ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजास अपशब्द वापरल्याबद्दल इंदापूर येथे तहसील कचेरीवर भव्य मोर्चा काढून दिले निवेदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुका नाभिक महामंडळ यांच्या वतीने इंदापूर नगरपालिके पासून ते इंदापूर तहसील कार्यालय पर्यंत मोर्चा काढून ना. रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल जे अपमानकारक अपशब्द वापरले त्याबद्दल महाराष्ट्र नाभिक महामंडळ इंदापूर तालुका यांच्या वतीने इंदापूर तहसील कार्यालय येथे जोरदार घोषणाबाजी करत तहसीलदार श्रीकांत पाटील यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, देशाचे केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष नामदार रावसाहेब दानवे यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरून नाभिक समाजाचा अपमान केला आहे. राजकीय भाषणे देताना यांना बहुजन समाजाला उद्देशून भाषण देण्यासाठी बहुजन समाजातील जाती यांच्या दावणीच्या जहागिरी नाहीत. तरी सुद्धा तीन वर्षे अगोदर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आता केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बहुजन समुहातील नाभिक समाजाचा निंदनीय शब्दात अपमान केला आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील नाभिक समाजाच्या भावना तीव्र झाल्या असून आपण त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांनी समाजाची केलेल्या बदनामी बद्दल जाहीर माफी मागावी असे निवेदन या अगोदर सुद्धा जिल्हाधिकारी मार्फत आपणास देण्यात आले होते . परंतु त्यावर कुठलीही भूमिका घेण्यात आलेली नाही. त्याकरिता आज संपूर्ण राज्यभरात नाभिक समाजासह बहुजन समाजातील बरेच जात समूहांनी रस्त्यावरून उतरून निदर्शने केली व जिल्हाधिकारी मार्फत आपणास निवेदन देत आहोत. जर येत्या आठ दिवसाच्या आत समाजाची माफी मागितली नाही. तर केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालना येथील निवासस्थानी मोठ्या संख्येने राज्यातील नाभिक समाज गोळा होणार व त्यांच्या घरासमोर केस मुंडण आंदोलन केल्या जाईल. यापासून राज्यात कुठलीही विपरीत परिस्थिती निर्माण झाली तर त्यास सर्वस्वी शासन जबाबदार राहील असे निवेदन पत्रा मध्ये नमूद करण्यात आले आहे.
हे निवेदन पत्र देताना महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश राऊत, इंदापूर तालुका नाभिक महामंडळ अवधूत पवार, शहराध्यक्ष संतोष शिरसागर तसेच सर्व नाभिक समाज व इतर संघटना व पक्ष कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून पाठिंबा दित निवेदन पत्र देण्यात आले.

