श्रीराम नवमीच्या दिवशी पंधराव्या आयपीएल सत्रात दोन सामने खेळले गेले. दिवसातल्या पहिल्या सामन्यात बेबॉर्न स्टेडीयमवर दिल्लीने कोलकात्याला ४४ धावांनी हरविले. केकेआर या सत्रात पाच सामने खेळले असून त्यापैकी तीन जिंकले व दोन हारले. तर दिल्लीने खेळलेल्या चार पैकी प्रत्येकी दोन हारले व जिंकले आहेत.
तर वानखेडे स्टेडीयमवर झालेल्या दुसऱ्या सामन्यात राजस्थानने लखनौचा पराभव करून अव्वल स्थान काबीज केले पण हे करताना लखनौला पहिल्या चार संघातून बाहेर ढकलले.
सध्या सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या अलिखित नियमाप्रमाणे नाणेफेक जिकंणाऱ्या संघाने प्रतिपक्षाला प्रथम फलंदाजीस पाचारण करायचे व त्यांनी दिलेले लक्ष स्वत: साध्य करून दोन गुण वसूल करायची परंपरा या सामन्यांमध्येही कायम राहीली.
मागील काही दिवसांपासून आऊट ऑफ फॉर्ममध्ये चालत आलेले भारताचे दोन फिरकी गोलंदाज की जे "कुलचा " नावाने प्रसिध्द आहेत. ते या दोन सामन्यात खेळले व प्रत्येकी चार बळी मिळवून आपापल्या संघाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. त्यापैकी कुलदिप यादवने दिल्लीसाठी तर यजुवेंद्र चहलने राजस्थानसाठी हि कामगिरी बजावली.
दिल्ली - केकेआर सामन्यात कर्णधार म्हणून दिल्लीच्या रिषभ पंतची कामगिरी चांगली झाली तर केकेआरच्या श्रेयस अय्यरने स्वतः अर्धशतकी खेळी केली खरी मात्र कर्णधार म्हणून केलेल्या चुकांचे फळ केकेआरला पराभवाच्या रूपात मिळाले.
दुसऱ्या सामन्यात भले राजस्थान जिंकले असले तर राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन कर्णधार म्हणून अजून पोरगळच वाटतो. क्षेत्ररक्षण लावण्यात त्याचे चुका करणे सुरूच आहे. परंतु सामना राजस्थान जिंकणार हे ट्रेंट बोल्टने टाकलेल्या पहिल्या षटकातच स्पष्ट झाले असताना जवळ उपलब्ध असलेल्या पाच गोलंदाजांचा योग्य क्रम लावणे हे त्याला एवढया मोठया अनुभवानंतरही समजू नये जरा अतिच वाटतं. अठरावे षटक युजवेंद्र चहलला देणे किती चुकीचे होते ते त्याने दिलेल्या पंधरा धावांवरून लक्षात येतेच. पण शेवटचे निर्णायक षटक ट्रेंट बोल्ट किंवा प्रसिद्ध कृष्णासाठी राखून ठेवायचे सोडून आपला पहिलाच आयपीएल खेळणाऱ्या कुलदिप सेन या नवख्या गोलंदाजाला देणे किती मुर्खपणाचे होते हे सामना बघणाऱ्या प्रत्येकाचे मत होते. राजस्थानचे नशिब इतके चांगले की, कुलदिप सेनने शेवटच्या षटकात पंधरा धावांचा बचाव करताना पहिले तीन चेंडू विस्फोटक फलंदाज मार्कस स्टोईनसला बांधून ठेवले. शेवटच्या दोन चेंडूवर आवेश खानने चौकार व षटकार ठोकला खरा परंतु तोपर्यंत सामना लखैनाच्या हातून निसटला होता. संजू सॅमसनचे भाग्य चांगले की त्याची इतकी भयंकर चुक त्याच्या अंगलट आली नाही. नाहीतर काल त्याच्या नावाने चांगलंच चांगभलं झालं असतं.
लखनौचा कर्णधार केएल राहुलकडे भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणून बघितले जाते. मात्र त्याने स्वतःच त्याच्या कौशल्यहिन नेतृत्वातून अनेकदा सिध्द करून दाखविले आहे की, तो कर्णधार पदाच्या बिलकुल लायकीचा नाही. संघाचे नेतृत्व कसे करू नये हे त्याने त्याच्या कृतीतून परत एकदा करून दाखविले. क्षेत्ररक्षण लावण्यातील त्याचा गलथान पणा चिरपरिचित असाच आहे. तर गोलंदाजीत बदल करण्यात तो अनेकदा चुका करतो. मात्र या सामन्यात डावाच्या पहिल्याच चेंडूवर बोल्टने बोल्ड करून त्याच्या इज्जतीचे धिंडवडे काढल्यानंतर त्याने बॅटींगचा क्रम ठरविताना घातलेला गोंधळच खरा लखनौच्या पराभवाचे कारण ठरला.
एकशे सहासष्ठ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना खराब सुरुवातीनंतर राहुल स्वतः लवकर बाद झाल्यावर तिसऱ्या क्रमाकांवर कृष्णप्पा गौतम व चौथ्या क्रमांकावर जेसन होल्डरला पाठविण्या ऐवजी डाव चालवून गडी बाद होऊ न देणाऱ्या फलंदाजाला पाठविणे गरजेचे होते. तेथे दिपक हुड्डा किंवा कृणाल पांड्याला पाठविणे गरजेचे होते. ही साधी बाब कर्णधार असलेल्या राहुलला न समजणे म्हणजे कर्णधारपदाच्या लायकीचा तो नाही हे आपोआप सिद्ध होते.
राजस्थानचा डाव सुरू असताना आयपीएलच्या इतिहासात कधीही घडला नाही असा किस्सा घडला. चार बाद ६७़ अशा स्थितीतून शिमरान हेटमायरसह संघाचा डाव सावरून अठराव्या षटका अखेर १३५ पर्यंत संघाची धावसंख्या नेणारा व स्वतःही दोन षटकारांसह २८ धावा ठोकणाऱ्या रविचंदन आश्विनने अंतिम टप्प्यात स्वतः धावगती वाढविण्यात असमर्थ ठरत असल्याचे लक्षात येताच डग आऊट मध्ये बसलेल्या ताज्या दमाच्या रियान परागसाठी मैदानाबाहेर जाणे पसंत केले. याची सुचना त्याने विरोधी कर्णधार व पंच यांना न दिल्याने
" रिटायर्ड आऊट " या नियमानुसार बाद होणारा तो आयपीएल मधील पहिलाच फलंदाज ठरला. या नियमा विषयी व आश्विनच्या नियमांच्या ज्ञानाविषयी पुढील लेखात वाचूया.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

