shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीरामनवमी उत्सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात..!!

अहमदनगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन ) 
 श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवास आज मंगलमय वातावरणात सुरुवात झाली असून श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्यातून पालख्यां सोबत आलेल्या पदयात्री साईभक्तांच्या श्रीसाईनामाच्या गजराने अवघी शिर्डी दुमदुमुन गेली.
 
       
आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ०५.१५ वाजता काकड आरतीनंतर श्री साईबाबांच्या फोटोची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक व्दारकामाई पर्यंत काढण्यात आली. संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी पोथी, उपाध्यक्ष अ‍ॅड.जगदीश सावंत व विश्वस्त अ‍ॅड.सुहास आहेर यांनी प्रतिमा आणि विश्वस्त अविनाश दंडवते यांनी वीणा घेवून मिरवणूकीत सहभाग घेतला. यावेळी विश्वस्त सर्वश्री सचिन गुजर, रराहुल कनाल, सुरेश वाबळे, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर, प्र. उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाईत गेल्यानंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाचा शुभारंभ झाला. यामध्ये अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी प्रथम अध्याय, सौ. शोभाताई गोंदकर यांनी व्दितीय अध्याय, विश्वस्त सचिन गुजर यांनी तृतीय अध्याय, सौ. सुरेखाताई शेळके यांनी चौथा अध्याय व कु. अवंतिका दंडवते यांनी पाचवा अध्यायाचे वाचन केले.
      

  
सकाळी ०७.०० वाजता संस्थानचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. चैतालीताई काळे यांनी श्रींची विधीवत पाद्यपूजा केली. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती झाली. दुपारी ०४.०० वा. समाधी मंदिराशेजारील स्टेजवर ह.भ.प.श्री.विक्रम नांदेडकर यांचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर सायंकाळी ०६.३० वाजता श्रींची धुपारती झाली. त्यानंतर सायं.०७.३० ते रात्रौ ०९.५० यावेळेत श्री. निनाद ग्रुप-सौ. पद्यावती पारेकर, पुणे यांचा भक्ती संगीत हा कार्यक्रम श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला. 
संस्थानच्या वतीने या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. रात्रौ. ०९.१५ वाजता श्रींची गावातून पालखी मिरवणूक काढण्यात आली. आज उत्सवाचा प्रथम दिवस असल्याने व्दारकामाई मंदिर पारायणासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात आले. संस्थान प्रशासनाने संभाव्य गर्दीचे नियोजन केलेले असल्यामुळे सर्व साईभक्तांना सुखकर व सुलभतेने बाबांच्या दर्शनाचा लाभ मिळाला. उन्हाची तीव्रता लक्षात घेवून संस्थान प्रशासनाने दर्शन रांगेसह ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवली. 

तसेच श्री रामनवमी उत्सवानिमित्त राज्याचे विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव नीरज धोटे यांनी माध्यान्ह आरतीकरीता हजेरी लावली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत व उपाध्यक्ष अ‍ॅड.जगदीश सावंत उपस्थित होते. उद्या उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वा. अखंड पारायणाची समाप्ती होवून श्रींच्या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. सकाळी ०६.२० वा. कावडींची मिरवणूक व श्रींचे मंगलस्नान होईल. सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्टेजवर ह.भ.प.विक्रम नांदेडकर यांचे श्रीरामजन्म किर्तन कार्यक्रम होईल. दुपारी १२.३० वा. माध्यान्ह आरती होणार आहे. दुपारी ०४. ०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं.०५.०० वा. श्रींच्या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्यानंतर सायं.०६.३० वा. धुपारती होईल. 

सायं.०७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत विजय साखरकर, मुंबई यांचा साई स्वर नृत्योत्सव हा कार्यक्रम होणार आहे. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. तसेच हा उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. यामुळे दिनांक १० एप्रिल रोजीची नित्याची शेजारती व दिनांक ११ एप्रिल रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
close