कारवाई न झाल्यास आंदोलन करणार - गोविंद पाडुळे
कालठण । वार्ताहर : दि. २७/ इंदापूर तालुक्यातील कालठन नं.१ येथील गावाच्या विकासाची धुरा सांभाळणारी ग्रामपंचायत शासनाच्या निधीची अफरातफर करीत असेल तर सर्वसामान्य जनतेने विकासाची अपेक्षा कोणाकडून करायची?
सरपंच व ग्रामसेवक गावाचा विकास कमी आणि आपले खिसे गरम करण्यात धन्यता मानत आहेत. गावात विकास कामे करतांना ग्रामपंचायतीमधील सरपंच व ग्रामसेवक शासनाच्या निधीची अफरातफर करतात. अनेकदा बोगस बिले लावून पैसे काढले जातात. त्याप्रमाणे कालठण नं.१ येथे वृक्षारोपण करण्यासाठी खड्डे न खोदता ग्रामपंचायतीने बिल काढून घेतले आहे. याबाबत भ्रष्टाचाराची तक्रार गटविकास अधिकारी यांच्याकडे नागरिकांनी केली आहे. त्यावर पंचायत समितीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून निर्णय घ्यायला दिरंगाई केली जात आहे. यावरून वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत की काय अशी शंका उपस्थित होत आहे.
याबाबत लवकर कारवाई झाली नाही तर पंचायत समितीतील अधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे व तीव्र आंदोलन करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदवीधर सेलचे कार्याध्यक्ष गोविंद पाडुळे यांनी सांगितले.

