shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आयपीएल करंडक यंदा कोणाच्या हाती लागणार ?


             पंधरावी आयपीएल स्पर्धा येत्या २६ मार्च पासून महाराष्ट्रातील चार मैदानांवर खेळविली जाणार असून त्यामध्ये मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न व डि वाय पाटील तर पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोशिएशनच्या सहारा स्टेडियमवर खेळविली जाणार आहे. कोविड-१९ च्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी बीसीसीआयने खेळाडूंचा मोठा विमान प्रवास टाळण्यासाठी एकाच राज्यात मोजक्या मैदानांवर सदर स्पर्धेचे नियोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. 

              यंदाच्या सत्रात दोन नव्या संघांच्या आगमनाने स्पर्धेत भाग घेणाऱ्या संघांची संख्या दहा इतकी झाली असून पाच - पाच संघांचे दोन गट करण्यात आले असून मागील चौदा वर्षातील प्रत्येक संघांच्या कामगिरीनुसार रँकींग ठरविली असून मुंबई अव्वल तर चेन्नई दुसऱ्या स्थानावर आहेत. हे दोन्ही संघ वेगवेगळ्या गटात प्रथम मानांकनाचे संघ असतील. प्रत्येक गटातील संघ आपसात दोन सामने खेळणार असून दोन्ही गटातील समान क्रमाकांचे संघ आपसात दोन सामने खेळणार आहेत.
               गुजरात टायटन्स व लखनौ सुपर जायंट्स हे दोन नवीन संघ असल्याने त्यांचे कर्णधार नवे असणार हे उघड आहे. गुजरातचे नेतृत्व हार्दिक पांड्या तर लखनौचे केएल राहुल करणार आहे. मात्र पंजाब, आरसीबी, सीएसके, केकेआर, या संघांना देखील नवे कर्णधार मिळाले आहेत. पंजाबचे  मयंक अग्रवाल, आरसीबीचे फाफ ड्यू फ्लेसिस, सीएसकेचे रविंद्र जडेजा , तर केकेआरचे श्रेयस अय्यर प्रथमच नेतृत्व करणार आहेत.
                दिल्लीचे रिषभ पंत तर हैद्राबादचे केन विल्यमसन प्रथमच पूर्ण वेळ कर्णधारपद भूषविणार आहेत. या दोघांनी मागच्या सत्रात अनुक्रमे श्रेयस अय्यर व डेव्हीड वॉर्नर ऐवजी आपापल्या फ्रेंचाईसजचे नेतृत्व केले होते. मात्र विल्यमसनने सन २०१७ च्या सत्रात वॉर्नरवर सँड पेपर प्रकरणात बंदी असल्यामुळे पूर्ण वेळ नेतृत्व केले होते व संघाला अंतिम फेरीत पोहोचविले होते. मात्र ते हंगामी नेतृत्वच होते. आता मात्र विल्यमसन पूर्णवेळ कर्णधार असणार आहे.
                राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनचे हे नेतृत्वाचे दुसरे वर्ष असून इतर सर्व कर्णधारांप्रमाणे त्यालाही अजून स्वतः लाही सिध्द करायचे आहे. श्रेयसने सन २०२० मध्ये अर्धी स्पर्धा दिल्लीचे नेतृत्व केले होते. मात्र त्या वेळेस त्याने संघाला अंतिम फेरीत पोहोचविले होते. तर केएल राहुलने मागील दोन सत्रात अपयशी नेतृत्व केले असल्याने यंदा त्याच्यावर नव्या संघाची जबाबदारी आहे.
                  वरील सर्व संघनायकांच्या आयपीएल मधील कामगिरीवर नजर टाकली तर स्पष्ट दिसते की या सर्वांना स्वतःला कर्णधार म्हणून स्थापित करायचे असून आपले विजेतेपदाचे खातेही खोलायचे आहे. परंतु या सर्वांपुढे सर्वात मोठे व खडतर आव्हान आहे ते आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार रोहीत शर्माचे. सन २०१३ पासून त्याने नऊ सत्रात मुंबईचे नेतृत्व करताना सहा वेळा संघाला अंतिम फेरीत पोहोचविले तर विक्रमी पाच वेळा विजेतेपद पटकविले आहे. हाच रोहित शर्मा आजमितीला भारताच्या तिनही संघांच्या कर्णधारपदी असल्याने विल्यमसन सोडून प्रत्येक कर्णधारावर त्याचा मानसिक दबाव असणार आहे. शिवाय भारतीय संघात खेळायचे असल्यास रोहीतच्या मर्जीशिवाय संधी मिळणार नसल्याने या सर्व कर्णधारांची कामगिरी खास करून रोहीतच्या मुंबई इंडियन्स विरूध्द कशी होते हे बघणेही मनोरंजक असणार आहे.
             या वर्षी मेगा ऑक्शन झाल्याने प्रत्येक संघ पुनर्बांधणी प्रक्रियेतून जाणार असल्याने कोणता संघ भारी ठरेल हे सांगणे कठीण दिसते. मात्र प्रत्येक संघाने खरेदी केलेल्या खेळाडूंच्या आधारे जर बघायचे ठरविले तर लखनौ, दिल्ली, केकेआर, पंजाब, आरसीबी, राजस्थान, गुजरात, चेन्नई, हैद्राबाद व मुंबई अशी क्रमवारी दिसते. मुंबईने अगदी नवोदितांचाच संघ उभा केल्याने त्यांच्या संभावित कामगिरीकडे सर्वच जण संशयाने बघत आहेत. मात्र मुंबईचा गत इतिहास बघितला तर त्यांनी नेहमी मोठया नावांपेक्षा नवोदितांना संधी देऊन त्यांच्यात आत्मविश्वास ओतून त्यांच्याकडून भरीव कामगिरी काढून घेतली आहे. त्यामुळे मुंबईला हलक्यात घेऊन कमजोर समजणाऱ्यांच्या अकलेचे दिवाळे निघाले तर आश्चर्य मानू नये.
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close