shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वसुली वरून अंबाजोगाईत शासनाच्या दोन विभागांची एकमेकावर कुरघोडी महावितरणने तहसील उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा विद्युत पुरवठा तोडला, तर तहसीलने महावितरण कार्यालयाला ठोकले सील..!!


 
प्रकाश मुंडे | बीड जिल्हा प्रतिनिधि  :- 
अंबाजोगाई येथील तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विद्युत बिलापोटी जवळपास पाच लाख रुपये थकल्याने महावितरणने या दोन्ही कार्यालयाचा विद्युत पुरवठा खंडित केला. तर ही कारवाई जिव्हारी लागल्याने महसूल विभागाने ही एकूण 70 लाखांचा कृषी कर थकवल्याने अंबाजोगाई येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयाला सील ठोकले. दोन्ही विभागाने जशास तसे उत्तर दिल्याने शासकीय कार्यालयांच्या एकमेकांवरील कुरघोडी ची चर्चा शहरात रंगली आहे.

मार्च एण्ड मुळे सध्या सर्वच विभागांचा वसुलीवर जोर आहे. अंबाजोगाई शहरासह ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीने थकीत बिलापोटी वसुली करण्यावर भर दिला आहे. तसेच महसूल विभाग व कृषी कराच्या वसुलीवर भर देत आहे. महावितरणचे वीज बिलापोटी अंबाजोगाई तहसील कार्यालयाकडे तीन लाख 94 हजार रुपये तर उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे 85 हजार रुपये थकले होते. यापैकी एक लाख 37 हजारांच्या रकमेचा धनादेश दोन दिवसापूर्वीच महावितरणला देण्यात आला होता. तरी देखील मोठी रक्कम थकीत असल्याने कार्यकारी अभियंता यांच्या आदेशाने महावितरणच्या वसुली पथकाने आज शुक्रवारी (दि. 25) तहसिल आणि जिल्हाधिकारी कार्यालयासह तहसीलदारांच्या निवासस्थानाचा विद्युत पुरवठा तोडला. यामुळे शुक्रवारी दिवसभर या दोन्ही कार्यालयातील कामकाज विजेच्या अभावी ठप्प होते.

दुसरीकडे ही कारवाई जिव्हारी लागल्याने महसूलनेही वीज वितरण कंपनीला चांगलाच दणका दिला. महावितरण कार्यालयाकडे कृषी करापोटी थकलेल्या 68 लाख 84 हजार रुपयांच्या थकबाकी चा दाखला देत तहसीलदार बिपिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांच्या पथकाने महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयाला सील ठोकले. त्यामुळे महावितरणच्या कार्यालयातही महसूल कार्यालया प्रमाणेच गोंधळ उडाला. प्रशासनातील दोन विभागातील बदल नाट्याची चर्चा मात्र शहरात रंगली आहे.

 दरम्यान दोन्ही विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्राथमिक टप्प्यात तहसीलदारांचे निवासस्थान वगळता दोन्ही कार्यालयांचा विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
close