पंधराव्या आयपीएलला सुरुवात होऊन नऊ दिवस झालेत आणि या नऊ दिवसात गतविजेता व सर्वाधिक विजेतेपद मिळविणाऱ्यात दुसऱ्या स्थानावर असलेला चेन्नई सुपर किंग्ज तीन सामने खेळला व तीनही सामन्यात पराभूत झाला. आयपीएलच्या इतिहासात आपले सुरुवातीचे तिन्ही सामने गमावण्याची सीएसकेचीही पहिलीच वेळ असून अशीच परिस्थितीती राहीली तर गतविजेत्यांना सावरता सावरायचं नाही.
आपल्या तिसऱ्या साखळी सामन्यात वानखेडे स्टेडियमवर खेळताना नाणेफेकीचा महत्वाचा कौल आपल्या बाजूने लागून प्रतिपक्षाला प्रथम फलंदाजी द्यायची नंतर वातावरण व दवाचा अचूक लाभ उठवून सामना खिशात घालण्याची नामी संधी चेन्नईला चालून आली होती. स्पर्धेतील बलाढय संघापैकी एक असलेल्या पंजाबला १८० धावात रोखून सीएसकेने चांगल्यापैकी कामगिरीही केली. परंतु या स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा त्यांच्या फलंदाजांनी त्यांना दगा दिला. मागच्या सत्रात सर्वाधिक धावांसाठी असलेली ऑरेंज कॅप विजेत्या ऋतूराज गायकवाडला यावेळी फॉर्मने दगा दिल्याचे दिसते. ०, १, १ या त्याच्या धावा संघाला संकटात टाकणाऱ्या असल्या तरी इतर फलंदाज रॉबिन उथप्पा, अंबाती रायडू, मोईन अली, कर्णधार रविंद्र जडेजा यांच्या खेळात अजिबात सातत्य नाही. तर शिवम दुबे धावा बऱ्यापैकी जमवितो परंतु जम बसल्यावर विकेट फेकून निघून जातो. तर सर्वात अनुभवी व फॉर्मात असलेला माजी कर्णधार एम एस धोनी संघाच्या गरजेनुसार वरच्या क्रमांकावर न खेळता सातव्या क्रमांकावर येतो. हे देखील सीएसकेच्या पराभवाच्या पिछेहाटीचे प्रमुख कारण आहे.
त्यांच्याकडे अनुभवी वेगवान गोलंदाजांची वाणवा आहे. तर उपलब्ध असलेले वेगवान गोलंदाज प्रतिपक्षावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरत आहे. मोईन अली व रविंद्र जडेजा या प्रमुख फिरकीपटूंनी तर एकाही सामन्यात आपला आठ षटकांचा कोटा एकत्रितरित्या पूर्ण केला नाही. तसेच महत्वाच्या क्षणी फॉर्मात असलेल्या क्षेत्ररक्षकांचे झेल सोडणे ही गोष्ट सीएसकेला त्रासदायक ठरत आहे. पंजाब विरूध्दच्या सामन्याचंच बघा, सामनावीर ठरलेल्या लियाम लिव्हींगस्टोनचा अंबाती रायडूने सुरूवातीलाच झेल सोडला. त्यानंतर लियामने घणाघाती फटकेबाजी करत सर्वाधिक साठ धावा काढल्याच शिवाय त्याचा आत्मविश्वास वाढल्याने त्याने गोलंदाजीत दोन बळी व दोन झेल अशी अष्टपैलू कामगिरी केली.
तसेच कर्णधार म्हणून जडेजा बिलकुल फिका पडत आहे. तर अजब शक्कल लढविण्यात माहीर असलेला माही उर्फ एमएस धोनी चाली लढविण्यात अपयशी ठरत असल्याने सीएसकेचा बॉंब फुसका निघत आहे. शिवाय महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने चार वेळा आपयपीएल करंडक उंचावला असून नेमकी सध्या सुरू असलेली आयपीएल सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदरच त्याने कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. नेमका धोनीचा हा निर्णय ऐन स्पर्धेच्या तोंडावर घेतला असून तो किती योग्य व अयोग्य आहे ? या विषयावर काथ्याकुट सुरू असून नेमका धोनीने हा निर्णय स्पर्धेच्या तोंडावर का घेतला ? धोनी हा निर्णय मागच्या सत्रात विजेतेपद पटकविल्यानंतर लगेच घेऊ शकला असता ? जर त्याला निर्णय घ्यायला थांबायचेच होते तर मेगा ऑक्शन पूर्वी किंवा नंतर लागलीच का नाही घेतला ? जेणे करून नवा कर्णधार रविंद्र जडेजाला मानसिक व इतर रणनितीची तयारी करायला निश्चितच वेळ मिळाला असता.
काही कागदोपत्री अनुभवी लोकांचं असंही मत आहे की, रवींद्र जडेजा हा मागील दहा पेक्षा जास्त वर्षापासून आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळतो. भारताच्या तीनही संघांचा नियमित सदस्य आहे, शिवाय आयपीएल तो पहिल्या सत्रापासून खेळत असून शेन वॉर्न व एमएस धोनी या सर्वोत्तम कर्णधारांच्या मार्गदर्शनात तो तयार झालेला असल्याने त्याला विशेष तयारीची गरजच नाही.
परंतु एका गोष्टीचा विचार केला तर खेळाडू म्हणून रविंद्र जडेजा कितीही मोठा व अनुभवी खेळाडू असला तरी त्याचा कर्णधार म्हणून अनुभव बिलकुल शुन्य आहे. त्याला साध्या क्लब लेवलच्या संघाचं नेतृत्व करण्याचा अनुभव नसताना एकाएकी चेन्नई सारख्या मोठया व प्रतिथयश आयपीएल संघाचे नेतृत्व देणे एकदम चुकीचे आहे.
सीएसकेच्या गोटातून काही गोष्टी ऐकायला येतात की संघात काही अंतर्गत धुसफूस आहे. परंतु असं जर काही चालू असेल तर ते वेळीच थांबलं पाहिजे. कारण मैदानातल्या बिकट परिस्थितीवर मात करण्याची क्षमता सीएसकेच्या संघात नक्कीच आहे. तेंव्हा जे काही उलटसुलट सुरू असेल त्याला पूर्णविराम देऊन संघाला पुढे नेणे गरजेचे आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

