पंधरावी आयपीएल स्पर्धा सुरू होऊन जेमतेम पंधरा दिवस झाले आणि अजून दिड महिना बाकी असतानाच आयपीएलचे प्रमुख आकर्षण असलेले मुंबई व चेन्नई हे चौदा पैकी नऊ स्पर्धा जिंकणारे संघ गुणतालिकेत अगदी तळाला म्हणजे नवव्या व दहाव्या स्थानावर आहेत. आयपीएल म्हटलं की या दोन संघांचेच नाव समोर येते. विक्रमी पाच वेळा मुंबई तर त्यापाठोपाठ चार वेळा विजेतेपद पटकविण्याचा मान चेन्नईला जातो.
विशेष म्हणजे सन २०२० मध्ये मुंबई व सन २०२१ मध्ये चेन्नईने विजेतेपद मिळविले आहे. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या सन २०२२ च्या स्पर्धेतील त्यांच्या अशा गचाळ कामगिरीमुळे सर्वाधिक चाहते असलेल्या या दोन्ही संघांच्या समर्थकात कमालीची नाराजी पसरली असून पुढच्या सामन्यात हिच परिस्थिती कायम राहिली तर हे चाहते मंडळी या स्पर्धेकडेच पाठ फिरविण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मुंबई आणि चेन्नईने आपल्या कोट्यातील चौदा साखळी सामन्यांपैकी प्रत्येकी चार चार सामने खेळले असून ते सर्व गमावण्याची नामुष्की त्यांच्यावर आली असल्याने पुढील दहापैकी दहा सामने जिंकणे दोन्ही संघांसाठी गरजेचे असून सध्याची त्यांची संघ रचना, उपलब्ध खेळाडूंची शारिरीक व मानसिक क्षमता, प्रत्येक खेळाडूचा फॉर्म तसेच खेळाडूंमध्ये वाढत चाललेले नैराश्य बघता हे दोन्ही संघ पुढे जाऊन फार मोठी मजल मारतील असे वाटत नाही, हे त्यांच्या देहबोली वरून स्पष्ट जाणवते.
इतकेच नाही तर थंड डोक्याचा व शांत स्वभावाचा, सर्वांना घेऊन चालणारा आयपीएलचे विक्रमी विजेतेपदे मिळविणारा कर्णधार रोहीत शर्मा आपले सर्व बिरूदं विसरलेला दिसतो. मैदानात सतत हसतमुख असणारा रोहीत चिंताग्रस्त, विचारात डुबलेला, चेहऱ्यावर रागिटपणा, चुका करणाऱ्या खेळाडूंवर जाहीरपणे चिडताना दिसतो. त्यामुळे रोहीत सतत होणाऱ्या पराभवांमुळे दबावात आलेला दिसतोच परंतु त्याच्या नैसर्गिक खेळावर व स्वभावावरही त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे दिसते.
अशीच काहीसी गत चेन्नईचा मैदानात गाडा हाकणाऱ्या जडेजा -धोनी जोडीची दिसते. स्पर्धेला सुरूवात होण्याच्या दोन दिवस अगोदरच धोनीने कर्णधारपद सोडून संपूर्ण संघालाच अडचणीत आणले. धोनी ऐवजी नेतृत्वाची धुरा रविंद्र जडेजाच्या गळ्यात टाकण्यात आली. जडेजाला दहा वर्षांपेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट व आयपीएल खेळण्याचा अनुभव असला तरी त्याला साध्या क्लब लेवलच्या स्पर्धेतील कर्णधारपद भूषविण्याचा देखील अनुभव नाही. त्याचा फटका त्यालाच नव्हे तर चेन्नई संघालाच बसला आहे. जडेजा गोलंदाजीत योग्य बदल करण्यात, क्षेत्ररक्षण लावण्यात कमी पडत आहे. तर या सर्व बाबींचा परिणाम त्याच्या वैयक्तीक बॅटींग व बॉलिंगवर होत असल्याने चेन्नईला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. शिवाय धोनी प्रत्यक्ष सामन्यात जडेजाला व्यवस्थित मार्गदर्शन करत असल्याचे दिसत नाही.
