एकेकाळी क्रिकेट जगतातील अतिशय यशस्वी व ताकदवान क्रिकेट फ्रँचाईसी म्हणून ओळख मिळविलेल्या मुंबई इंडियनची हालात पंधराव्या आयपीएल सत्रात अतिशय बिकट व गंभीर बनली आहे. मुंबईत झालेल्या पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे दिल्ली व राजस्थान कडून पराभूत झाल्यानंतर पुढचे तिन सामने पुण्यात खेळल्यानंतरही त्यांच्या निकालात काही एक बदल झाला नाही. पुण्यात मुंबई इंडियन्सला केकेआर, आरसीबी पाठोपाठ आता पंजाबनेही पराभूत केल्याने विक्रमी पाच वेळा विजेतेपद मिळविलेल्या मुंबईला आता गुणतालिकेत अगदी शेवटच्या स्थानावर विराजमान झालेले पाहून मुंबई इंडियन्सचे क्रिकेट चाहतेच नव्हे तर संपूर्ण क्रिकेट जगतच चकीत झाले आहे.
या आयपीएल सत्रात सहभागी असलेल्या दहा संघापैकी केवळ मुंबई इंडियन्सच असा एकमेव संघ आहे की, ज्याची विजयाची पाटी अजून कोरीच आहे, तर पदरी पाच न पुसणारे क्लेषदायक पराभव नोंदले गेले आहेत. या स्पर्धेतील अलिखित नियमानुसार एखाद दुसरा अपवाद वगळता प्रत्येक संघ नाणेफेक जिंकून दुसरी फलंदाजी करून जिंकले आहेत. मात्र हे सुत्र मुंबईसाठी कुचकामी ठरत आहे. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकली अथवा हरली याचा काही एक फरक पडताना दिसत नाही कारण मुंबईने प्रथम फलंदाजी केल्या नंतरही त्यांचा पराभव होत आहे तर दुसऱ्यांदा फलंदाजी केल्यानंतरही विजयाने त्यांना हुलकावणीच दिली आहे.
यापूर्वीच्या चौदा आयपीएल सत्रात मुंबईकडे एकाचढ एक असे अनेक सरस खेळाडू उपलब्ध असायचे. त्यापैकी कोणीही अपयशी ठरला तर दुसरा त्याची जागा भरून काढायचा. त्यामुळे मुंबईच्या वाट्याला पराभव सुध्दा जायला घाबरायचे.
परंतु यंदाच्या सत्राच्या सुरुवातीला झालेल्या (मेगा ऑक्शन ) भव्य लिलावात मुंबई इंडियन्सचे मालक अंबानी, क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर, मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने, मुख्याधिकारी झहीर खान, राहुल संघवी यांच्या थिंक टँकने खेळाडूंची अशा काही निवड केली की त्याच वेळेस अनेक क्रिकेट जाणकार व पंडितांनी भुवया उंचावल्या होत्या व संघाचे भवितव्य अंधारात असल्याचे म्हंटले होते. मात्र नव्या व कोऱ्या करीत खेळाडूंना खरेदी करायचे, त्यांच्यात आत्मविश्वास ओतून व योग्य ती ट्रिटमेंट देऊन सक्षम बनवायचे ही मुंबई इंडियन्सची खासीयत असल्याने यावेळीही तसेच होईल अशी सर्वांचीच अपेक्षा होती. पण यावेळी पहिल्या पाच सामन्यानंतरही मुंबई इंडियन्सच्या मागे लागलेला पराभवाचा ससेमिरा हटायचे नावच घेईना.
या सत्रात सततचे पराभव व अपयशानंतर मुंबईकडे रिप्लेस करायला खेळाडूच शिल्लक नाही. इतकेच नाही तर चार परदेशी खेळाडू खेळविणं अनिवार्य असतानाही संघाकडे अपयश अथवा तंदुरूस्ती कारणाने उद्भवलेल्या परिस्थिती नंतर सक्षम बदली खेळाडूही मुंबईकडे नाही. मागच्या दोन सामन्यात तर मुंबईकडे संघात खेळण्यासाठी आवश्यक चार परदेशी खेळाडूंचा कोरमही पूर्ण करण्याची परिस्थिती नव्हती.
