दक्षिण आफ्रिकेविरूद्ध नामुष्कीजन्य पराभवानंतर टिम इंडियाला आपली इमेज सुधारण्याची संधी विंडीजविरूध्द लवकर मिळाली आणि मायदेशात नवा कर्णधार रोहीत शर्मा व त्याच्या शिलेदारांनी दक्षिण आफ्रिकेत वनडे मालिकेत भारताचा झाला तसाच पराभव वेस्ट इंडिजचा करून आपल्या पोशाखावर पडलेले पराभवाचे डाग पुसण्याचा प्रयत्न केला.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून मालिकेवर आधीच कब्जा केलेल्या भारतासाठी तिसरा सामना केवळ औपचारिकता होता. तर विंडीजसाठी गेलेली पत सुधारण्याची संधी होती. भारताने संघात चार बदल करून आपल्या दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधीचे दार उघडे करून दिले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना प्रमुख फलंदाज कर्णधार रोहीत शर्मा, शिखर धवन व विराट कोहली, सुर्यकुमार यादव यांचे अपयशी होऊनही मधल्या व तळाच्या फलंदाजाच्या शानदार कामगिरीमुळे भारताला २६५ ही समाधानकारक धावसंख्या उभारता आली.
कर्णधार रोहीतने पहिल्या सामन्यात चांगली खेळी केली. त्यानंतरच्या दोन्ही सामन्यात त्याने साफ निराश केले. तर कोविड संसर्गातून सावरून परतलेल्या शिखर धवनला सुर गवसलाच नाही. हाणामारीच्या षटकात त्याची बॅट मौनच होती हे त्याने खातं खोलण्यासाठी घेतलेल्या पंधरा चेंडूवरून लक्षात येते. विराट कोहली सध्या विचित्र मानसिकतेतून जात असल्याचे निदर्शनास येते. मागील दोन वर्षांपासून शतकासाठी त्रस्त असलेल्या कोहलीच्या बॅटमधून सध्या धावाच निघेनाशा झाल्या आहेत. या मालिकेत तीन सामन्यात केवळ सव्वीस धावाच त्याला बनविता आल्या. मागील तेहतीस डावात तर तो तब्बल दहा वेळा शुन्यावर बाद झाला आहे. असेच जर होत राहीले तर चेतेश्वर पुजारा व अजिंक्य राहाणे प्रमाणे त्याच्यावरही रणजी स्पर्धेत खेळण्यासाठी जाण्याची वेळ येऊ शकते.
श्रेयस अय्यरही कोविड-१९ वर मात देऊन संघात परतला, मात्र त्याने आजारपणाचा कुठलाही लवलेश आपल्या खेळावर दाखविला नाही. त्याने ऐंशी धावांची खेळी करताना रिषभ पंत सोबत शतकी भागीदारी करून संघाला मजबूती देण्याचा प्रयत्न केला. बारा व तेरा फेब्रुवारीला आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव असल्याने श्रेयसची खेळी त्या दृष्टीने केलेली शानदार तयारी असल्याचे निदर्शनास येते. श्रेयसची एक त्रुटी येथे आपल्या निदर्शनास आणण्यास मला कुठलाही संकोच वाटत नाही. भारतात खेळताना त्याची बॅट खोऱ्याने धावा ओढते मात्र परदेशात गेल्यावर त्याला धावांचा दुष्काळ बघावा लागतो. यावर श्रेयसने वेळीच तोडगा काढला नाही तर त्याच्यावर घर का शेर हा शिक्का बसू शकतो.
या सामन्यात टिम मॅनेजमेंटने रिषभ पंतवर कुठलाही प्रयोग न केल्यामुळे त्याला पाचव्या क्रमांकावर खेळायला मिळाले. त्याने छप्पन धावांची उपयुक्त खेळी केली. रिषभच्या बाबत एक गोष्ट स्पष्ट दिसते की तो सातत्यपूर्ण धावा काढत नाही. अनेकदा बेजबाबदार फटके मारून बाद होतो. जेंव्हा चोहोबाजूने टिका होते तेंव्हा तो एक लक्षवेधक खेळी करून स्वतःला सुरक्षित करतो. त्यालाही खेळात निरंतरता आणावी लागेल अन्यथा त्याचेही आसन धोक्यात येऊ शकते.
शार्दूल ठाकूरच्या गैरहजेरीत दिपक चहारला संधी मिळाली. त्याने बॅट व बॉलने आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडली. नवोदित गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने तीन सामन्यात नऊ बळी मिळवून मालिकावीर पुरस्कार मिळविलाच परंतु भारताच्या विजयात मोलाची कामगिरी करत विंडीज फलंदाजांना सतत दबावात ठेवले.
मोहम्मद सिराजनेही धारदार मारा केला तर बऱ्याच दिवसांनी संधी मिळालेल्या कुलदिप यादवने दोन बळी घेऊन आपले भविष्य अजूनही उज्वल असल्याचे संकेत दिले. तर वॉशिंग्टन सुंदर आपल्या अष्टपैलू खेळाने प्रभावित करण्याची संधी साधत आहे.
विंडीजचा संघ वनडे मध्ये काहीसा कमकुवत असला तरी त्यांच्या संघातही नवोदितांचा मोठा भरणा आहे. त्यांची फलंदाजी अतिशय कमजोर वाटली परंतु गोलंदाजीत त्यांची बाजू भक्कम दिसते. टि- ट्वेंटीत त्यांची परिस्थिती अतिशय सदृढ असून भारताला रोखण्यात ते यशस्वी होऊ शकतात. या विजयाने हुरळून न जाता तसेच विंडीजला हलक्यात न घेता खास करून सर्वच फलंदाजांनी जबाबदारीने खेळ करणे गरजेचे आहे. अन्यथा विंडीज भारताला भारतात किमान टि ट्वेंटीत तरी लोळविण्याची क्षमता बाळगून आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

