महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्यांक कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्यावर आता प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ईडी ने कारवाई करून त्यांना ईडीच्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर अत्यंत गंभीर अशा प्रकारचे आरोप आहेत. अशा व्यक्तीला कोणत्याही घटनात्मक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, म्हणून आमची प्रामुख्याने मागणी आहे की, मुख्यमंत्र्यांनी तात्काळ नवाब मलिक यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
गेल्या अनेक दिवसांपासून आपण बघतोय की, महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप व कारवाई होत आहे. वस्तूस्थिती बघता कारवाई करणाऱ्या संस्था या स्वायत्त संस्था आहेत. ह्या सरकारी यंत्रणांचा कोणत्याही पक्षाशी संबंध नसतो. परंतु कोणतीही कारवाई झाली की ती राजकीय आकसापोटी केली, अशी जनतेच्या नजरेत धूळफेक करण्याचे काम महाविकास आघाडीतील नेते व कार्यकर्ते करत आहेत.
महाविकास आघाडीतील कोणत्याही ज्येष्ठ नेत्या बद्दल मी बोलू शकत नाही परंतु महाविकास आघाडीतील युवा कार्यकर्त्यांबद्दल नक्कीच बोलू शकतो. ज्या लोकांनी ९३ चा बॉम्बस्फोट घडवून आणला अशा देशद्रोह्यांशी आर्थिक संबंध ठेवणार्या नेत्याला आज युवा कार्यकर्ते पाठिंबा देत आहेत, ही लज्जास्पद व खेदजनक बाब आहे. देशद्रोही लोकांशी आर्थिक संबंध ठेवणे हे नवाब मालिकांचं देशविघातक कृत्य आहे.
युवा कार्यकर्त्यांनो तुम्ही जनाची नाही पण मनाची तरी लाज ठेवली पाहिजे, आज आपण कोणाच्या सांगण्यावरून रस्त्यावरती उतरत आहात, कोणाला पाठिंबा देत आहात याचे जरा भान युवा कार्यकर्त्यांनी ठेवायला पाहिजे. जे नवाब मलिक छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करू शकत नाही, छत्रपतींचा जयघोष करताना हात वर होत नव्हते. अशा व्यक्ती बद्दल तुम्ही आदर व्यक्त करता, त्यांच्यावर कारवाई झाल्यावर "झुकेंगा नही" अशी पोस्ट सोशल मीडियावर करता. हे तुमच्या कोणत्या संस्कारात बसते माहित नाही. पक्षा पेक्षा राष्ट्रहित महत्त्वाचे आहे हे विसरू नका.
प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष हि शिकवण कदाचित तुमच्या पक्षाने तुम्हाला दिलेली नसावी त्याचेच हे परिणाम आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या राजकीय पक्षाचे समर्थन करणे योग्यच आहे परंतु पक्षापेक्षा राष्ट्र श्रेष्ठ आहे हे विसरता कामा नये. राजकीय निवडणुका पक्ष्यांचे राजकीय अजेंडे याचे समर्थन करणं हा वेगळा भाग आहे आणि देश विघातक कृत्य करणाऱ्यावर कारवाई झाल्यावर त्याचे समर्थन करणे हा वेगळा भाग आहे, त्यात ती व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाची का असेना त्याचे समर्थन करणं चुकीचेच.
९३ च्या बॉम्बस्फोटात रक्तरंजित झालेली मुंबई, निष्पाप लोकांचे गेलेले जीव, उध्वस्त झालेले कुटुंब यांचा तुम्हाला विसर पडलाय का? जे निरपराधी लोक ह्या बॉम्बस्फोटात बळी पडले त्यांच्या कुटुंबियांची झालेली हाल एकदा तरी डोळ्यासमोर आणून बघा. आणि तरी देखील तुम्ही अशा लोकांचे समर्थन करताय. देशद्रोह्यांशी आर्थिक संबंध ठेवणे समर्थनीय आहे का? तुम्हाला येणारा काळ व पुढील पिढी कधीही माफ करणार नाही. महाराष्ट्रा मध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण धनगर आरक्षण, शेतकऱ्यांना एक रक्कामी एफआरपी, शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणी अशा प्रकारचे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांसंबंधी आपण रस्त्यावर उतरून व सोशल मीडियावर निदर्शन का करत नाही ? पण मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींची जमीन व्यवहार व मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील आरोपी नवाब मालिकांसाठी लगेच रस्त्यावर उतरून निदर्शने करता सोशल मीडियावर निदर्शन करता.
खरतर आपल्या रूपाने राजकीय आकसापोटी राष्ट्रहित बाजूला ठेवणारे युवक कार्यकर्ते आज दिसत आहेत.देशद्रोही व्यक्तीशी संबंध ठेवणाऱ्या नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी मागणी करणं सोडून त्यांचं समर्थन करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार सुरू आहे.
--------------: शब्दांकन :---------------
मा. जितेंद्र लक्ष्मण माळवदे
(तालुकाध्यक्ष, भाजपा ओबीसी युवामोर्चा राहाता तालुका)