मुंबई व चेन्नई संघाच्या सध्या सुरू असलेल्या दुरावस्थेचे कारणंही जवळपास सारखेच आहे. फलंदाजीत सातत्य नसणे, चांगल्या, दर्जेदार व अनुभवी वेगवान गोलंदाजांची वाणवा, क्षेत्ररक्षणात चुका, गोलंदाजांकडून महत्वाच्या क्षणी वाईड बॉल, नो बॉल टाकणे या सारख्याच उणीवा त्यांच्या आहेत.
मुंबईने जाहीर लिलावात संघ निवडताना गंभीर चुका केल्याचे दिसते. अतिशय नवख्या व अननुभवी खेळाडूंना खरेदी करणे व जोफ्रा आर्चर सारख्या अनफिट व उपलब्ध नसलेल्या खेळाडूस निवडून भविष्याच्या दृष्टीकोनातून केलेली निवड असे भासवून स्वतःचीच फसवणूक केली आहे. शिवाय निवडलेले खेळाडू आपल्या गुणवत्ता व लौकीकाला साजेसा खेळ करत नसल्याने मुंबईच्या अडचणीत दिवसें दिवस भरच पडत आहे. आता तर त्यांच्यावर स्पर्धेतून बाहेर पडण्याचे मोठे संकट उभे राहीले आहे. शिवाय सुर्यकुमार यादव सारखा खेळाडू पहिल्या दोन सामन्यात नसल्याचं मोठं नुकसान मुंबईला झालं हे त्याच्या शेवटच्या दोन सामन्यातील झंझावाती व जबाबदार खेळावरून लक्षात आले आहेच. तर टिम डेव्हिड, डॅनियल सॅम्स व टायमल मिल्स यांना निवडणे संघाला नुकसानदायक ठरले आहे.
चेन्नईने ऑक्शन टेबलवर त्यांच्या मनाप्रमाणे संघ निवडला असला तरी त्यांनी जुन्या, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या खेळाडूंवर जुगार खेळून मोठी चुक केल्याचे दिसते. तसेच शार्दूल ठाकूर, जोश हेजलवूड व लुंगी एंगिडीला न घेणं त्यांना महागात गेल्याचे दिसते. तसेच चौदा कोटी रुपये खर्च करून घेतलेला दिपक चाहर दुखापतग्रस्त असल्याने उपलब्ध नाही याचा तोटा त्यांना खास करून पावर प्ले मध्ये गोलंदाजीत झाला, तर त्याच्या उपयुक्त फलंदाजीचा लाभ सीएसकेसाठी दूरच राहीला. शिवाय गत स्पर्धेचा हिरा ऋतूराज गायकवाड बिलकुल चमकलाच नसल्याने त्यांच्या अडचणीत भरच पडली. तर ऋतूराज सोबत गतवर्षी चमकदार खेळ करणारा फाफ ड्यू फ्लेसीसला न निवडणे चेन्नई साठी घाट्याचा सौदा सिद्ध झाला.
क्रिकेट रसिकांच्या गळ्यातले तावीत असलेले आयपीएलमधील सर्वात यशस्वी असलेले मुंबई इंडियन्स व चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ सध्या त्यांच्या अस्तित्वाची लढाई लढत असून सध्याची परिस्थिती बघता फार मोठा चमत्कारच त्यांचे स्पर्धेतील आव्हान टिकवू शकतो. शेवटी क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असून काहीही चमत्कार होऊ शकतो. अखेर उम्मीद पे दुनिया कायम या उक्तीप्रमाणे आपणही क्रिकेटच्या रंजकतेचा आनंद घेऊन नव्या संघांना व होतकरू खेळाडूंना प्रोत्साहीत करून क्रिकेट जीवंत ठेवण्यास सहकार्य करूया !
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com

