shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केकेआरच्या विजयात आंद्रे रसेलची आतिषबाजी !


         नवा कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळलेल्या तीन पैकी दोन सामन्यात विजय मिळवून केकेआरने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून सहभागी संघाना सावधानतेचा जणू इशाराच दिला आहे. सध्या सुरू असलेल्या पंधराव्या आयपीएलच्या सातव्या दिवशी झालेल्या एकूण आठव्या सामन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पंजाबचा दणकून पराभव केला. पंजाबने दिलेल्या १३८ या छोटया धावसंख्येचा पाठलाग करताना केकेआरच्या नाकी नऊ आले होते. मात्र अंतिम टप्प्यात धाकड फलंदाज आंद्रे रसेलने खेळाची सुत्रे हाती घेतले आणि मग सामन्याचा निकाल केकेआरच्या मनाप्रमाणे लागला.

           उमेश यादवच्या धारदार माऱ्यापुढे कोसळलेला पंजाबचा डाव कधीच सावरू शकला नाही. तरीही पंजाबच्या गोलंदाजांनीही केकेआरला रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु रसेलच्या वादळात पंजाबचे आख्खे आव्हानच उडून गेले. आठ षटकार व दोन चौकार म्हणजे जागेवर उभे राहून अवघ्या दहा चेंडूत छप्पन्न धावा कुटताना रसेलने ३१ चेंडूत नाबाद ७० धावा स्वतःच्या नावेे लावल्या. त्यामुळे पंजाब पुरते हतबल झाले व पराभवाला सामोरे गेले.

              आता आपण पंजाबच्या पराभवाच्या कारणांवर एक प्रकाशझोत टाकूया.  मुंबईमध्ये खेळताना नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम क्षेत्ररक्षण घेतो व प्रतिपक्षाला प्रथम फलंदाजी देऊन दबाव टाकतो व नंतर दव आणि विरोधी संघाच्या मानसिक तणावाचा फायदा घेऊन आरामात विजय मिळवितो. हे जणू आता सुत्रच बनले आहे. याच सुत्राचा पंजाब बळी ठरले.
              नाणेफेक हरणारा संघ मुंबईत सामना हरत असला तरी प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या रचून आपली परिस्थिती सदृढ करून आपल्याच गोलंदाजांना मोठा आधार देऊ शकतो. नेमके येथेच पंजाब कमी पडले व सामना गमावला. त्यांच्या फलंदाजांना ना भरपूर धावा जमविता आल्या व ना गोलंदाजांना आहे त्या धावांत केकेआरला गुंडाळता आले.
               केकेआरच्या उमेश यादवने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना २३ धावात चार बळी घेऊन पंजाबच्या शिडातली हवाच काढून घेत पंजाबला पराभवाच्या खाईत ढकलले.हे सर्व कमी की काय म्हणून आंद्रे रसेलने पंजाब सरस ठरत असताना ३१ चेंडूत  ७० धावा ठोकल्या. शिवाय सॅम बिलिंगसह नाबाद ९० धावा जोडून पंजाबच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम केले.

              संघ कितीही चांगला असला परंतु  कामगिरीत सातत्य नसणे हीच पंजाबच्या अपयशाची प्रमुख कारणे असून यामुळेच पंजाबला अद्याप एकदा विजेतेपद मिळविता आले नाही. यावर त्वरीत तोडगा काढला नाही तर पंजाबचे विजेतेपद मिळविण्याचे स्वप्न यंदाही स्वप्नच राहील.

लेखक : -  
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close