वडापूरी येथे श्री भैरवनाथ यात्रा उत्सव उत्साहात संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील पौराणिक असलेले श्री नाथ मंदिर व श्री भैरवनाथ मंदिर हे वडापुरी गावात असून सालाबाद प्रमाणे यावर्षी चैत्र शुद्ध अष्टमी या दिवशी श्री भैरवनाथ यात्रा दिनांक ९ एप्रिल २०२२ रोजी सकाळी महाभिषेक यानंतर निशान चढवले. दुपारी बारानंतर ग्रामस्थांच्यावतीने नैवेद्य केला गेला. यानंतर सायंकाळी सहा वाजता श्रीं चा छबिना श्रीनाथ मंदिरातून श्री भैरवनाथ मंदिरामध्ये मार्गस्थ झाला. यानंतर दर्शन सोहळा तसेच मानाच्या पासगे परिवाराच्यावतीने आरत्या झाल्या. त्यानंतर रात्री दहा वाजता श्रीं चा छबिना ग्राम प्रदर्शनासाठी निघाला रात्री बारा वाजता श्रीनाथ मंदिरात आरती भेट झाल्यानंतर श्री भैरवनाथ मंदिराकडे छबिना मार्गस्थ होऊन पोहोचला व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मनोरंजनाचा कार्यक्रम म्हणून लोकनाट्य तमाशा विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा सादर करण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी तमाशाचा हजरी कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर हनुमान मंदिर या ठिकाणी राम नवमी निमित्त फुलांचा कार्यक्रम संपन्न झाला व महाप्रसाद वाटप करण्यात आले.
दुपारी चार वाजता कुस्तीगीर यांसाठी भव्य कुस्त्यांचा आखाडा सुरू झाला. यामध्ये राज्यातील अनेक लहान-मोठे कुस्तीपटू यांनी हजेरी लावत नेत्रदीपक कुस्त्या केल्या. यावेळी नामवंत कुस्ती पंच यांनी उपस्थिती दर्शवून कुस्त्यांचे कामकाज पाहिले. तसेच गावातील लहान-थोर मान्यवर यांनी श्री नाथांच्या कृपाशीर्वादाने आपआपल्या परीने अनमोल असे सेवाकार्य निस्वार्थ रूपाने पार पाडले. त्यामुळे हे गाव एकोप्याने राहात आहे. या यात्रेमध्ये आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली तसेच अनुचित प्रकार घडू नये म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. या यात्रेचे नियोजन वडापुरी गाव आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. यामध्ये पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ तसेच त्यांचे पाहुणे यात्रेसाठी सालाबाद प्रमाणे उपस्थित राहून यात्रेत सहभागी होऊन दर्शन सोहळा पार पाडतात. या गावची परंपरा आणि श्री नाथांचा कृपाशिर्वाद मिळवण्यासाठी यात्रेच्या आठ दिवसापासून सर्व ग्रामस्थांच्या वतीने तयारी सुरू असते. त्यामुळे सर्वांच्या सहकार्याने ही भैरवनाथ यात्रा उत्सव अतिशय आनंदी आणि खेळीमेळी वातावरणात पार पडली.

