भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय विचारधारा व जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय पक्ष असणाऱ्या राजकीय पक्षाचे विषयी माहिती. भारतीय जनता पक्ष हा देशातील दोन सर्वात मोठ्या राजकीय पक्षांपैकी एक आहे. सध्या भारतीय जनता पक्ष हा सत्ताधारी पक्ष आहे, ज्याची केंद्राव्यतिरिक्त अनेक राज्यांमध्ये सरकारे आहेत. भारतीय जनता पक्षाची विचारधारा ही राष्ट्रीय स्वयंसेवक दल (RSS) पासून प्रेरित आहे. आरएसएस ही हिंदू विचारसरणीची संघटना आहे. जनसंघाची स्थापना 21 ऑक्टोबर 1951 रोजी डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी केली होती. 1977 मध्ये जनसंघामध्ये आणखी अनेक पक्षांचे विलीनीकरण झाल्यानंतर त्याचे नाव जनता पक्ष असे ठेवण्यात आले, परंतु 1980 मध्ये जनता पक्षाचे विघटन झाल्यानंतर त्याची पुनर्रचना होऊन त्याचे नाव भारतीय जनता पक्ष (भाजप) ठेवण्यात आले.
1951-52 मध्ये झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये भारतीय जनसंघाने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या, त्यापैकी श्यामा प्रसाद मुखर्जी यांनीही एक जागा जिंकली. भाजपचे निवडणूक चिन्ह कमळाचे फूल आहे. 2014 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले आणि भाजपने लोकसभेत 282 खासदार जिंकले. तर 2019 च्या निवडणूकित 303 खासदार जिंकत एक हाती सत्ता मिळवली. भारतीय जनता पक्ष (हिंदी: भारतीय जनता पार्टी) हा भारतातील एक राष्ट्रीय राजकीय पक्ष आहे. या पक्षाची विचारधारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत संलग्न असून त्याची धोरणे उजवीकडे झुकणारी आहेत असे मानले जाते. २०१४ सालापासून संसदेच्या लोकसभा सभागृहामध्ये भाजपचे बहुमत असून विद्यमान भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाजपचे सदस्य आहेत.
१९५१ साली श्यामाप्रसाद मुखर्जी ह्यांनी भारतीय जनसंघाची स्थापना केली. जनसंघ हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राजकीय अंग मानले जात असे. काँग्रेस व तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ह्यांच्याकडून पाकिस्तानचे होणारे लांगूलचालन रोखणे व भारतामधील हिंदूंचे हित जपणे ही जनसंघाची उद्दिष्टे होती. स्थापनेनंतर जम्मू आणि काश्मीर भारतामध्ये संपूर्ण सामावून घेतला जावा अशी आग्रही भूमिका जनसंघाने घेतली व ह्यादरम्यान निदर्शने करताना अटक झालेल्या मुखर्जी ह्यांचे काश्मीरच्या तुरुंगातच निधन झाले. दीनदयाल उपाध्याय व त्यानंतर अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण अडवाणी ह्या तरुण नेत्यांनी जनसंघाची सूत्रे हातात घेतली. १९५२ सालच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनसंघाला केवळ ३ जागांवर विजय मिळाला.
१९६७ सालच्या देशव्यापी विधानसभा निवडणुकांमध्ये जनसंघाने अनेक लहान प्रादेशिक पक्षांसोबत युती केली व मध्य प्रदेश, बिहार व उत्तर प्रदेश राज्यांमध्ये सरकारे स्थापन केली. युतीचे राजकारण करण्यासाठी जनसंघाला आपली अनेक कट्टर हिंदूवादी धोरणे व विचार बदलणे भाग पडले. १९७५ साली पंतप्रधान इंदिरा गांधी ह्यांनी लागू केलेल्या देशव्यापी आणीबाणीला जनसंघाने कडाक्याचा विरोध केला व जनसंघाच्या अनेक सदस्यांना तुरुंगात डांबले गेले. १९७७ साली आणीबाणी उठल्यानंतर जनसंघाने भारतीय लोकदल, काँग्रेस (ओ), सोशालिस्ट पार्टी इत्यादी पक्षांसोबत एकत्र येऊन जनता पक्षाची स्थापना केली. जयप्रकाश नारायण, मोरारजी देसाई इत्यादी नेते जनता पक्षाचे सदस्य होते. १९७७ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जनता पक्षाला प्रचंड बहुमत मिळाले व मोरारजी देसाई पंतप्रधान तर अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्रमंत्री बनले. परंतु अंतर्गत कलहामुळे ग्रासलेले जनता पार्टी सरकार १९८० साली कोसळले व जनता पार्टीचे विघटन झाले.
