shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कृषि विद्यापीठात रब्बी तंत्रज्ञान दिवस व शिवार फेरी उत्साहात संपन्न ; विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी फायदा घ्यावा-डॉ. शरद गडाख..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                         गुरुवार दिनांक १० मार्च २०२२
कृषि विद्यापीठात रब्बी तंत्रज्ञान दिवस व शिवार फेरी उत्साहात संपन्न ; विद्यापीठातील तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त शेतकर्यांनी फायदा घ्यावा -संशोधन व विस्तार शिक्षण संचालक : डॉ. शरद गडाख..!!


राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाने संशोधनामध्ये गेल्या 52 वर्षात विविध पिकांचे 270 पेक्षा अधिक वाण, 1650 पेक्षा जास्त शिफारशी व 40 अवजारे संशोधीत केली आहेत. शेतकर्यांना प्रत्येक वाणाचे दर्जेदार बियाणे, उत्पादने देण्याच्या दृष्टीने 10 जिल्ह्यात 27 विक्री केंद्राद्वारे प्रयत्न करण्यात येत आहे. 
आपली शेती तंत्रज्ञानयुक्त करण्यासाठी शेतकर्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे प्रतिपादन संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचे 75 वर्षे व सन 2023 आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष निमित्ताने ज्वारी सुधार प्रकल्प येथे रब्बी तंत्रज्ञान दिवस व शिवार फेरी आणि चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना डॉ. शरद गडाख बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन कृषि विभागाचे विस्तार व प्रशिक्षण संचालक श्री. विकास पाटील व विद्यापीठाचे कृषि पदवीधर आयडॉल श्री. साहेबराव नवले उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ, कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, नियंत्रक श्री. सुखदेव बलमे, सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. हरी मोरे, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. शिवाजी जगताप व अहमदनगर येथील खत असोशिएशेनचे अध्यक्ष श्री. मुनोत उपस्थित होते. 
      प्रमुख मार्गदर्शन करतांना श्री. विकास पाटील म्हणाले की सन 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणुन साजरे होत आहे. या पार्श्वभूमीवर तृणधान्ये व कडधान्यांचे उत्पादन वाढले पाहिजे असे शासनाचे धोरण आहे. शरीरस्वास्थ उत्तम राहण्यासाठी मानवी शरीराला पुरेशा प्रमाणात अन्नद्रव्ये, प्रथीने, जीवनसत्वे व फायबर यांची गरज असते. त्यासाठी प्रत्येकाच्या आहारात तृणधान्याचा वापर वाढला पाहिजे. ते पुढे म्हणाले की शेतकर्यांनी केवळ आपले उत्पन्न व उत्पादकता न वाढविता आपल्या उत्पादनांचे मुल्यवर्धन करुन एखादा ब्रँड तयार केला व त्याची विक्री शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून केली तर त्याचा शेतकर्यांना जास्तीचा फायदा मिळेल. शेतकर्यांनी सेंद्रिय शेती करुन उत्पादनांची थेट विक्री व विकेल ते पिकेल या गोष्टींकडेही लक्ष दिले पाहिजे असे ते यावेळी म्हणाले. श्री. साहेबराव नवले आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की शेतीपुरक उद्योगाचे महत्व मला वेळीच समजल्यामुळे मी शेतीशी संबंधीत उद्योग करण्याचे ठरविले. श्रम व शेतकर्यांचा विश्वास या दोन महत्वाच्या गुणांच्या आधारे प्रगती करु शकलो.  डॉ. प्रमोद रसाळ यांनी शेतकर्यांना आपल्या शेतीमध्ये पंचसूत्री तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन केले. श्री. शिवाजीराव जगताप यांनी महाराष्ट्रातील तृणधान्यांच्या लागवड क्षेत्राविषयीची माहिती दिली. यावेळी हळगाव कृषि महाविद्यालयाचा विद्यार्थी संदेश ससाणे, शुभम तुपे, वडगाव मावळ येथील भात उत्पादक शेतकरी नितीन गायकवाड व देहरे येथील महिला शेतकरी सौ. उज्वला काळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वडगाव मावळ येथील शेतकरी नितीन गायकवाड, तकाराम लष्करे व तुकाराम गाढे यांचा भात पीक स्पर्धेतील यशाबद्दल मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. 

यावेळी डॉ. उत्तम चव्हाण, डॉ. सुरेश दोडके, डॉ. नंदकुमार कुटे, डॉ. दिपक दुधाडे व डॉ. सच्चिदानंद तांबे यांनी शेतकर्यांना रब्बी पिकांविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी रब्बी पिकांचे कृषि प्रदर्शन भरविण्यात आले होते. या प्रदर्शनात विद्यापीठाने विकसीत केलेले रब्बी पिकांचे तंत्रज्ञान दाखविण्यात आले. या प्रदर्शनास मान्यवरांनी आणि शेतकर्यांनी भेट दिली. पीक प्रात्यक्षिकांमध्ये रब्बी पिकांचे 10 वाण, भाजीपाला पिकांचे 16 वाण व हरभर्याचे 13 वाण असे एकुण 39 विविध पिकांच्या प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. 

याप्रसंगी आयोजित कृषि प्रदर्शनाचा लाभ शेतकर्यांनी घेतला. या प्रात्यक्षिकांना शेतकर्यांनी आवर्जून भेटी दिल्या. यावेळी शेतकर्यांनी विद्यापीठाचे तंत्रज्ञान जाणून घेतले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विजू अमोलिक यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. भगवान देशमुख आणि आभार प्रसारण केंद्र प्रमुख डॉ. पंडित खर्डे यांनी मानले. या प्रसंगी कृषि विद्यापीठाचे विविध विभागांचे विभाग प्रमुख, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कृषि विभागाचे उपविभागीय अधिकारी श्री. विलास नलगे, श्री. रविंद्र माने, श्री. कापसे, तालुका कृषि अधिकारी श्री. ठोकळ, शेतकरी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

      
close