shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

परभणीत अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे धरणे आंदोलन..!

पूर्णा । प्रतिनिधी :-
आयटक संलग्न महाराष्ट्र राज्य अंगणवाडी - बालवाडी कर्मचारी युनियन जिल्हा शाखा  परभणी च्या वतीने विविध मागण्यांसाठी आज गुरुवारी (दि.३) दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 

राज्य शासनाने अंगणवाडी सेविकांंच्या न्याय व कायदेशीर मागण्यांसाठी बजेटमध्ये आर्थिक तरतुद करावी व अंगणवाडी सेविका व मदतनीसांंना दरमहा पेन्शन, आजारपणातील रजा, मिनी अंगणवाडी सेविकांना नियमित सेविकांप्रमाणे मानधन, पदोन्नती, सुट्टया हे सर्व लाभ देण्यात यावेत या मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले.  जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठया संख्येने धरणे आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.


विविध मागण्यांसंदर्भात जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचार्यांना राज्य सरकारने शेवटची मानधन वाढ दि.१ ऑक्टोबर २०१७ पासून दिली. त्यानंतर महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. कोरोना काळात देखील अंगणवाडी कर्मचार्यांनी आवश्यक त्या सर्व सेवा दिल्या. त्याशिवाय कोविडचा प्रतिबंध करण्यासाठी आपल्या लाभक्षेत्रात सर्वेर्क्षणापासून लसीकरणासाठी सहकार्य करण्यापर्यंत सर्व कामे केली. ३० ते ४० वर्षे सेवा झाल्यावर सेवा समाप्त झालेल्या अंगणवाडी कर्मचार्यांना सध्या जो एकरकमी लाभ मिळतो तो अतिशय कमी असून ती रक्कम देखील गेल्या तीन-चार वर्षापासून थकीत आहे.

अंगणवाडी कर्मचार्यांना दैनंदिन कामकाजात मोबाईलचा वापर आवश्यक बनला आहे. त्यांना शासनाच्या वतीने २०१८ साली देण्यात आलेले मोबाईल कालबाह्य झाले असून बहुतांश मोबाईल बंद आहेत. राज्य शासनाने वेळोवेळी मानधनवाढ, मासिक पेन्शन, नवीन मोबाईलसाठी आर्थिक तरतुद करण्याचे तसेच अन्य अनेक मागण्यांबाबत कृती समितीसोबत बैठक घेऊन आश्वासने दिली. परंतू प्रत्यक्षात बजेटमध्ये तरतुदी करणे अत्यंत आवश्यक आहे. 

पंतप्रधान यांनी दि.११  सप्टेंबर २०१८ रोजी अंगणवाडी कर्मचार्यांना प्रधानमंत्री जीवनज्योती विमा, सुरक्षा विमा, अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना लागू करण्याची घोषणा केली. परंतू प्रत्यक्षात या तिनही योजनांची अंमलबजावणी झाली नाही. केंद्र शासनाने आयसीडीएस प्रकल्पासाठी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणावर तरतुद केली नाही व निव्वळ तोंडाला पाने पुसली, असा आरोपही करण्यात आला आहे. 

ऍड. माधुरी राजन क्षीरसागर , कॉ.ज्योती कुलकर्णी, कॉ. अर्चना फड , कॉ.ताहेरा बेगम , कॉ . राजश्री गाढे , कॉ.सीमा देशमुख , कॉ.सुनिता धनले, कॉ.अर्चना कुलकर्णी , कॉ.सविता ढाले , गोदावरी रासवे , रत्नमाला कदम , सुनिता भोळे , दैवशाला मापारी , अर्चना पुंजारे , अश्विनी वाघमारे , निर्मला राठोड , फारुकी , सलमा शिरीन , शमा परवीन , शाहेद बेगम , भिंगारे ताई , वर्षा चव्हाण , नफीसा बेगम , शिवशिला वाळवंटे , रेखा पानपट्टे , सरस्वती देवकते , आशा गाढे , संगीता ढवळे , कृष्णा ताई , देशमुख ताई ( सोनपेठ ) , नजमा बेगम यांच्यासह जिल्हा पदाधिकारी व जिल्हा कमिटी सदस्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला.
close