
श्रीलंकेविरूद्ध पहिल्या सामन्यात ३७ धावा त्याने केल्या तेंव्हा तो टि- ट्वेंटीच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला. हे करताना त्याने मार्टीन गप्टील व विराट कोहलीला मागे टाकले. तर तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या शोएब मलिकचा १२४ सामने खेळण्याचा विक्रम मागे टाकून स्वतः नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. या सर्व गोष्टी मनाप्रमाणे घडत असताना रोहीतची विंडीज विरूद्ध पहिल्या वनडेत ६१ धावा व श्रीलंकेविरुद्ध पहिल्या सामन्यात केलेली ४४ धावांची खेळी वगळता सात सामन्यात त्याची बॅट खामोश होती. श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, व्यंकटेश अय्यर यांची फलंदाजी व गोलंदाजांच्या लक्षणीय कामगिरीमुळे व प्रतिपक्षांवर मिळविलेल्या विजयांवर त्याचे फलंदाजीतील अपयश झाकोळले गेले. मात्र प्रत्येक वेळी इतर फलंदाज यशस्वी ठरतीलच असे नसल्याने रोहीतला तातडीने आपल्या तंत्रात व खेळात बदल करून चुका दुरुस्त लागतील व तो ते करीलही. मात्र सध्या तरी त्याचे फलंदाजीतील अपयश चिंतेचा विषय बनला आहे.
समस्त देशवासीयांच्या सदिच्छा त्याच्या पाठीशी असल्याने गंभीर दुखापतींवर मात करून तंदुरूस्ती मिळविली तशीच फलंदाजीतील खराब फॉर्मवर मात करून तो पुन्हा चाकोरीत येईल. अशी अपेक्षा धरायला तूर्त तरी काहीही हरकत नाही.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

