shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आईची कृतज्ञता व्यक्त करण्यात क्रिकेटपटूही मागे नाहीत.



           आई हि जगातील सर्वात वंदनीय व्यक्ती. आईची महती व्यक्त करण्यासाठी शब्द कमी पडतात. आई या विषयावर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. कोट्यावधी कवींनी काव्य रचले, कथा, कादंबऱ्या लिहील्या. मोठे मोठे संमेलनं झडली. परंतु आईची महानता व्यक्त करण्याची हौस कोणाचीच थांबली नाही. सन १९०५ पासून " आई दिवस " ( मदर्स डे ) साजरा करण्याची प्रथा सुरू झाली. साधारणतः मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी हा दिवस पाळला जातो.  ' मदर्स डे '  हा दिवस साजरा करण्याची प्रथा एना जार्विस या महिलेने आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ सुरू केली असून ही महान परंपरा अजूनही अबाधीत आहे आणि अखंडीत सुरू राहील अशी आशा करून जगभरातील तमाम मातांना या शुभदिनी मन: पूर्वक वंदन करून भरभरून शुभेच्छा देऊ या !

          देव एका वेळी सर्वांजवळ राहू शकत नाही म्हणून देवानेच आईची निर्मिती करून तिच्या प्रेमाचा व ममतेचा सुगंध सर्वदूर पसरविला आहे. आईचे महत्व जगातल्या सर्वच लोकांमध्ये आहे. सामान्य माणसांपासून नेते, अभिनेते, क्रिडापटूही याला अपवाद नाहीत. आईची कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनेक प्रकार अनेक लोकांनी त्यांच्या परिने अवलंबिले आहेत. यात भारताच्या क्रिकेटपटूंनींही त्यांच्या पद्धतीने स्वतःच्या आईची कृतज्ञता एकदा भर सामन्यात व्यक्त करण्याचा अभिनव उपक्रम राबविला होता.

         २९ ऑक्टोबर २०१६ या दिवशी भारतीय खेळाडूंनी न्यूझिलंड विरूद्ध एका वनडे सामन्यात खेळताना चक्क स्वतःच्या नावाऐवजी आपल्या जन्मदात्या आईचे नाव आपल्या टि शर्टच्या मागील बाजूस लिहून आई विषयीची कृतज्ञता संपूर्ण जगाला दाखवून दिली होती. तो दिवस जागतिक क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी अक्षरांनी लिहीला गेला. कारण तशी घटना त्यापूर्वी कधीही घडली नव्हती व त्यानंतरही परत घडली नाही.

         सन २०१६ मध्ये न्यूझिलंड संघ भारत दौऱ्यावर होता. भारताने कसोटी मालिका ३-० अशी जिंकून पाच वनडे सामन्यांची मालिका दोन -दोन अशी बरोबरीत होती. पाचवा व निर्णायक सामना विशाखापट्टणम येथे होणार होता. त्या सामन्यात सर्व काही नियमाप्रमाणे व नेहमीप्रमाणेच घडत होते. खेळाडूंचा पोशाख निळाच होता. परंतु खेळाडूंच्या भावना भावूक होत्या. कारण त्यावेळी त्यांच्या टि शर्टच्या मागील बाजूस त्यांचे स्वतःचे नाही तर त्यांच्या जन्मदात्रीचे नाव छापलेले होते. वास्तविक त्या दिवशी मदर्स डे वगैरे काही नव्हता. त्यामागे एकच उद्देश होता की, आईची महती साऱ्या जगाला समजावी.
        प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात त्याच्या आई वडिलांचे स्थान सर्वोच्च असते. परंतु पुरुष प्रधान देतात आईच्या नावाला विशेष महत्व दिले जात नाही. नेमकं आईचे प्रत्येकाच्या जीवनातील महत्वाचे स्थान अधोरेखीत करण्याचाच तो एकमेव उद्देश भारतीय क्रिकेटपटूंचा होता आणि मोठ्या प्रमाणात साध्यही झाला.
        त्या सामन्यात भारताचं नेतृत्व करत असलेल्या महेंद्रसिंग धोनीने आई " देवकीचे " नाव पाठीवर लिहीले होते. तर रोहीत शर्माने 'पूूर्निमा शर्मा ' धवल कुलकर्णीने 'प्रमिला कुलकर्णी ' विराट कोहलीने 'सरोज कोहली ' अजिंक्य राहाणेेने ' सुजाता राहाणे ' हार्दिक पांड्या ' नलिनी पांड्या ' असे आपल्या आईचे नाव लिहीले होते. तर जयंत यादवने विमान अपघातात मृत्यू पावलेल्या आपल्या ' लक्ष्मी ' या आईचे नाव लिहीले मात्र तत्पूर्वी त्याचे संगोपन करणाऱ्या " ज्योती " या दुसऱ्या आईची खुल्या अंतःकरणाने माफीही मागितली होती.
         रविचंद्रन आश्वीन ( चित्रा ), उमेश यादव ( किशोरी ), रविंद्र जडेजा (लता ), मोहम्मद शर्मा ( अंजुम एरा ), अमित मिश्रा ( चंद्रकला ), शिखर धवन ( सुनैना ), ईशांत शर्मा (ग्रीशा ) तर सामन्याचे समालोचन करणाऱ्या विरेंद्र सेहवागनेही ( कृष्णा ) या आपल्या आईचे नाव असलेला निळा टि शर्ट परिधान केला परिधान होता.
          " राजा तिन्ही जगाचा आई विना भिकारी " ही जुनी काव्य पंक्ती आईचे महत्व विषद करायला पुरेशी असली तरी आई हा कधीही न संपणारा विषय आहे. खास आपल्या माहितीसाठी सांगतो, मी सुद्धा माझ्या आईच्या ऋणाची जाणीव ठेवून मराठी भाषेतील आई या विषयावरील जगातील सर्वात मोठा समुदायीक काव्यखंड निर्माण करण्याचे कार्य हाती घेतले असून त्यामध्ये जगभरातील पाच हजाराहून अधिक मराठी भाषिक कवींच्या कविता समाविष्ठ असणार आहेत. तसेच गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये त्याची नोंद करण्याचा माझा मानस आहे.
 मातृदिनी आईस सादर प्रणाम ! त्रिवार वंदन !!!
लेखक -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक. 
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत. 
Email:  dattavighave@gmail.com
close