पूर्णा । वार्ताहर :-
रात्री पिकाला पाणी देताना आढळलेले साप ’स्वाभिमानी’ने आज गुरुवारी (दि.३) प्रशासनाच्या स्वाधीन करीत शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्याची मागणी केली.
शेतीला दिवसा वीज पुरवठा करण्यात यावा यासह इतर मागण्यांसाठी खा.राजू शेट्टी हे गेल्या आठ दिवसापासून धरणे आंदोलनाला बसले आहेत. शेतीला रात्री वीज पुरवठा करण्यात येतो, त्यामुळे शेतीचे कामे शेतकर्यांना रात्री करावी लागतात . रात्रीच्या अंधारात वन्यजीव संचार करत असतात. अशा परिस्थितीत जीव धोक्यात घालून शेतकरी पिकांची जोपासना करतो.
रात्री शेतीची कामे करताना सर्पदंश, रानडुकराचा हल्ला, विंचू चावणे, व इतर प्राण्याकडून जीवघेणे हल्ले होऊन शेतकरी जखमी होणे तर काही प्रसंगी जीव गमवावा लागल्याचे उदाहरणे घडत असतात. परंतु या पैकी जे वन्यजीव हे कायद्याने संरक्षित केलेले आहेत, त्या वन्यजीवांना जर काही इजा केली तर आपल्यावरच गुन्हा नोंद करण्यात येत असतो. त्यामुळे काल रात्री शेंद्रा या गावातील शेतकर्यांना शेतीत दारे धरताना आढळलेला सर्प बाटलीत बंद करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली परभणीचे उपविभागीय अधिकारी शेवाळे यांच्या टेबलवर ठेवण्यात आला.
यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भास्कर खटिंग, गजानन तुरे, केशव आरमल, मुंजाभाऊ लोडे, जफरभाई तरोडकर, दिलीप शिंदे, उद्धव जवंजाळ, रामप्रसाद गमे, प्रसाद गरुड, नारायण गरड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

