shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सनरायझर्स हैद्राबादचा सुर्य अजूनही अंधारातच !

      आयपीएल -२०२२, सत्र पंधरावे, दिवस दहावा, सामना बारावा, स्थळ - डिवाय पाटील स्टेडियम मुंबई, प्रतिस्पर्धी लखनौ सुपर जायंटस व सनरायझर्स हैद्राबाद. लखनौ संघ आपला तिसरा सामना खेळत होता, तर हैद्राबाद दुसरा. या उभयांतातील सामना अगदी शेवटपर्यंत उत्कंठावर्धक झाला. त्यात बारा धावांनी लखनौच्या गळ्यात विजयाची माळ पडली. 

       या विजयासह दोन विजय व एक पराभव या कामगिरीसह लखनौ संघ गुणतालिकेत पाचव्या स्थानी पोहोचला तर हैद्राबादच्या या सलग दुसऱ्या पराभवाने त्यांचे तळाचे स्थान कायम राहीले. दहा संघाच्या या स्पर्धेत पाच वेळचा चँपियन मुंबई दोन सामन्यातील दोन पराभवाने आठव्या तर चार वेळचा विजेता चेन्नई तीन सामन्यातील तीन पराजयाने नवव्या क्रमांकावर आहे. हे तीन माजी विजेते सध्या आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असून त्यांचे भवितव्य सध्या तरी त्यांच्याच हातात असून पुढील सामन्यांतील कामगिरी त्यांची स्पर्धेतील दिशा व दशा ठरविल.
              

 स्पर्धेत खास करून मुंबईत एका सामन्याचा अपवाद वगळता दुसरी फलंदाजी करणारे संघच सामन जिंकत आहेत,  मात्र हैद्राबादच्या फलंदाजांच्या डोक्यात हे अलिखित सुत्र नीट बसलेले दिसत नाही. राजस्थान विरूध्द दोनशेच्या वरचेे लक्ष त्यांना पेलले नाही, तर या सामन्यात १७० चे आवाक्यात दिसणारे लक्षही आवाक्याबाहेरच राहील्याने सन रायझर्सच्या विजयाचा सुर्य उगवलाच नाही.
              प्रस्तुत लेखात आपण हैद्राबादच्या पराभवाचे केंद्रबिंदू ठरलेले काही क्षणचित्रे बघूया.
              डावाच्या सुरुवातीलाच तीन गडी झटपट बाद झाल्याने कर्णधार राहुलवर मोठी जबाबदारी होती व ती त्याने त्याच्या खास शैलीत ६८ धावा काढून पार पाडताना दिपक हुडासह चौथ्या गड्यासाठी दमदार भागीदारी करून धावगती उत्तम राखली. या वेळेस हैद्राबाद लखनौवर दबाव वाढविण्यात कमी पडले.
              केएल राहुल व दिपक हुड्डाचे अर्धशतके तसेच शेवटच्या टप्प्यात आयुष बदोनीची १९ धावांची छोटीसी खेळी लखनौसाठी निर्णायक सिद्ध झाली. विजयाचे अंतर केवळ बारा धावांचे असल्याने या १९ धावा हैद्राबादसाठी आणखी बोचऱ्या ठरल्या.
              हैद्राबाद समोर १७० धावांचे लक्ष असताना पावर प्ले मध्ये तडाखेबाज खेळाची गरज असताना दोन्ही सलामीवीर स्वस्त:त परतले. त्यामध्ये कर्णधार विल्यमसन केवळ सोळा धावांवर बाद झाल्याने हैद्राबादच्या जखमेवर मिठ चोळण्याचेच काम केले. मागच्या लेखातही मी उल्लेख केला होता की, विल्यमसन असली सलामीवीर नाही. त्या ऐवजी त्याने तिसऱ्या अथवा चौथ्या क्रंमाकावर खेळावे व एखाद्या तडाखेबाज फलंदाजाला सलामीला पाठवावे. परंतु विल्यमसनने मागची चुक दुरुस्त न करता स्वतःच्याच हाताने पायावर धोंडा पाडून घेतला.
              हैद्राबादकडून राहुल त्रिपाठीने ४४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली पण महत्वाच्या क्षणी त्याचे बाद होणे व परिस्थिती नियंत्रणात आली असता निकोलस पुुरन ३४ व वॉशिंग्टन सुंदर १८ धावा यांचे शेवटपर्यंत न टिकणे हैद्राबादच्या पराभवावर शिक्कामोर्तब करून गेले.
             अठराव्या षटकात निकोलस पूरन व अब्दुल समदला बाद करून आवेश खानने सामना पूर्णपणे लखनौ कडे खेचला. आवेश खानने चार बळी घेऊन लखनौच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
               कर्णधार विल्यमसनने या सामन्यात अनेक चुका केल्या. आपली फलंदाजी कमजोर आहे. धावांचा पाठलाग करण्यात फलंदाज कमजोर आहेत. हे माहीती असताना देखील त्याने लखनौला फलंदाजीस पाचारण केले. मोठया धावसंख्येचा पाठलाग करताना प्रमुख फलंदाज व कर्णधार या नात्याने त्याने एक बाजू लावून धरणे गरजेचे असताना इतर फलंदाजांप्रमाणे स्वतःही हाराकिरी करत संघाच्या संकटात भर घातली. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदर सुरुवातीला चांगली गोलंदाजी करून लखनौवर दबाव वाढवत असताना आपला दुसरा फिरकी गोलंदाज अब्दुल समदला केवळ एकच षटक देणे हे न समजण्या पलीकडचे होते. संघाचा प्रमुख गोलंदाज उमरान मलिकचा योग्य उपयोग न केल्याने तो महागडा ठरला.
                 या सर्व भयंकर चुका सनरायझर्स हैद्राबादच्या या पराभवाचे कारण ठरल्या असून त्या दुरूस्त करता येऊ शकतात. अजून बरेच सामने बाकी आहेत. वेळ गेलेली नसली तरी पराभवाचा अंधार हटविण्यासाठी सनरायझर्सला आळस झटकावा लागेल अन्यथा विजयाचा सुर्योदय होण्याऐवजी पराभवाचा अंध:कार पसरेल !
लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close