राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. २८-३-२०२२
अहमदनगर - येथील साहित्य चळवळीचे सेवाभावी केंद्र असलेल्या शब्दगंध प्रकाशनतर्फे २६ जानेवारी २०२२ रोजी प्रकाशित झालेला विज्ञान शिक्षिका कवयित्री विद्या रामभाऊ भडके लिखित 'उठे तुफान काळजात 'हा ८४ पृष्ठांचा ४९ कवितांचा संग्रह म्हणजे "स्त्री मनाचा उत्कट आविष्कार आहेे."
कवयित्री विद्या रामभाऊ भडके या नागरदेवळे ता. जि. अहमदनगर येथील असून त्या १५ वर्षांपासून उपशिक्षिका म्हणून अध्यापन करीत आहेत.शेवगांव तालुक्यातील बोधेगांव येथील श्री शिवाजी हायस्कुल येथे कार्यरत आहेत.अनेक साहित्यिक, सामाजिक,शैक्षणिक, सेवाभावी कार्यात सहभागी असणाऱ्या विद्या भडके यांची कविता ही अनुभवातून आविष्कृत झाली आहे, या कवितांना प्रबोधनाचा सुगंध आणि राजहंस मनाची निर्मळता लाभलेली आहे.
या कवितासंग्रहाचे प्रकाशन अहमदनगर येथील कोहिनूर मंगल कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार आणि साहित्यचर्चेत संपन्न झाले. शब्दगंधचे संस्थापक सचिव सुनील गोसावी,सौ.शर्मिला गोसावी,कु.दिशा गोसावी, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे,डॉ.संजय कळमकर,प्रा. डॉ.संदीप सांगळे, प्राचार्या डॉ. गुंफाताई कोकाटे, संगीता फासाटे,कवी चंद्रकात पालवे, ज्ञानदेव पांडुळे,प्रा.डॉ.अशोकराव कानडे आदिंच्या उपस्थितीत झालेला हा सोहळा म्हणजे मराठी कवितेचा जागर ठरला.विद्या भडके यांचे पती अनिल धाडगे, मुलगा गणेश, मुलगी साक्षी आणि परिवाराने कवयित्रीला बळ आणि प्रतिष्ठा दिली.या कौंटुबिक जाणिवांचा काव्यधागा या संग्रहाला आहे.आई स्व.रुक्मिणी रामभाऊ भडके यांच्या चरणी समर्पित केलेला हा कवितासंग्रह प्रेमजिव्हाळ्याने युक्त आहे.'आई 'या कवितेत त्या लिहितात,
"अस्थिर माझ्या जीवनाला तुझ्याविना जगणेच असह्य मला,कसे फेडू ऋण तुझे मी अंतच नाही तुझ्या प्रेमाला."
आई म्हणजे आत्म्याचा ईश्वर असतो,तो नसल्यावर मन अगतिक बनते, ही वत्सल भावना मनात पाझरत राहते. विद्या भडके या जे चांगलं दिसतं ते वेचणाऱ्या संमजस शिक्षिका आहेत.विद्यार्थी गुणशील, संस्कृतीशील, ज्ञानशील झाला पाहिजे,या जाणिवेतून त्यांनी अनेक कविता लिहिल्या आहेत, गौतम बुद्ध, जिजाऊ, छत्रपती शाहू महाराज, संत ज्ञानेश्वर अभंग,सावरकर,जाणता राजा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, प्रभू परशुराम अशा थोर विभूतींच्या विचार,कार्यविषयक कविता म्हणजे संस्कार देणाऱ्या कविता आहेत. कोविड १९ च्या महामारीने सारे जग भयग्रस्त झाले,या जाणिवेच्या कविता वाचनीय आहेत,आता आपणच आपली काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी आरोग्य आणि संस्कार जपले पाहिजे,पर्यावरण रक्षण केले पाहिजे,या संदर्भाने त्यांनी लिहिले आहे, "झाडे लावा, झाडे वाचवा" मंत्र हा जपावा",निसर्ग देईल भरभरून,वृक्ष सखा समजावा"
कवयित्री विद्या भडके यांनी या अगोदर "स्मृती "हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे.त्यातील अनुभवांचे अधिक समंजस आणि अनुभवी जीवनसंदर्भ या कवितासंग्रहात आलेले आहेत. एक मुक्त चिंतन आणि कोणत्याही तांत्रिक चौकटीत, साहित्यनियमात न अडकता या कविता हृदयातून पाझरल्या आहेत,त्यामुळे या कवितांना मनाचा ओलावा आणि प्रांजळतेचा आधार लाभला आहे. कोणी कसं लिहावं ? आणि काय लिहावं ? हे प्रश्न म्हणजे साहित्याच्या बेडया आहेत, मनाचं स्वातंत्र्य आणि आभाळाची मुक्त विहार भरारी घेणारी ही कविता मनाला भावणारी आहे,आईची माया आणि भूमीची निरागसता जोपासणारा "उठे तुफान काळजात " हा हृदयस्पर्शी कवितासंग्रह आहे, सौ. शर्मिला गोसावी यांनी सुचविलेले हे शीर्षक अगदी सार्थ आहे.स्त्री मनातले हे तुफान शब्दबद्धी करताना कवयित्री लिहितात,
"उठे तुफान काळजात,धैर्याने देऊ तोंड आता,आली संकटे कितीही माणुसकीने वागू आता"आज जग विनाशाच्या सीमेवर उभे आहे,
विज्ञान हे वरदान ठरण्याऐवजी शाप ठरू पाहत आहे.माणसाने माणसाचे जगणे भयग्रस्त केले आहे, महामारी,युद्धभय, दहशतवाद,जातीय,धर्मांधवृत्ती, विकृत राजकारण,समाजकारण, सहकारातील स्वाहाकार आणि व्यसनांध व्यवसायवृद्धी, मांसाहारीवृत्ती,अपेय द्रव्य आणि भ्रष्ट आचार वाढत आहे, त्यासाठी सजग आणि समंजस राहून माणुसकीचा मंत्र जपू असा संदेश देणारा हा कवितासंग्रह मौलिक जीवनसूत्र देणारा आहे, यानिमित्ताने कवयित्री विद्या भडके यांना पुढील लेखनासाठी भरभरून शुभेच्छा आहेत.
- डॉ. बाबुराव उपाध्ये,
माजी मराठी विभाग प्रमुख,
'निर्मिक ; इंदिरानगर, श्रीरामपूर जि.अहमदनगर - ४१३७०९,
भ्रमणभाष-९२७००८७६४०
============
'उठे तुफान काळजात '
= सौ.विद्या रामभाऊ भडके/धाडगे ,प्रकाशक, सुनील गोसावी, शब्दगंध प्रकाशन अहमदनगर
पृष्ठ ८४ किंमत १०० रुपये

