shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वर्षातली पहिली मालिका टिम इंडियाच्या खिशात ; गोलंदाजांची कमाल, फलंदाज अजूनही कोमात..!


            टिम इंडियाने सन २०२२ च्या सुरुवातीलाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला आणि तेथे कसोटी व वनडे मालिकेत सडकून मार खावा लागला. सलग पाच पराभवाच्या गंभीर जखमा घेऊन मायदेशी आला आणि पाठोपाठ वेस्ट इंडिजचा तुलनेने कमजोर संघ तीन वनडे व तीन टि-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात दाखल झाला. विंडीजचा संघ वनडेत कमजोर असला तरी टि- ट्वेंटी मालिकेत मायदेशात बलाढय इंग्लंडला हरवून आल्यामुळे भारतापेक्षा त्यांचे मनोबल नक्कीच उंच होते. शिवाय रोहीत शर्मा भारतीय क्रिकेटची अधिकृतपणे धुरा स्विकारणार असल्याने काहीसे शंकास्पद वातावरण होते. परंतु रोहीतने आपल्या नेतृत्वाचा आयपीएल मधील अनुभव पणाला लावून पहिल्या वनडे सामन्यात विंडीजला लिलया लोळविले, शिवाय त्याच्या बॅटनेही संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिल्याने विजय सुकर झाला व नव्या वर्षातला पहिला विजय देशवासीयांना सादर केला.

               दुसरा सामनाही अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. रोहीत त्याच्या पूर्णकालीन नेतृत्व कार्यकाळात प्रथमच नाणेफेक हरला. विशेष म्हणजे टि- ट्वेंटी विश्वचषकानंतर भारताने तेरा सामन्यात गमावलेली ही केवळ दुसरीच नाणेफेक होती. वास्तविक दिवस रात्र खेळल्या जाणाऱ्या सामन्यात नाणेफेकीला विशेष महत्व असते. त्याचे कारण म्हणजे रात्री मैदानात दव पडतं त्यामुळे चेंडू ओला होतो व गोलंदाजांना खास करून फिरकी गोलंदाजांना चेंडूवर पकड मिळविताना त्रासदायक परिस्थिती बनते. त्यामुळे बरेचसे कर्णधार टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. मात्र या सामन्यात निकोलस पुरनने नाणेफेक जिंकल्याचा लाभ उठवत भारताला फलंदाजीस पाचारण केले.
               किरॉन पोलॉर्डच्या गैरहजेरीत नेतृत्व करत असलेल्या पुरन ने उत्कृष्ठ नेतृत्वाचा नजराना पेश करताना गोलंदाजांचा चलाखीने वापर करत भारताची आघाडीची फळी रोहीत शर्मा, रिषभ पंत व विराट कोहलीला स्वस्तात बाद करून भारताला चिंतेत टाकले. कारण मागील बऱ्याच सामन्यात भारताची मधली फळी केवळ नामधारी असल्याचे सिध्द झाले असल्याने यावेळी भारत किरकोळीत सर्वबाद होईल असे वाटत होते. मात्र उपकर्णधार केएल राहुल व सुर्यकुमार यादवने जबाबदारीने खेळ केला परंतु दोघेही जम बसल्यानंतर बाद झाल्याने संघाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. मात्र दिपक हुड्डा व वॉशिंग्टन सुंदरने थोडीफार कसरत करत आपल्या गोलंदाजांना पाठबळ ठरतील इतक्या धावा फलकावर लावल्या.
             भारताकडून सुर्यकुमार यादवने ६४ धावांची शानदार खेळी केली तर केएल राहुल एक धाव घेताना गोंधळला व धावबाद झाला. तर रोहीत शर्मा व विराट कोहली स्वस्तात परतले. कोहलीचे फलंदाजीतील अपयश भारतासाठीच नव्हे तर कोहलीला स्वतःसाठी बोचणारे ठरत आहे. त्याचबरोबर रिषभ पंत बाबत संघ प्रबंधन काय प्रयोग करत आहे समजण्या पलीकडचे बनले आहे. त्याच्या नियमित नसलेल्या चौथ्या क्रमांकावर त्याला खेळवून फज्जा उडाल्या नंतर या सामन्यात त्याला थेट सलामीवीर बनविलं आणि तेथे तर त्याचं अक्षरशः भजं झालं. टिम मॅनेजमेंट पंतला बळीचा बकरा बनविते का त्याला निखरण्याची संधी देते ?  हे जरा आकलनाच्या बाहेरचं झालं आहे. गुणवान व होतकरू रिषभची होत असलेली हेळसांड बघून त्याचा इरफान पठाण तर होणार नाही ना ? अशी भिती वाटते.
                  भारताचे नवखे गोलंदाज नाममात्र २३७ धावांचा बचाव करतील का अशी शंका असताना आज भारताच्या प्रत्येक गोलंदाजाने आपले कर्तव्य योग्यरित्या बजावले व विंडीजवर ४४ धावांचा मोठा विजय मिळवून मालिकेत दोन - शुन्य अशी विजयी आघाडी घेतली. भारताच्या या विजयात वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हिरो ठरला. आपल्या नऊ षटकात चार निर्धाव षटके टाकत केवळ बारा धावा मोजून चार बळी खरेदी केले.तर शार्दूल ठाकूरने दोन तसेच दिपक हुडा, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर व यजुवेंद्र चहलने प्रत्येकी एक गडी बाद केला.
                  विंडीज संघ दुबळा असला तरी शेवटी विजय हा विजयच असतो. भारताने विंडीज विरूध्द सलग अकरावी वनडे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला असला तरी विंडीजला क्लिन स्विप भारत अद्याप देऊ शकला नाही. तो कारनामा करण्याची संधी सध्या उपलब्ध असून ती कमीही भारत भरून काढेल असे सध्या तरी वाटते. त्यासाठी कोमात गेलेल्या भारतीय फलंदाजांना जोमात कामगिरी करण्याची गरज आहे.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close