shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कळसुबाई शिखरावर रोप-वेचं संकट ; निसर्गप्रेमी व ट्रेकर्स माञ नाराज..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 शनिवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२२   

कळसुबाई शिखरावर रोप-वेचं संकट ; निसर्गप्रेमी व ट्रेकर्स माञ नाराज..!!
अहमदनगर (अकोले) : राज्यातील सर्वात उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर जाण्यासाठी रोप-वे करण्यासंदर्भात चाचपणी करण्यात येत आहे. या रोपवेबाबत प्राथमिक सर्वेक्षण अहवाल तयार करण्याच्या सूचना राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी दिल्या असल्याची माहिती उघड झाल्यानंतर पर्यावरण प्रेमी व ट्रेकर्समध्ये संतापाची लाट उसळली आहे. कारण हा परिसर जैवसंपदेच्या दृष्टीनं अतिशय संवेदनशील आहे.

कळसूबाई शिखर ट्रेकर्सना नेहमीच आव्हान वाटत आलं आहे. सह्याद्रीतील सर्वांत मोठ्या असलेल्या या शिखरावर जाण्यासाठी आता जेथे धोकादायक कातळ आहे, तेथे लोखंडी शिड्या लावण्यात आल्या आहेत. कळसूबाई शिखर एक हजार ६४६ मिटर उंचीचे आहे. या शिखरावर चढाईसाठी अकोले व इगतपुरी तालुक्यातून जाण्यासाठी मार्ग आहेत. त्यात सर्वाधिक मार्ग नगर जिल्ह्यातूनच आहेत. अकोले तालुक्यातील बारी गावातून शिखरावर जाण्यासाठी असणारी वाट प्रमुख समजली जाते. कारण सर्वाधिक पर्यटक याच मार्गानं शिखरावर चढाई करतात. गड-किल्ल्यांवर चढाई करणाऱ्यांसाठी नगर जिल्ह्यातील कळसूबाई शिखर, हरिश्चंद्र गड आणि रतनगडाला सर्वाधिक पसंती असते. राज्यभरातून हौशी गिर्यारोहक व ट्रेकर्स येथे येत असतात. अनेक संस्था शिखरावर जाऊन तेथील कचरा गोळा करून आणतात. त्यासाठी खास मोहिमा राबवल्या जातात.

या शिखरावर कळसूबाईचं छोटेखानी मंदिर आहे. ही देवी परिसरातील आदिवासी जनतेची कुलदैवता आहे. त्यामुळे नवरात्रौत्सवात देवीच्या दर्शनासाठी लोक शिखरावर चढाई करतात. सुमारे चार ते पाच तासांची थकवणारी चढाई केल्यानंतर शिखरावर जाता येतं. तेथे गेल्यावर परिसराचा देखावा पाहिला, की सर्व शिणवटा पळून जातो. आता सरकारनं पर्यटकांच्या सोयीसाठी कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी रोप-वे तयार करण्याची योजना आखली आहे. तशी मागणी भाविक करत होते, असं रोप-वे समर्थकांचं म्हणणं आहे. मात्र, आदिवासी समाजातील तरुणांबरोबरच वयोवृद्धही नवरात्रीच्या काळात हे शिखर चढून जातात.

रोप-वेच्या सुविधेबाबत सविस्तर माहिती व त्याची आवश्यकता अकोल्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी मंत्री आदिती तटकरे यांच्याबरोबर मंगळवारी झालेल्या बैठकीत मांडली. भंडारदरा येथे येणाऱ्या पर्यटकांना कळसूबाई शिखरावर सहज जाता यावे, या साठी रोप-वेबाबतचा प्राथमिक सर्वेक्षण अहवाल करण्याबाबतच्या सूचना मंत्री तटकरे यांनी यावेळी संबंधितांना दिल्या. भंडारदरा धरण व परिसरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या व रोपवेमुळे भविष्यात वाढणाऱ्या संभाव्य पर्यटक संख्येबाबत सविस्तर माहितीसह अहवाल सादर करण्याबत निर्देश या बैठकीत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

जून पहिल्या टप्प्यात फक्त सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. पण, शिखर असलेल्या भागात कळसूबाई-हरिश्चंद्र गड अभयारण्य आहे. सह्याद्री म्हणजेच पश्चिम घाट जैवविविधतेच्या बाबतीत जगात आठव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे हे अभयारण्य अतिशय संवेदनशील आहे. या भागात बिबट्या, सांबर, भेकर, पिसोरी सारख्या मोठ्या प्राण्यांबरोबरच कीटक, उभयचर प्राण्यांच्या जाती, अतिशय दुर्मिळ वनस्पती ओढळतात. सध्याच या भागात येणाऱ्या पर्यटकांमुळे प्लॅस्टिक व इतर कचऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. रोप-वे सारख्या सुविधा निर्माण झाल्यावर शिखरावर कोणीही जाऊ शकेल.

मुळात इतक्या पर्यटकांना सामावून घेण्याची शिखऱाची व या परिसराची अजिबात क्षमता नाही. त्यात सध्याच पर्यटकांच्या मोठ्या संख्येमुळे या भागातील जैव विविधतेला आधीच धोका निर्माण झाला आहे. रोप-वे मुळे पर्यटकांची संख्या काही पटींत वाढून या भागातील जैव विविधता पूर्ण नष्ट होण्याची भीती असल्याचं निसर्गप्रेमी आणि अभ्यासकांचं म्हणणं आहे. फक्त दर्शनाच्या सुविधेसाठी हे करायचं असेल, तर या मंदिराची प्रतिकृती खाली मोकळ्या जागेत करता येईल. एका देवतेची अनेक ठिकाणी मंदिरं असतातच. त्यामुळे निसर्गाला धोका निर्माण करण्याऐवजी अशी मंदिराची प्रतिकृती उभारता येईल, असं निसर्गप्रेमींचं म्हणणं आहे. या शिवाय पूर्ण कळसुबाई शिखर अभयारण्याचा भाग असल्याने तेथे अशा प्रकारच्या कोणत्याही सुविधा करणं करणं वन्यजीव कायद्याचं उल्लंघन होणार आहे. रोप-वे व तर सुविधांसाठी या भागात मोठी वृक्षतोड करावी लागणार आहे. सध्याचं जागतिक तापमान वाढीचं संकट पाहता या भागातील समृद्ध जंगलाची तोड होणं परवडणारं नाही. या सर्व कारणांमुळे जिल्ह्यातील निसर्गप्रेमी व ट्रेकर्स असं काही करण्याच्या विरोधात आहेत. त्यांनी याविरोधात आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close