याबाबत सविस्तर वृत्त असे की, 'नाते शब्दांचे साहित्य मंच' हा समूह गेल्या तीन वर्षापासून साहित्य क्षेत्रात सेवाकार्य करत आहे. समूहात अनेक उपक्रम तसेच विविध कार्यक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे ऑनलाईन राज्यस्तरीय काव्य संमेलन होय. काल दि. ३० जानेवारी २०२२ वार रविवार ०१:०० वा. गूगल मिटच्या माध्यमातून ऑनलाईन काव्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यातील विविध विभागातील कवी, कवयित्रीनी संमेलनास हजेरी लावून आपल्या बहारदार रचना सादर केल्या त्यात कवी बालाजी नाईकवाडी येवला यांची पायवाट, कवयित्री कल्पना देशमुख मुंबई यांचे शेतकरी सुगी गीत, कवयित्री भावना गांधीले कोपरगाव यांची शाप, कवी डॉ.सुनील पवार बुलढाणा यांची दुःखाचा तुडवून ऊर, कवयित्री गीतांजली शेटे परभणी यांची सखी तू हसता, कवयित्री सुनिता इंगळे कोपरगाव यांची साऊ, कवी विशाल पाटील नंदुरबार यांची मिटवू व्यसनाधिनतेचा अंधार, कवयित्री वैशाली जाधव नाशिक यांची मोह सुमनांचा, कवी सचिन चव्हाण पाथर्डी यांची झाड, कवयित्री सीमाराणी बागुल नाशिक यांची आठवण तुझी, कवी शरद म्हंकाळे औरंगाबाद यांची जात, कवयित्री पुनम राऊत शेवगाव यांची श्रावण सरीं आदींनी आपापल्या शैलीत कवितांचे सादरीकरण करून संमेलनात काव्यरंग भरले. प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कोल्हापूरचे ज्येष्ठ साहित्यिक दिनकर पाटील सर यांनी मागे पडत असलेली वाचन संस्कृती वाढविणे व साहित्य यांची नव्याने उभारणी आणि बळकटीकरण होणे गरजेचे असल्याचे आपल्या मनोगतात मांडले, तर कवी व साहित्यिक पंडित निंबाळकर यांनी निःस्वार्थ आणि कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा न बाळगता आपल्या भावना कवितेत रेखाटण्याचे आवाहन सर्वांना केले.
केवळ यमक जुळावे म्हणून नव्हे तर काळजातून आलेले भाव शब्दांत मांडून शब्दांची छानशी शृंखला तयार करावी, चांगला कवी किंवा साहित्यिक होण्यासाठी इतरांच्या अनेक कविता वाचणे, ऐकणे देखील महत्वाचे असते असे व यासारख्या महत्वपूर्ण बाबी आपल्या अध्यक्षीय भाषणात साहित्यिका सौ. माधुरी चौधरी यांनी व्यक्त केल्या. आपल्या समूहाच्या साहित्यिक वाटचालीचा लेखाजोखा समूह प्रमुख म्हणून संमेलनाचे आयोजक कवी ज्ञानेश्वर शिंदे यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्वांसमोर ठेवला. आपल्या खुमासदार सूत्रसंचालनाने सर्वांना सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत शब्दांनी बांधून ठेवण्यात कवयित्री चंदन तरवडे यशस्वी झाल्या. स्वागतगीत आणि इशस्तवन आपल्या सुमधुर आवाजात गाऊन कवयित्री राजश्री वाणी मराठे यांनी उपस्थितांची दाद मिळविली.
आभार प्रदर्शन कवी ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले असून कोरोनाचे सावट जाताच प्रत्यक्ष ऑफलाईन स्नेहसंमेलन आयोजित करणार असल्याचे सांगितले. राष्ट्रगीताने संमेलनाची सांगता करण्यात आली.