जनता पार्टीच्या विघटनानंतर भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली व अटलबिहारी वाजपेयी पक्षाचे पहिले अध्यक्ष बनले. भाजपचा चेहरामोहरा जनसंघासारखाच होता. या पक्षामध्ये 'अध्यक्ष' हा पक्षाचा प्रमुख असतो. याचा कार्यकाळ ३ वर्षांचा असतो. नुकत्याच झालेल्या दुरुस्तीनुसार या तीन वर्षांनंतर, अधिकची तीन वर्षे म्हणजे सलग ६ वर्षे अध्यक्षपदी राहता येऊ शकते. अध्यक्षाची निवडणूक करताना जर एकाहून अधिक उमेदवार असतील तर प्रत्येक राज्याच्या राजधानीत मतदान होते. नॅशनल काऊन्सिलच्या सगळ्या सदस्यांना मतदानाचा अधिकार असतो. अध्यक्षाची निवडणूक झाल्यावर तो उपाध्यक्ष, जनरल-सेक्रेटरी, कोषाध्यक्ष आणि सेक्रेटरीची निवड करतो. या पदांवर किती व्यक्तींची निवड करावी यावर कोणतेही बंधन नाही.
भारतीय जनता पक्षाने मार्गदर्शक मंडळ नावाच्या ज्येष्ठांच्या परंतु एक्झिक्युटिव्ह अधिकार नसणाऱ्या विशेष सल्लागार मंडळाची उभारणी केली आहे.या मंडळातील सद्य सदस्य लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह
भाजपामध्ये 'नॅशनल काऊन्सिल' नावाची कार्यकारिणी आहे. हा पक्षातील विविध ज्येष्ठ व महत्त्वाच्या पदावरील व्यक्तींचा मोठा गट आहे. यात सद्य अध्यक्षांसोबत सर्व माजी पक्षाध्यक्ष, सर्व राज्यांचे अध्यक्ष, पक्षाचे सर्व खासदार (लोकसभा व राज्यसभेतील), पक्षाचे सर्व आमदार (विधानसभा व परिषदांतील), राष्ट्रीय कार्यकारिणीतील सर्व सदस्य व सर्व संलग्न मोर्चा/विभागांचे अध्यक्ष यांचा समावेश होतो. या व्यतिरिक्त 'सेंट्रल इलेक्शन कमिशन' नावाच्या गटाकडे विविध प्रांतातील निवडणुकांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी असते. या गटातही किती व कोणते सदस्य असावेत यावर संख्येचे बंधन नाही. तसेच राष्ट्रीय कार्यकारिणीतील सदस्य या गटाचेही सदस्य असतातच. त्यांच्या व्यतिरिक्त सध्या या गटामध्ये जुरल ओरम, शाहनवाज हुसेन, विनय कटियार, जे.पी.नड्डा, डॉ. हर्षवर्धन, सरोज पांडे यांचा समावेश आहे.
पक्षांतर्गत तक्रारींच्या निवारणासाठी आणि पक्षाच्या सदस्यांवर तसेच ऑफिस बेअरर्सवर कारवाई करण्याचा अधिकार असणारी 'डिसिप्लिनरी कमिटी' हा ५ सदस्यांचा अजून एक स्वायत्त गट पक्षात आहे. सध्या या गटाचे अध्यक्ष श्री राधा मोहनसिंग आहेत. तर श्री जगदीश मुखी हे सेक्रेटरी आहेत.
विविध प्रश्नांवर विशेषत्वाने लक्ष देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर ५० विभाग बनवले गेले आहेत त्यांना 'नॅशनल सेल्स' म्हटले जाते. यात पाणी प्रश्न, अंत्योदय योजनेपासून, मजदूर महासंघ, प्राकृतिक चिकित्सेपर्यंत अनेक विषयांना वाहिलेले विभाग आहेत
राष्ट्रीय अध्यक्ष:- १९८०–८६अटलबिहारी वाजपेयी, १९८६–९१ लालकृष्ण अडवाणी, १९९१–९३ मुरली मनोहर जोशी, १९९३–९८ लालकृष्ण अडवाणी, १९९८–२००० कुशाभाऊ ठाकरे,२०००–०१ बंगारू लक्ष्मण, २००१–०२ जन कृष्णमूर्ती, २००२–०४व्यंकय्या नायडू, २००४–०६ लालकृष्ण अडवाणी, २००६–०९ राजनाथ सिंह, २००९–१३ नितीन गडकरी, २०१३–१४ राजनाथ सिंह, २०१४– अमित शाह, २० जानेवारी २०२० चालू जे.पी.नड्डा(जगत प्रकाश नड्डा)
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत परत भारतीय जनता पक्षाने बाजी मारली. महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला ४८ पैकी २३ जागा मिळाल्या. तसेच शिवसेना व भारतीय जनता पक्षाची युतीने ४८ पैकी ४२ जागी घवघवीत यश मिळवले. भारतीय जनता पक्षाचे नेते नरेंद्र मोदी हे वाराणसीतून निवडून आले आहेत.
लेखन:-
श्री. भाऊसाहेब वाकचौरे पाटील
जिल्हा संयोजक, भाजपा, सोशल मिडिया सेल, उत्तर नगर जिल्हा

