प्रहार स्वबळावर निवडणूक लढणार - जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे
वरिष्ठांच्या आदेशाने देवळालीची कार्यकारिणी लवकरच जाहीर होईल - आप्पासाहेब ढुस
देवळाली प्रवरा - दि. २७ फेब्रुवारी
प्रहार जनशक्ती पक्षाच्या श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांचे नेतृत्वाखाली देवळाली प्रवरा येथील २०० नागरिकांनी आज प्रहार जनशक्ती पक्षाचे फॉर्म भरून पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. पैकी प्रातिनिधिक स्वरूपात २५ महिला व पुरुष नागरिकांनी श्रीरामपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांचे हस्ते पक्षाची शाल स्वीकारून पक्ष प्रवेश केला.
पक्ष प्रवेश करणारांमध्ये प्रामुख्याने देवळाली प्रवरा येथील सुनील कदम, विजय कुमावत, भाग्यश्री कदम, ज्ञानदेव खांदे, दत्तात्रय मुसमाडे, ज्योती थोरात, आशा माळी, सुरेखा शिंदे, दीक्षा इंगवले, प्रभाकर कांबळे, संतोष सरोदे, मीरा गायकवाड, कविता सरोदे, संगीता सोज्वळ, अबिद शेख, विशाल गायकवाड, ओंकार मुसमाडे, अमोल अंबिलवादे, डॉ. वर्षा संसारे, फ्रान्सिस संसारे, नईम पठाण आदीं मान्यवर होत.
या प्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे, उत्तर कार्याध्यक्ष नवाज शेख, प्रकल्प ग्रस्त अध्यक्ष कृष्णा सातपुते, कायदा सल्लागार पांडुरंग औताडे आदी जिल्हा संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
तसेच श्रीरामपूर शहराच्या पक्ष कार्यकारिणीची मुदत संपल्याने आप्पासाहेब ढुस यांचे स्वाक्षरीने व हस्ते नूतन कार्यकारिणी गठीत करण्यात आली. त्यामध्ये श्रीरामपूर शहर अध्यक्षपदी विवेक माटा, तालुका संघटक रमेश भालके, तालुका उपअध्यक्ष दीपक पटारे, तालुका युवक उपाध्यक्ष दीपक कांगुणे, तालुका युवक कार्याध्यक्ष नानासाहेब तागड, शहर विद्यार्थी आघाडी शुभम बोरकर, शहर उपाध्यक्ष प्रभाकर वाकचौरे आदींना पदभार प्रमाणपत्र देऊन सन्मानाने नियुक्ती देणेत आली.
या प्रसंगी बोलताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांनी निवड झालेल्या सर्व नूतन सदस्य आणि प्रवेश केलेल्या सदस्यांचे स्वागत करून आभार व्यक्त केले व श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व निवडणूका प्रहार जनशक्ती पक्ष स्वबळावर लढविणार असल्याचे सांगितले.
प्रसंगी बोलताना आप्पासाहेब ढुस म्हणाले की, जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले या विचारांचा हा पक्ष असल्याने आमचे आवाहनाला प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य जनता ना. बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली स्थापित झालेल्या प्रहार जनशक्ती पक्ष्यात प्रवेश करणेसाठी पुढे येत आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रहार मध्ये प्रवेश करणे साठी आम्ही केलेल्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्याचाच एक भाग म्हणून देवळाली प्रवरा हद्दीतील २०० पेक्षा जास्त नागरिकांनी प्रहार मध्ये प्रवेश केला असून आज प्रातिनिधिक स्वरूपात २५ नागरिकांनी जिल्हा अध्यक्ष अभिजित पोटे यांचे हस्ते पक्षात प्रवेश केला आहे. देवळाली प्रवरा सह जवळपास ची ३२ गावे आणि समस्त श्रीरामपूर तालुक्यातून खूप साऱ्या नागरिकांनी प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करणेस सुरुवात केली असून त्यामध्ये श्रीरामपूर येथील लक्ष्मण खडके, कडीत बुद्रुक येथील गंगाराम बाचकर, अनिल बाचकर, अमोल मेनगर आदीं नागरिकांचा समावेश आहे.
ना. बच्चूभाऊ कडू यांचे विचार आणि कार्य समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविणेचे आणि ज्या ठिकाणी अन्याय होतोय तिथे सर्व ताकदीने उभे राहणेचे कार्य आम्ही करणार असल्याचे ढुस यांनी या प्रसंगी बोलतांना सांगितले. व प्रवेश घेतलेल्या सदस्यांना लवकरच वरिष्ठांच्या मान्यतेने योग्य ते पद बहाल करून पक्षाची जबाबदारी सोपविण्यात येणार असल्याचे सांगितले.
तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचे सफाई कामगारांना त्यांच्या घामाचे दाम म्हणजे त्यांच्या फरकाची रक्कम मिळवून देण्यासाठी आणि प्रसादनगर येथील अतिक्रमित जागा तेथील नागरिकांच्या नावावर करून देणेसाठी लवकरच प्रहार स्टाईल आंदोलन हाती घेतले जाणार असल्याचे सांगून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील जास्तीत जास्त नागरिकांनी प्रहार मध्ये प्रवेश करण्याचे आवाहन या ढुस यांनी या प्रसंगी केले.