मेगा ऑक्शनमध्ये कमी गुणवान, अननुभवी, जखमी तसेच या सत्रात उपलब्ध होऊ न जोफ्रा आर्चर सारखे शकणारे खेळाडू निवडणे, मागच्या संघात असलेले प्रतिभावान ट्रेंट बोल्ट, डिकॉक या खेळाडूंना डावलणे व पोलॉर्डसारखे निकामी खेळाडू निवडणे मुंबईला भारी पडले आहे. तसेच मुंबईकडे जसप्रित बुमराहा सारखा एकही गोलंदाज नसणे, प्रभावी फिरकी गोलंदाज न निवडणे अपयशाचे प्रमुख कारणं ठरत आहेत. शिवाय आठ कोटी रुपये खर्च करून खरेदी केलेल्या टिम डेव्हीडला दोन सामन्यात अपयशी ठरल्यानंतर संघाबाहेर करणं संघालाच घातक ठरत आहे.
शिवाय संघाची मुख्य मदार असलेला सलामीवीर रोहीत शर्मा साफ अपयशी ठरत असल्याने मुंबई इंडियन्सवर संकटं वाढत आहेत. त्याचबरोबर साडेपंधरा कोटींना विकत घेतलेला ईशान किशन दोन सामन्यात चांगले खेळला, त्यानंतर त्याची बॅट थंड झाल्याने मुंबईला पराभव पत्करावे लागत आहे.
यामुळे मुंबईला विक्रमी पाच वेळा विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधार रोहीत शर्माच्या नेतृत्वपदाच्या क्षमतेविषयी शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत. सततच्या पराभवाने रोहीतच्या मैदानातील वावरावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. छोटया -छोट्या चुकांवर सहकारी खेळाडूंवर चिडणे, नेहमी हसतमुख, विनोदी वागणारा रोहीत सध्या दबावात असल्याने विचित्र मानसिकतेत सापडला आहे. रोहीत भारताच्या तिनही संघाचा कर्णधार आहे. विराट कोहली भारताला आयसीसी स्पर्धा जिंकून देण्यात असमर्थ ठरल्याने मोठया आशेने रोहीतकडे भारताचे नेतृत्व देण्यात आले. त्यानंतर त्याने सलग तेरा विजय मिळवून शानदार सुरूवातही केली. परंतु सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या अपयशाचा नकारात्मक प्रभाव त्याच्या मानासिकतेवर होऊ शकतो तेंव्हा तथाकथीत क्रिकेट पंडितांनी रोहीतच्या मानसिकतेवर परिणाम होणार नाही अशाच बाता कराव्यात. अन्यथा भारताला विश्वविजेते बनण्याचे स्वप्न हवेतच विरून जायचे.
आयपीएल एक करमणुक म्हणून खेळले जाणारे क्रिकेट आहे. त्याकडे बघण्याचा दृष्टीकोनही तसाच असावा. विनाकारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएलची सांगड घालून रोहीतच्या नेतृत्व शैलीवर शितोंडे उडविणाऱ्या विद्वनांनी थोडे थंडपणाने घ्यावे. मुंबई इंडियन्सच्या सध्याच्या खराब कामगिरीला रोहीत फलंदाज म्हणून जबाबदार असला तरी त्याच्या नेतृत्व शैलीचा विशेष दोष नाही. कारण मुंबई या चालू सत्रात तरी विशेष कामगिरी करणार नाही हे ऑक्शन टेबलवरच सिद्ध झालं होतं. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या अपयशाला जबाबदार ठरवायचंच असेल तर त्यांच्या थिंक टॅंक व खेळाडूंची निवड करणाऱ्या लोकांनाच जबाबदार धरावं लागेल. एक मात्र नक्की की, या सत्रात पहिल्या पाच पराभवानंतर मुंबईला पुढील सर्व नऊ सामने जिंकून प्ले ऑफ फेरी गाठणे कठीण दिसते. परंतु खराब सुरूवातीनंतरही बाजी पलटविण्यात मुंबई पटाईत आहे.
सलग चार पराभवानंतर चार वेळचा चँपीयन चेन्नईने पहिला विजय मिळवून आपली गाडी लाईनवर आणली अगदी तसेच पाच वेळचा विजेता मुंबई संघ पाच पराभवानंतर आपला पहिला विजय मिळवून आपली गाडी विजयाच्या रुळावर आणल्यास कोणी आश्चर्यही मानू नये. शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. भविष्याच्या गर्भात काय दडलं आहे ते दैवच जाणो !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

