shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

वादग्रस्त मांकडींगच्या नियमात बदल !


             इंटरनॅशनशल क्रिकेट कौन्सील म्हणजे आयसीसी संपूर्ण जगात खेळल्या जाणाऱ्या अधिकृत क्रिकेटवर नियंत्रण ठेवून संचलन करते, आणि संचलन करण्या करीता नियमांची गरज असते. वास्तविक आपण प्रत्यक्ष मैदानात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या नियमांचीच येथे चर्चा करणार असून सदर नियम बनविण्याचे काम आयसीसीच्या अखत्यारीतील एमसीसी म्हणजे मेरिलीबोर्न क्रिकेट कौन्सील ही संस्था करते. याच एमसीसीने क्रिकेटच्या काही जुन्या व रूढ झालेल्या नियमात बदल करून पूर्वीच्या नियमांमुळे होणारे वादविवाद टाळून खेळ निर्विविघ्नपणे पार पाडण्यासाठी नवीन नियम तयार केले आहे.


            यामध्ये सर्वात लक्षणीय बदल केला तो मांकडींगद्वारे धावबाद करण्याच्या नियमात. दुसरा बदल केला तो फलंदाज झेलबाद झाल्यानंतर स्ट्राईक कोणता फलंदाज घेईल या संदर्भात. तर तिसरा बदल केला तो चेंडूची चकाकी टिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाळेबाबत. 
           एमसीसीने झेलबाद व मांकडींग नियमात मोठे बदल करून चेंडूला लाळ लावण्याच्या गोलंदाजांच्या जुन्या सवयीला आता कायमचंच बंद केलं. आता फलंदाज झेलबाद झाल्यानंतर येणाऱ्या नवीन फलंदाजाच स्ट्राईक घ्यावी लागेल. तर वादग्रस्त असलेला मांकडींगला केराच्या टोपलीत टाकून अश्या रितीने बाद होणाऱ्या फलंदाजाला धावबाद म्हणून गणले जाणार आहेत.
           झेलबादच्या नव्या नियमांतर्गत यापुढे नवीन येणाऱ्या फलंदाजाला पहिला चेंडू खेळावा लागणार आहे. यापूर्वीच्या नियमात हा फटका मारल्यानंतर दोन्ही फलंदाज झेल घेण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत धावा धावत व आपसात खेळपट्टीचे टोक बदलत असे. तेव्हा दुसऱ्या टोकाकडील खेळाडू नंतरचा चेंडू खेळायचा व नवा फलंदाज नॉन स्ट्रायकींग एंडला जायचा. परंतु आता नव्या नियमानुसार नवा येणारा फलंदाजच स्ट्राईकवर येईल. मात्र षटकाच्या शेवटच्या चेंडूवर या  पद्धतीने फलंदाज झेलबाद झाला तर नॉन स्ट्राईकिंग एंडचा फलंदाज नव्या षटकाचा पहिला चेंडू खेेळेल व नवा आलेला फलंदाज नॉन स्ट्राईकींग एंडला उभा राहिल.
            आतापर्यंत मांकडींग हा विषय संपूर्ण जगभर अतिशय वादग्रस्त निर्णय ठरला असल्याने एमसीसीने यावर अतिशय जालीम तोडगा काढला असून या प्रकारे बाद होणारा फलंदाज आता धावबाद म्हणून गणला जाणार आहे. यापूर्वी नॉन स्ट्राईकींग एंडला उभा असलेला फलंदाज, गोलंदाज चेंडू टाकण्यापूर्वीच धाव घेण्याच्या उद्देशाने क्रिझच्या बाहेर निघायचा. त्या वेळी गोलंदाज बेल्स उडवून त्याला बाद करण्याचा प्रयत्न करायचे. या प्रकारात नियमात असला तरी त्याचा संबंध खेळ भावनेशी जोडला जात असे व संबंधीत गोलंदाजाला विनाकारण खलनायक बनविले जात असत. वास्तविक ती फलंदाजांची चुक असते परंतु आता यावर एमसीसीने तोडगा काढून संभावित विवाद मिटविण्याच्या दृष्टीने योग्य पाऊल टाकले. आता नव्या नियमानुसार नॉन स्ट्राईकिंग एंंडचा फलंदाज गोलंदाजाला चकवून बाहेर उभा असेल व गोलंदाजाने बेल्स उडविल्या तर नियमांचे उल्लंघन केले असे समजून तो धावबादच समजला जाईल व त्यासाठी कुठलीही वॉर्निंग देण्याची गरज नसेल.
             वेगवान गोलंदाज चेंडू स्विंग करण्यासाठी चेंडूची एक बाजू सतत चकाकती ठेवत असतात. ही चकाकी आणण्यासाठी  तोंडातील लाळेचा उपयोग केला जातो. मात्र कोरोना संक्रमण सुरू झाल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून आयसीसीने लाळेच्या वापरावर तात्पुरती बंदी घातली होती. मात्र त्यानंतरही गोलंदाजांना चेंडूला चकाकते ठेवण्यासाठी फारसे सायास पडत नसल्याने व अजूनही कोविडचे पूर्णपणे निरसन न झाल्याने एमसीसीने नव्या नियमानुसार लाळेच्या वापरावर कायमस्वरूपी बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून आता तो नियमांचा भाग बनला आहे.
             मागील काही दिवसात बऱ्याच नियमात बदल करून विवाद रहीत क्रिकेट खेळण्याचा आयसीसीचा मानस असल्याचे दिसून येते व त्याचा लाभ क्रिकेटची सभ्य गृहस्थांचा खेळ ही प्रतिमा जपण्यास साह्य ठरू शकते.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close