पूर्णा । वार्ताहर :-
राज्याचे अल्पविकास मंत्री व परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालीच पाहिजे यासाठी येत्या अधिवेशनात भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार असून मलिकांचा राजीनामा घेतल्याशिवास विधानसभेचे कामकाज चालू दिले जाणार नाही, अशी माहिती भाजप नेते तथा माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज बुधवारी (दि.२) परभणीत पत्रकार परिषदेत दिली.
याप्रसंगी राहुल लोणीकर, भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ.सुभाष कदम, ज्येष्ठ नेते बाबासाहेब जामगे, संजय शेळके, विलास बाबर, बाळासाहेब जाधव, सुनीलबाबा देशमुख, जिल्हा सरचिटणीस संजय रिझवाणी, दिनेश नरवाडकर यांची उपस्थिती होती.
माजी मंत्री लोणीकर म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील अर्धे मंत्रीमंडळ कलंकित आहे. सर्व कंलंकित मंत्र्यांचे राजीनामे घेवून त्यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी भाजपची मागणी आहे.राज्यमंत्री संजय राठोड, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या झालेल्या गंभीर आरोपांनंतर भाजपने जोरदार आंदोलन करुन त्यांचे राजीनामे घेण्यात सरकारला भाग पाडले. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधातील सर्व पुरावे गोळा करुन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिक यांचे जमिनीचे गैंरव्यवहार सर्वांसमोर आणले आहेत.
आता ईडीने कारवाई करुन मलिकांना कोठडीत पाठवलेले आहे. तरीही महाविकास आघाडी सरकार अशा कलंकित मंत्र्याला पाठीशी घालून संरक्षण देत आहे. मलिक यांनी कोट्यावधी रुपयांची मालमत्ता अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम, त्याची बहीण हसीना पारकर व गुंडांच्या टोळीकडून काडीमात्र पैंशांत विकत घेतली असल्याचा आरोप लोणीकर यांनी यावेळी केला. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून मलिक यांनी जिल्ह्याचा कुठलाही विकास केला नाही की अल्पसंख्यांक विभागाची कोणतीही योजना आणली नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
महाविकास आघाडी सरकारही १०० टक्के नापास झाले असून कोरोना काळात राज्यातील रुग्णांना तसेच शेतकर्यांना मदत देण्यातही सरकार अपयशी ठरले. केवळ १० टक्के शेतकर्यांनाच पीकविमा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. हे सरकार केवळ घोषणा करीत आहे. गुन्हेगारांना धाक राहिलेला नाही, मंत्रीच कलंकित असतील राज्याचा विकास कोण करणार? असा सवालही लोणीकर यांनी केला.

