शिर्डी । प्रतिनिधी :-
हृदयात प्रभूंच्या श्रीराम आणण्याकरता हृदयाला जर आपण अयोध्या बनवलं तर भगवान रामचंद्र आपल्या हृदयात येतील.प्रभुराम हृदयात आले तर सीतामाई येईल, सिता म्हणजे शांती, जिथे राम आहे तिथेच सीता आहे, आनंद आहे तिथे शांती आहे, अशाप्रकारे शांतीचा संदेश या ऐतिहासिक रामनवमीचा उत्सवानिमित्त साईबाबांच्या या पावनभूमीत श्री क्षेत्र सराला बेटाचे महंत श्री रामगिरी महाराज यांनी दिला असून ऐतिहासिक श्री रामनवमी उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री रामगिरी महाराज यांच्या शूभहस्ते प्रथमच ध्वजारोहण करण्यात आले.
दरम्यान शिर्डी शहरात श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था तसेच शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा १११ वा श्री रामनवमी उत्सव साजरा करण्यात येत आहे. शनिवारी सकाळी या उत्सवाचा पहिल्या दिवशी मा.उपनगराध्यक्ष अभय शेळके यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ध्वजस्तंभांचे श्री क्षेत्र सराला बेटाचे महंत पपू रामगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे विश्वस्त महेंद्र शेळके, सचिन गुजर,रामनवमी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते, ध्वजारोहणाचा कमिटीचे अध्यक्ष अभय शेळके,मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे, बाबासाहेब कोते, रमेश गोंदकर, श्री बारहाते, निलेश कोते, ताराचंद कोते, रवींद्र गोंदकर, राहुल गोंदकर, रवींद्र कोते, विकास गोंदकर, अजय नागरे, मुरलीधर देसले, बाळासाहेब सोनवणे, शिवाजी कोते, सलीम शेख आदी मान्यवरांसह शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी श्री साईबाबा मंदिराच्या प्रवेशद्वार क्रमांक चार समोर ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी प.पू रामगिरी महाराज प्रसारमाध्यमांशी बोलतांना म्हणाले की, ध्वजाचे एक विशेष महत्त्व असते.राजा ज्याप्रमाणे ध्वजासाठी संपूर्ण आयुष्य जीवन व्यतीत करीत असतो त्याप्रमाणे भक्तगण सुद्धा या ध्वजाला विशेष महत्त्व देत असतात. हा उत्सव स्वतः प्रत्यक्ष साईबाबांनी सुरू केलेला आहे साईबाबा हे रामभक्त होते त्यामुळे आपल्याला देखील हृदयामध्ये प्रभू रामचंद्रांना प्रकट करायचे आहे.योगी ज्याच्यामध्ये रममान होतात असा तो आनंद, त्याला राम असे म्हणतात.त्याला आपल्या हृदयात प्रकट करायचे आहे.दशरथ म्हणजे दहा इंद्रियांचा रथ म्हणजे मनुष्य शरीर बुद्धीची कुशाग्रथा म्हणजेच कौशल्या, हृदयात राम आणण्याकरता हृदयाला जर आपण अयोध्या बनवलं तर भगवान रामचंद्र आपल्या हृदयात येतील असेही त्यांनी म्हटले आहे.
याप्रसंगी शिर्डी नगरपरिषद ,शिर्डी अधिकारी आणि कर्मचारी यांच्या तर्फे श्री रामनवमी यात्रा उत्सवासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष कमलाकर कोते यांच्याकडे एक लाख दहा हजार रुपयांची रोख देणगी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री डोईफोडे यांच्या हस्ते सुपुर्द करण्यात आली.

