अहमदनगर (शौकतभाई शेख:) - येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा अनोख्या पद्धतीने विरोध करत त्यांना काटेरी गुच्छ पाठवत राज्यपाल पदावरून पाय उतार करण्याचा जनादेश देत डेक्कन थर्डी बुके (निंवडुंगाचा काटेरी गुच्छ) देवून अंतिम निरोप देण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध म्हणून त्यांना अहमदनगर मधून काटेरी गुच्छ पाठवण्यात आला आहे. भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन,पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे हा गुच्छ सुपूर्द करण्यात आला. राज्यपालांना पदावरून पायउतार व्हावं,असा जनतेच्यावतीने निरोप देण्यासाठी हे आंदोलन केल्याचं सांगण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी संबळाच्या निनादात हातात तिरंगा ध्वज घेऊन हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी या आंदोलनात संघटनेचे निमंत्रक अॅड. कारभारी गवळी,अशोक सब्बन,वीरबहादूर प्रजापती, अर्शद शेख, बबलू खोसला, विठ्ठल सुरम,सुनिल टाक, शाहीर कान्हू सुंबे, आनंद आढाव, कारभारी वाजे, भिमराज वाजे, नंदा साबळे, विजय अवचिते,भाऊसाहेब वाबळे आदी सहभागी झाले होते.
अॅड.गवळी यांनी सांगितलं की, राष्ट्रपती आणि सर्व महामहीम राज्यपालांकडे उन्नत शिवचेतनेचे शिरोमणी या नजरेतून भारतातील जनता पाहत असते. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर कार्यक्रमात महाराष्ट्राचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेजबाबदार वक्तव्य केले. तसेच क्रांतीसूर्य महात्मा फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्याबद्दल देखील चुकीचे उद्गार काढले. झालेल्या चुकीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त करण्याचं औचित्यही दाखवलं नाही. यातून राज्यपालानी भारतीय संविधानानुसार घेतलेल्या शपथेचा विसर पडल्याचं स्पष्ट होत आहे. जात, धर्म, पंथ, प्रादेशिक वाद यांच्यापलिकडे विचार करण्याची बुद्धी क्षमता देखील त्यांच्यात राहिली नसल्याचं यावरून दिसून येते. तमाम जनतेसमोर त्यांना आदर्श निर्माण करता आलेला नाही. राज्यपाल म्हणून तटस्थ पद्धतीने सतत वर्तन करणे अपेक्षित असताना, त्याऐवजी विशिष्ट विचारसरणीचे, समाजविघातक तत्त्वज्ञान समोर ठेवून चुकीचे वागल्याचा आरोप संघटनेने केला आहे.दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून पायउतार होण्यासाठी जनतेच्या वतीने कायमचा निरोप देण्यासाठी हा काटेरी गुच्छ व निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले, अशी माहिती संघटनेकडून देण्यात आली आहे.

