shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

बलाढय विंडीजवर भारताची मात ; विजयाचे शतकही गाठले....!


             टि- ट्वेंटी क्रिकेटमधील पावर हाऊस म्हणून ओळखले जाणाऱ्या बलाढय विंडीज संघाला भारताने पहिल्या टि- ट्वेंटी लढतीत पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेला विजयी सुरूवात केली. या  विजयाने भारताने क्रिकेटच्या तिनही प्रारूपात मिळून वेस्ट इंडिज विरूद्ध शंभर विजयांच्या संख्येला गाठले. आजवर या उभय संघात वनडे, टि- ट्वेंटी व कसोटी सामने मिळून २५२ सामने झाले असून त्यापैकी भारताने शंभर जिंकले तर विंडीजने ९९ सामने जिंकले आहे. विंडीजचा भारताविरुद्ध हा शंभरावा पराभव होता.


एकाच सामन्यात दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध विजय व पराजय यांचे शतक गाठण्याचा हा पहिला व अतिशय दुर्मिळ असा प्रसंग असून या ऐतिहासिक सामन्यात भारताने विंडीजला आक्रमणाची संधीच दिली नाही. हि बाब देखील या सामन्याचे एक आकर्षण ठरली.

            
भारताने नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीस निमंत्रण दिले. विंडीजने धडाकेबाज सुरुवात केली खरी परंतु त्यांचे फलंदाज त्यांच्या आक्रमक लौकीकाप्रमाणे आपला खेळ करू न शकल्याने त्यांना आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली नाही. उपकर्णधार निकोलस पुरन वगळता कोणीही मोठी खेळी न केल्याने विंडीजला १५७ धावांपर्यंतच पोहोचता आले.
              
भारताने आज आपल्या संघात बरेच बदल करताना आगामी विश्वचषक स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीने कठोर पाऊल टाकले. लेगस्पिनर रवि बिश्नोईने या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. परंतु मैदानात पाऊल ठेवल्यापासून सुरुवातीला काही काळ तो नर्व्हस असल्याचे स्पष्ट दिसत होते. क्षेत्ररक्षण करताना चहलच्या गोलंदाजीवर त्याने सिमारेषेवर एक झेल टिपला खरा मात्र गोंधळलल्या मन:स्थितीत त्याचा पाय सिमारेषेला लागला व झेल घेऊनही फलंदाज नाबाद राहीला व त्याला सहा धावांचा बोनसही मिळविला. त्यानंतर गोलंदाजी टाकताना पहिल्या षटकात त्याची आणखीच तारांबळ उडाली. त्या षटकात त्याने तब्बल चार चेंडू वाईड टाकले. मात्र नंतर तो काहीसा सावरला व तिसऱ्या षटकात त्याने चक्क दोन फलंदाजांना बाद करून गोंधळलेल्या मनःस्थितीवर मात केली. आपल्या चार षटकांच्या कोट्यात अवघ्या सतरा धावा देत त्याने दोन बळी मिळविले. विशेष म्हणजे या सतरा धावातील सहा धावा त्याने वाईडच्या रूपात दिल्या होत्या. त्याची हि अप्रतिम कामगिरी त्याला पदार्पणातच सामनावीर खिताब देऊन गेली. त्याच्या या कारनाम्यामुळे त्याचे व भारताचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे दिसत आहे. खास आपणासाठी एक माहिती येथे देतो की, या विद्यमान टि- ट्वेंटी संघातील ईशान किशन, सुर्यकुमार यादव व हर्षल पटेल यांनाही त्यांच्या पदार्पणाच्या टि- ट्वेंटी सामन्यात सामनावीर पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे या विजयात त्या तिघांनीही भरीव कामगिरी करत संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
                
भारताकडून कर्णधार रोहीत शर्माने फलंदाजीत घणाघाती हल्ला करत अवघ्या अठरा चेंडूत चाळीस धावा ठोकल्या. तर संघाचे नेतृत्व करताना गोलंदाजी व क्षेत्ररक्षणात योग्य वेळी योग्य बदल करत विंडीजचे वारू उधळू दिले नाही. रोहीतने युएईमध्ये झालेल्या टि- ट्वेंटी विश्वचषकानंतर भारताच्या सफेद चेंडूच्या खेळातील संघाचे नेतृत्व केलेल्या सातही सामन्यात यशस्वी नेतृत्व केले असून मिशन वर्ल्डकपच्या दृष्टीने त्याने संघाची बांधणी योग्य रित्या सुरू केले असल्याचे दिसत आहे.

                 आयपीएल लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या ईशान किशननेही जबाबदारी पूर्ण खेळ करत संघात बस्तान बसविण्याचे संकेत दिले आहेत. तर सुर्यकुमार यादवचे तेज दिवसेंदिवस प्रखर होत असल्याचे दिसते. दक्षिण आफ्रिकेत शेवटच्या वनडेत संधी मिळाल्यानंतर त्याने शानदार खेळाने आपल्याकडे सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
               
व्यंकटेश अय्यरला गोलंदाजीत विशेष करामत दाखविता आली नसली तरी फलंदाजीत योग्य वेळी योग्य कामगिरी करून त्याने त्याची उपयुक्तता सिद्ध केली आहे. तर हर्षल पटेल व दिपक चाहरही संघासाठी चांगली कामगिरी करण्यात सफल झाल्याने भारताची वाटचाल योग्य दिशेने चालू असल्याचे वाटते. अनुभवी भुवनेश्वर कुमारही या सामन्यात त्याच्या जुन्या लौकीकाप्रमाणे दिसला, अशीच लय त्याने राखली तर त्याचे संघातील स्थान अढळ राहील. युजवेंद्र चहलही वाईट अनुभवातून बरेच काही शिकला असल्याचे दिसून आले.
                  
एकंदर भारताची या सामन्यातील कामगिरी व कर्णधार म्हणून रोहीत शर्मा करत असलेली शानदार कामगिरी बघता भारत आपले "मिशन वर्ल्डकप" नक्कीच साध्य करेल असेच वाटते.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close