इंदापूरात महावीर जयंती निमित्त जैन धर्मातील सर्व संप्रदायाची एकत्रित मिरवणूक, गरबा सादरीकरण ठरले लक्षवेधी.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर शहर जैन संप्रदायातील दिगंबर, श्र्वेतांबर तसेच मूर्तिपूजक पंथाच्या वतीने जैन धर्मियांचे २४ वे तीर्थंकर भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणका निमित्त त्यांच्या मूर्तीची शहरातून एकत्रित भव्य पालखी मिरवणुक काढण्यात आली. यावेळी जगा व जगू द्या चा उदघोष करण्यात आला. सामान्य प्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी जैन बांधवांना यानिमित्त शुभेच्छा दिल्या.माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, नगराध्यक्षा अंकिता शहा, इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव मुकुंद शहा, कर्मयोगी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा यांनी पालखीस खांदा दिला तर इंदापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे,नगरसेवक अनिकेत वाघ, रोटरी जिल्हा गव्हर्नर यांचे सचिव संजय दोशी, व्यापारी संघाचे मधुकर कोकाटे यांनी भगवान महावीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी वाढता उन्हाळा लक्षात घेवून पशू पक्ष्यांसाठी घरासमोरील झाडावर किंवा इमारतीवर दाण्यापण्याची सोय करण्याचा संकल्प करण्यात आला.
श्री १००८ शांतीनाथ दिगंबर जैन मंदिर तीर्थक्षेत्र पासून सवाद्य पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला. मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. श्रेणिक शहा, विश्वस्त डॉ.अनंग मेहता, संदीप दोशी, भारत दोभाडा, संदीप शहा, निलेश मोडासे, उत्कर्ष दोशी,श्री १००८ पार्श्वनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष वकील अशोक कोठारी, मिलिंद दोशी, आदीकुमार गांधी, विरेन दोशी, डॉ. सागर दोशी,वासुपुज्य मंदिर ट्रस्टचे तन्मय नरेंद्र गांधीसराफ, पारसमल बागरेचा, भारतीय जैन संघटनेचे तालुकाध्यक्ष धरमचंद लोढा, जवाहर बोरा, महेंद्र गुंदेचा, प्रकाश बलदोटा, पवन भालेराव, डॉ. आशिष दोभाडा, पिंटू मेहता यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीस प्रारंभ झाला. जुना पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग , छत्रपती शिवाजी चौक, मुख्य बाजारपेठ,नेहरू चौक, संभाजी चौक मार्गे मिरवणुकीचा समारोप पार्श्वनाथ मंदिर प्रांगणात करण्यात आला. तत्पूर्वी वासूपुज्य मंदिरास भेट देण्यात आली. मिरवणुकीत पांढरा वेष घातलेले श्रावक तसेच लाल साडी घातलेल्या श्राविका तसेच चौकाचौकात सादर केलेले गरबा नृत्य सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. यावेळी सर्व श्रावक श्राविका यांनी पशू पक्ष्यांसाठी घरासमोरील झाडावर त्यांना दाना पाणी देण्याचा संकल्प केला. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही मिरवणुक पार पडली.
फोटो १ व २ इंदापूर - शहरातून काढण्यात आलेली भगवान महावीर यांच्या मूर्तीची सवाद्य पालखी मिरवणुक.

