shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कुटुंबातील जेष्ठ स्त्रियांद्वारेच चांगल्या विचारांचे वहन होते- जिल्हाधिकारी आंचल गोयल..!


परभणी दि.१० मार्च
      परिवारातील ज्येष्ठ स्त्रियांनी मुलींना, सुनांना आचार विचाराचे स्वातंत्र्य व मुभा दिली तर पुढील अनेक पिढ्यांमध्ये निकोप विचारांचे नैसर्गिकरित्या वहन होते, असे मत जिल्हाधिकारी मा़. आंचल गोयल यांनी आपल्या व्यक्तीगत अनुभवातून व्यक्त केले. परभणी महिला संयुक्त कृती समितीद्वारे आयोजीत महिला, युवक, युवती मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. महापौर सौ.अनिता सोनकांबळे अध्यक्षपदी विराजमान होत्या.

      प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन  करतांना येथील बी.रघुनाथ महाविद्यालयाचे प्रा. सुनिल मोडक यांनी प्रचलीत शिक्षणपध्दती व त्याकडे असणारे शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष यावर कडाडून टीका केली. शिकत असतांना तरूण मंडळींनी प्रत्येक बाबतीत चिकित्सक वृत्ती अंगी बाणली तरच आयुष्यात येणाऱ्या अनेकविध समस्यांना समर्थपणे भिडण्याचे धैर्य व सामर्थ्य प्राप्त होऊ शकेल, हे मोडक सरांनी आपल्या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाअंती ठामपणे सांगितले.

   या कार्यक्रमाच्या दुसऱ्या प्रमुख वक्त्या, बीडच्या महिला कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ़.सविता शेटे यांनी अंधश्रद्धांचा महिलांवर किती जबरदस्त पगडा असतो व त्यामागे कोणत्या शक्ती कार्यरत असतात हे विषद केले. शिकलेल्या स्त्रियाही अंधश्रद्धेच्या कशा आहारी जातात हे दाखवून दिले. अशा निरर्थक गोष्टी आपण "का" करतो  हा प्रश्न कधीच स्वत:ला का विचारत नाहीत? अशा अनेक रूढींचे आचरण करतांना मी ते का करत आहे याबाबतचा कार्यकारण भाव मनाला पटला नाही तर परंपरांचे अंधानुकरण स्त्रियांनी करू नये असे ठोस व तर्कसंगत प्रतिपादन डॉ. सविता शेटे यांनी स्त्रियांनी उद्देशून केले.

      परभणीत गेल्या ३०-४०वर्षां पासून सामाजिक चळवळीत मोलाचे योगदान दिलेल्या ज्येष्ठ  महिला कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र, शाल व गुलाबपुष्प देऊन मा.जिल्हाधिकारी  यांचे हस्ते सन्मान करण्यात आला.वाचनाच्या व्यासंगाअभावी प्रचंड  ज्ञान व माहिती पासून तरूण पिढी वंचित राहू नये या प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाविद्यालयीन मुलामुलींना प्रेरक, माहिती पूर्ण व अंधश्रद्धा निर्मूलक पुस्तकांचे संच वितरीत करण्यात आले. 

     प्रारंभी प्रा.सुनिल मोडक,.डॉ़. सविता शेटे, महापौर सौ.सोनकांबळे यांचे हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.कु.वेदान्ती कानडे व श्रेयस धोंड यानी सुरेल स्वागतगीत सादर केले.अैड.माधुरी क्षीरसागर यांनी कार्यक्रमामागील भूमिका प्रास्तविक भाषणातून विषद केली.प्रा.सावीत्री चिताडे,सरोज देशपांडे, वर्षा देशपांडे, निलिमा वाघमारे ,आशा शोभणे  यांनी जोतिबा व सावित्रीबाई फुले यांना नमन सादर केले. उषा मिसाळ,उमा मळगे व ज्योती पाठक या वकील त्रयींनी अतिशय अर्थपूर्ण असे समतेचे गीत सादर केले.कृती समितीच्या अॅड माधुरी क्षीरसागर, हेमाताई रसाळ,सुहासिनी कावळे सरोज देशपांडे,पूनम मारवा, मलेका गफार यांनी व्यासपीठावरील सर्वांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.सौ सुहासिनी कावळे यांनी आभार प्रदर्शन केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड सुषमा वाठोरे यांनी केले. शहरातील सर्व नव्या जुन्या कार्यकर्त्यांनी लेडीज क्लब परिसरअक्षरश: गजबजून गेला होता.
close