shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आरसीबीसाठी दिनेश कार्तिक ठरतोय देवदूत ?


          मंगळवारी आरसीबीने मुंबईच्या डि वाय पाटील स्टेडियमवर लखनौ सुपर जायंटसला हरवून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर उडी घेतली. नाणेफेक गमावल्यानंतर सक्तीने फलंदाजी स्विकारायची हि आयपीएल सत्रात प्रथाच पडली आहे. डावाच्या सुरुवातीलाच आरसीबीला सलामीवीर अनुज रावत व अनुभवी फलंदाज विराट कोहलीच्या झटपट रुपात धक्के बसल्यानंतर आरसीबी बॅकफूटवर गेले. कोहलीचा खराब फॉर्म सुरूच असून पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद होण्याची ही आयपीएल मधील त्याची चौथी वेळ होती. त्यानंतर थोडीसी डागडुजी केल्यानंतर ग्लेन मॅक्सवलही परतला. 

मात्र त्यानंतर कर्णधार फाफ ड्यू फ्लेसिसने खेळाची सुत्रे हाती घेत ९६ धावांची दमदार खेळी केली. या दरम्यान शाहबाज अहमद व दिनेश कार्तिकच्या सोबत केलेल्या भागिदाऱ्या आरसीबीच्या विजयाच्या पाया ठरल्या. आरसीबीच्या १८१ धावा फलकावर लागल्या होत्या. त्यानंतर जोश हेजलवुडच्या भेदक माऱ्यापुढे लखनौच्या फलंदाजाला खेळणे कठीण गेले आणि चार महत्वाचे गडी त्याचे बळी ठरले.

          या सामन्याला निर्णायक वळण देणाऱ्या काही ठळक घटनांचा उहापोह थोडक्यात घेऊया.लखनौची फलंदाजी सुरू असताना सात षटकात त्यांनी दोन बाद ५० धावा बनविल्या होत्या. त्यावेळी त्यांना विजयासाठी ७८ चेंडूत १३२ धावांची गरज होती. हळूहळू लखनौचा विजयाकडे प्रवास सुरू होता. लखनौच्या डावाचे आठवे षटक हर्षल पटेल टाकत होता. त्या षटकाच्या चेंडूवर एक नाट्यमय घटना घडली. लेगस्टंप्स बाहेर जाणाऱ्या त्या चेंडूवर कर्णधार राहुलने लेगला खेळले. त्यावर यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने झेलबादचे अपिल केले. मात्र पंचानी ते फेटाळले.आरसीबीचा कर्णधार ड्यू फ्लेसिसही काहीसा सांशक होता. परंतु दिनेश कार्तिकने त्याला डिआरएस घेण्यास भाग पाडले. 

अल्ट्राएज मध्ये चेंडूने बॅटची हलकीशी कड घेऊन दिनेश कार्तिकेचे ग्लोव्हज गाठल्याचे दिसून आले व राहुलला मैदान सोडावे लागले. या सामन्यासह मागील सात पैकी सहा वेळा आरसीबीच्या फलंदाजीचा तारणहार ठरलेल्या दिनेश कार्तिकने महत्वाचा डिआरएस घेण्यात कर्णधारास भाग पाडून आपल्या चाणाक्ष बुध्दीने परत एकदा आरसीबीच्या विजयात महत्वाचा ठसा उमटविला.

           ऑस्ट्रेलियन गोलंदाज जोश हेजलवुडने पावर प्लेमध्ये दोन व सतराव्या व एकोणावीसाव्या षटकात अनुक्रमे आयुष बदोनी व मार्कस स्टोईनस या धोकेबाज फलंदाजांना बाद करून लखनौचे कंबरडेच मोडले. त्याने घेतलेले चार बळी सामन्याचा टर्निंग पाँईटच ठरले.
           दोन्ही संघांच्या कर्णधारांची कामगिरी जर बघीतली तर आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने बिकट समयी केलेली ६४ चेंडूतील ११ चौकार व दोन षटकारांनी सजवलेली ९६ धावांची खेळी महत्वाची सिद्ध झाली. शिवाय कर्णधार म्हणून त्याचे सर्वच निर्णय प्रभावी ठरले. त्या उलट राहुल फलंदाजीत जम बसल्यावर मोठी खेळी करण्यात असफल ठरला. तर कर्णधार म्हणून अजून त्याच्या नेतृत्व पारदर्शकता नसल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले.
           या सामन्यात आरसीबीसाठी जमेची बाजू म्हणजे फाफने मोठा डाव खेळला तर मॅक्सवेल व कार्तिक, शाहबाज यांनी छोटेखानी पण जलद धावा जमविल्या गोलंदाजीत हेेजलवुड, मॅक्सवेल, सिराज व शाहबाजने प्रभावी मारा केला. याशिवाय फलंदाजीत अनुज रावत, विराट कोहली व सुयश प्रभुदेसाई यांचे अपयश हे चिंता वाढविणारे आहे. तर गोलंदाजीत हसरंगा व हर्षल पटेल यांचे न चालणे काहीसे काळजीत टाकणारे आहे.
             लखनौकडून कृणाल पांड्याने फलंदाजी व गोलंदाजीत चमक दाखवली, त्याला होल्डरने गोलंदाजीत बऱ्यापैकी साथ दिली. याच काय त्यांच्यासाठी दिलासा देणाऱ्या गोष्टी या सामन्यात घडल्या. तर फलंदाजीत क्विंटन डिकॉक, मनिष पांडे, दिपक हुड्डा व आयुष बदोनीचे अपयश खटकणारे होते. कर्णधार राहुल व स्टोईनस जम बसल्यानंतरही संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. या नकारात्मक बाबीही पुढे आल्या. आवेशखान, दुष्मंथा चमिरा, रवि बिश्नोई व स्टोईनस यांची गोलंदाजी महागडी ठरली. या देखील लखनौच्या पराभवाला कारण ठरणाऱ्या बाबी आहेत.
         पंधरा वर्षापासून हुलकावणी देणाऱ्या विजेतेपदाकडे आरसीबी हळूहळू वाटचाल करत आहे. बघूया यंदा त्यांचे स्वप्न पूर्ण होते का नाही ?
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close