shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

टिम इंडियाला रोहीतच्या नेतृत्वाचा परिसस्पर्श ; श्रीलंकेवर सफाईदार विजय..!


            श्रीलंकेचा भारत दौरा अतिशय निरस अवस्थेत संपला. प्रथम टि-२० मालिकेत सुफडासाफ झाल्यानंतर कसोटी मालिकेतही साफ धुव्वा उडाला. या संपूर्ण दौऱ्यात लंकेच्या संघाकडून प्रतिकार असा झालाच नाही. आजपर्यंत लंकेने भारताचे नऊ कसोटी दौरे केले मात्र अद्याप त्यांना भारतात मालिका विजय मिळाला नाही. मात्र या मालिकेसह सलग सात मालिका गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर आली असून सांत्वन म्हणून दोन मालिका बरोबरीत सुटल्या हिच काय ती त्यांची भारतातील जमेची बाब म्हणावी लागेल. या दौऱ्याचा विचार केला तर त्यांच्यासाठी पॉझिटीव्ह असे काही घडलेच नाही. कर्णधार दिमुथा करुणारत्नेने बंगलोरला शतक ठोकले हिच काय ती एवढया मोठया पडझडीत त्यांच्यासाठी समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल.

                 टि-२० विश्वचषक स्पर्धेनंतर रोहीत शर्माने द.आफ्रिका दौरा वगळता भारताचे नेतृत्व स्विकारल्यानंतर तीन संघाविरूध्द क्रिकेटच्या तिनही प्रारूपातील पाच मालिकात भारताचे नेतृत्व केले. त्यामध्ये खेळून एकूण चौदा पैकी सर्वच्या सर्व सामने जिंकून भारतीय क्रिकेटमध्ये आलेली मरगळ मोठया प्रमाणात दूर केली असून आता भारताचे क्रिकेट पूर्वपदावर येत असल्याचे सुवर्ण संकेत दिले आहे. शिवाय विश्व कसोटी अजिंक्य पदाच्या स्पर्धेत पिछाडीवर पडलेल्या भारतीय संघाने चौथ्या स्थानावर झेप घेतली असून अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
             रोहीत शर्माने भारताच्या तीनही संघांचे नेतृत्व स्विकारल्यानंतर संघाच्या रचनेत मोठे बदल केले असून खराब फॉर्मातील व अनफिट खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखविला. तसेच संघात नव्याने आलेल्या व जुन्या खेळाडूत आत्मविश्वास जागृत करून त्यांच्याकडून सर्वोत्तम कामगिरी काढून घेण्याचा आपला सपाटा सुरूच ठेवला असून संघाच्या कामगिरीत लक्षणीय बदल झाल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे तीनही प्रारूपातील विश्वजेतेपद मिळविण्याच्या भारताच्या आशांना बळ मिळत आहे.
              या मालिकेत भारतासाठी बऱ्याच सकारात्मक बाबी घडल्या असून रोहितचे नेतृत्व त्याचा पहिला भाग आहे. तर अनुभवी अजिंक्य राहाणेच्या जागेवर खेळताना श्रेयस अय्यरने आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित करताना गरजेच्या वेळी संघासाठी जबाबदारीने खेळून धावाही बनविल्या तर अष्टपैलू रविंद्र जडेजाने दुखापतीतून सावरून संघात परतल्यानंतर प्रथम टि-२० मालिकेत व नंतर खास करून मोहालीत बॅट व बॅालने परिपक्व कामगिरी संघाला मोठा आधार देऊन गेलीच पण जडेजाला आयसीसी रँकींग मध्ये अष्टपैलू खेळाडूत सर्वोच्च मानांकनही देऊन गेली. मोहाली कसोटी तर ' स्पेशल जडेजा टेस्ट ' च होती !
           दक्षिण आफ्रिकेत गचाळ यष्टीरक्षण व बेजबाबदार फलंदाजीमुळे टिकेचा धनी बनलेल्या रिषभ पंतने श्रीलंकेविरुद्ध यष्टीच्या मागे व पुढे जोरदार कामगिरी करताना स्वतःच्या कौशल्यात अमूलाग्र बदल झाल्याचे दाखवून देताना कसोटीत माालकावीर ठरणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरण्याचा पराक्रम केला.
             याशिवाय चेतेश्वर पुजाराच्या अकरा वर्षानंतर रिक्त झालेल्या जागेवर खेळताना हनुमान विहारीनेही आश्वासक खेळी केल्याने तिसऱ्या क्रमांकावर कसोटीत सक्षम पर्याय त्याने उभा केला आहे तर जसप्रित बुमराहाने उपकर्णधारपद भूषविताना भारतात प्रथमच पूर्ण मालिका खेळली व आपल्या धारदार गोलंदाजीने श्रीलंकेच्या फलंदाजांचे कंबरडेच मोडले. रविचंद्रन आश्विननेही कपिलदेव, डेल स्टेन यांना सर्वाधीक बळीच्या तालिकेत खाली खेचले असून मालिकेत अचूक मारा करताना सर्वाधिक बळीही टिपले.
                या सर्व जमेच्या बाजू घडत असताना काही चिंताजनक गोष्टींनीही डोके वर आहेत. जखमी केएल राहुलच्या अनुपस्थितीत संधी मिळालेला सलामीवीर मयंक अग्रवाल सातत्याने अपयशी ठरला. शिवाय मागील ७४ डावात व ८६१ दिवसांपासून आपल्या लौकिकाला न्याय न देणाऱ्या विराट कोहलीचे फलंदाजीतील अपयश व ढसळता आलेख भारताला खास करून कोहलीला त्रास दायक ठरत असून ही मोठी चिंताजनक गोष्ट बनली आहे.
              रोहीत शर्मा नेतृत्वाच्या सर्व परीक्षा एकामागून एक पास होत असताना त्याची बॅट मात्र मौन रूप धारण करून आहे. रोहीत कडून भारताला खेळाच्या सर्वच क्षेत्रात सरस कामगिरीची गरज असल्याने त्याचे फलंदाजीतील अपयशी होणे संघासाठी काळजी वाढविणारी बाब आहे.
               भविष्यात या सकारात्मक गोष्टी टिकून राहील्या व नकारात्मक बाबीत सुधारणा झाल्या तर भारतीय क्रिकेट नक्कीच आपले मिशन वर्ल्ड कप साकार करेल !
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close