*श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात लिंगभाव संवेदनीकरण या विषयावर कार्यशाळाचे आयोजन*
इंदापूर प्रतिनिधी- श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटीचे श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता सुधारणा कक्ष आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवशीय युवक युवती उन्नयनीकरण कार्यशाळा लिंगभाव संवेदनीकरण या विषयावर आयोजित केली होती. सदर कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मेघा सस्ते आणि डॉ संजय मोरे उपस्थित होते. लिंगभाव संवेदनीकरण करणे काळाची गरज आहे .असे प्रतिपादन डाॅ.मेघा सस्ते यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. लहू वावरे होते. त्यांनी आपल्या मनोगतामध्ये
स्त्रिया आणि पुरुष यांच्या शरीररचनांमध्ये फरक आहे, पण समाजामध्ये स्त्रिया आणि पुरुषांबाबत जे भेदभाव केले जातात, त्या सर्वांचे कारण आपल्याला त्यांच्या शारीरिक फरकांमध्ये सापडेलच असे नाही. लिंग हे शारीरिक आहे तर लिंगभाव समाजात घडवला जातो. अर्थात काळानुसार आणि समाज परिवर्तनाच्या प्रयत्नांमुळे लिंगभावाच्या कल्पना आता बदलत चालल्याचे/खुल्या होऊ लागल्याचेही दिसते. या लिंग भावाचा उल्लेख जेंडर असाही केला जातो. अशा तऱ्हेने लिंगभाव हा सामाजिक -सांस्कृतिक संरचनातून घडवला जातो उदा. जात, धर्म, वय इ. वेगवेगळ्या संस्कृतींनुसार लिंगभाव बदलत राहतो.लिंगभाव म्हणजे स्त्रियांचा वेगळा विचार नव्हे तर लिंगभाव म्हणजे एखाद्या समाजातील स्त्रिया आणि पुरुषांची सापेक्ष सामाजिक स्थिती. अर्थात आजपर्यंत प्रामुख्याने स्त्री आणि पुरुष ह्या दोन लिंगभाव अस्मितांचाच विचार झाला आहे. याहून भिन्न लिंग व लिंगभाव अस्मिता समजून त्याचीही लिंगभाव संवेदनशील दृष्टीकोनातून चिकित्सा होणे गरजेचे आहे. तसे काही प्रयत्न चालू असल्याचे दिसते. यासाठी अधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. घराघरात लिंगभाव संवेदनीकरणासाठी जागृती केली पाहिजे. असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजंली जाधव तर प्रास्ताविक श्रृतिका कोकाटे या विद्यार्थिनींनी केले . चेतन काटे यांने आभार मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

