आयपीएलच्या पंधराव्या सत्रात देखील पंजाब किंग्जला आपलं जुनं दुखणं सोडायला तयार नाही. जवळ जवळ जिंकत आलेला सामना शेवटच्या क्षणी गंभीर चुक करून गमवायचा. हि त्यांची जुनी खोड अजूनही कायम आहे. स्पर्धेच्या चौदाव्या दिवशी आपल्या चौथ्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्स विरूध्द बराचसा निश्चित झालेला विजय सामन्याच्या शेवटच्या दोन षटकातील खराब कामगिरीमुळे पंजाबच्या हातून निसटला आणि ते पराभूत झाले. चार सामन्यात तीन पराभव मिळवून सध्या तरी ते गुणतालिकेत खाली सरकले. स्पर्धेच्या सुरुवातीला पंजाबची कामगिरी बघून त्यांच्यात बदल झाला असे वाटत होते. परंतु ते अनलकी आहेत असा समज चुकीचा असून ते बेफिकीर असल्याचेच जास्त दिसते.
या सामन्यात काही महत्वाच्या क्षणी भयंकर चुका पंजाबकडून घडल्या. त्यामुळे त्यांच्या तोंडातला विजयाचा घास गुजरातने अक्षरशः ओढून नेला. त्या सामन्याला कलाटणी देणाऱ्या काही ठळक घटनांवर एक दृष्टीक्षेप टाकूया.
पंजाब फलंदाजी करताना पंधराव्या षटका अखेर पाच बाद १५२ अशा सुस्थितीत होता. त्यावेळी लियाम लिव्हींगस्टोन व शाहरुख खान हे हार्ड हिटर फलंदाज रंगात आले होते. परंतु सोळाव्या षटकात राशिद खानने तिसऱ्या चेंडूवर लिव्हींगस्टोनला मिलर करवी झेलबाद केले. तर पाचव्या चेंडूवर शाहरूखला पायचितच्या जाळ्यात पकडले. ते दोघे खेळत असताना ते दोनशेचा टप्पा सहज पार करतील मात्र त्यांचे बाद होणे व नंतरच्या फलंदाजांची हाराकिरी यामुळे ते १८९ धावाच फलकावर लावू शकले, तेही शेवटची जोडी राहुल चाहर व अर्शदिप यांच्या साहसी फटकेबाजीमुळे.
गुजरातच्या विजयात ९६ धावांची चमकदार खेळी करणाऱ्या शुभमन गिलला आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर तो वैयक्तिक ४५ धावांवर खेळत असताना ओडियन स्मिथने स्वतःच्याच गोलंदाजीवर त्याचा झेल सोडून पंजाबला संकटात टाकले.
गुजरातच्या डावात सतराव्या षटकात राहुल चाहर गोलंदाजी टाकत असताना पहिल्या चेंडूवर शुभमन गिलला यष्टीचित करण्याची सोपी संधी यष्टीरक्षक मॅथ्यू वेडने गमावली. तर पाचव्या चेंडूवर हार्दिक पांडयाचा सोपा झेल कागिसो रबाडाने सोडला. या संधी साधल्या असत्या तर सामन्याचा निकाल पंजाबच्या बाजूने नक्कीच लागला असता.
सामन्याच्या शेवटच्या षटकात १९ धावा बनविणे दबावात असलेल्या फलंदासाठी एक अवघड काम असते. मात्र पंजाबचा गोलंदाज ओडियन स्मिथने स्वैर मारा केला आणि फलंदाजांचं काम सोप केलं. त्या षटकाचा पहिलाच चेंडू स्मिथने वाईड टाकून एक धाव व एक चेंडू पंजाबला जणू भेटच दिल्या. त्यानंतर चौथ्या चेंडूवर विनाकारण चेंडू स्टंपवर फेकल्याने एक ओव्हर थ्रोची एक धाव फालतू निघाली. त्यानंतर शेवटच्या दोन चेंडूवर बारा धावांची गुजरातला गरज असताना राहुल तेेवतीयाला दोन फुलटॉस गिफ्ट केले व त्याचा त्याने अचूक लाभ घेत दोन षटकार मारून सामना गुजरातच्या झोळीत टाकला.
फलंदाजीत कर्णधार मयंक अग्रवालचं मोठं अपयश, अनुभवी जॉनी बॅरिअस्टो, ओडियन स्मिथ व शाहरुख खान यांचे फेल होणे पंजाबसाठी जास्तच त्रासदायक सिद्ध झालं. तर ओडियन स्मिथ व राहुल चाहर यांची गोलंदाजी महागडी ठरली. शिवाय महत्वाच्या क्षणी झेल सोडणे व स्टंपिगची संधी गमावणे याची पंजाबला मोठी किंमत मोजावी लागली.
पंजाबने यावेळी ऑक्शन टेबलवर मजबूत संघ निवडला. स्पर्धेची सुरुवातही झोकात केली. मात्र शेवटचे तीनही सामने गमावून त्यांनी स्वतःलाच संकटात टाकले आहे. यातून बाहेर निघण्यासाठी आता त्यांनाच आपल्या चुका दुरूस्त करून यावर तोडगा काढावा लागेल. त्यांचे अजून दहा साखळी सामने शिल्लक आहेत. त्यातील यशापयश हेच त्यांचे स्पर्धेतील भवितव्य ठरवील, हे खरे असले तरी त्यांच्या या खराब खेळामागे पडद्याआड काही वेगळं घडत आहे का ? हि शंकाही मनात आल्यावाचून राहात नाही. याचं कारण म्हणजे पंजाबच्या सामन्यातच निकाल अंतिम क्षणी बदलतात हे आयपीएलच्या पहिल्या सत्रापासून सुरू असलेलं त्यांचं दुखणं अजूनही सुरूच आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

